मुंबई : आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आयुष्यभर ईव्हीएमचा जप करावा लागणार आहे, असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाल्यानंतर ईव्हीएमचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत होता. तसेच एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. यावर आता किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, "आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आयुष्यभर ईव्हीएमचा जप करावा लागणार आहे. ठाकरे साहेब २०१८ ला याच चार राज्यांमध्ये भाजप पराभूत झाले होते. त्यावेळी ईव्हीएमच होतं. तसेच २०१९ लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आपले आमदार-खासदार निवडून आले तेव्हादेखील ईव्हीएमच होतं. त्याच आमदारांच्या आधारे आपण मुख्यमंत्री झाला होतात. ये मोदी की गॅरंटी है. लोकांना मोदींवर विश्वास आहे आणि विश्वासघातकी उद्धव ठाकरे सेना ही आता इतिहासजमा होणार," असे टोला त्यांनी लगावला आहे.