मध्यप्रदेशात I.N.D.I. आघाडीचा सामना NOTAशी! आपचं डिपॉझिट जप्त, जदयु सपाही सपाट

05 Dec 2023 17:49:26

jdu sp
 
नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने विजयी झाला, तर तेलंगणा काँग्रेसकडे गेला आणि मिझोराममध्ये नवीन पक्ष झेडपीएम सत्तेवर आला. ज्या राज्यांमध्ये भाजपने बाजी मारली तेथे थेट काँग्रेसशीच स्पर्धा होती. आम आदमी पार्टी (आप), जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि समाजवादी पार्टी (एसपी) यांनीही या राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, या सर्वच पक्षांच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यासाठीही संघर्ष करावा लागला आहे. अनेकांनातर नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
 
मध्यप्रदेशात जेडीयु ने एकूण 9 जागांवर निवडणूक लढवली. यातील एकाही जागांवर उमेदवाराला आपले डिपॉझिट सुद्धा वाचवता आले नाहीये. यातील चार जागांवर तर जेडीयु च्या उमेदवारांस २०० पेक्षाही कमी मते मिळाली. जेडीयु ला मिळालेल्या मतांची टक्केवारी एकूण मतांच्या ०.०२ टक्के एवढं आहे. यापूर्वी फक्त २००३ मध्ये एकदाच जेडीयु चे उमेदवार सरोज बच्चन निवडून आले होते.
 
हे ही वाचा: भाजपने केला केसीआर यांचा पराभव; काँग्रेसच्या या बड्या नेत्यालाही हरवले
 
I.N.D.I. आघाडीच्या इतर घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशात एकूण ६९ जागांवर उमेदवार उभे केले होते. यातील एकही उमेदवार विजयाच्या जवळपास कुठेही दिसला नाही. सपाला मिळालेली एकूण मतांची टक्केवारी केवळ ०.४६ होती. ४३ जागांवर सपाच्या उमेदवारांना १ हजारांपेक्षा कमी मते मिळाली. अखिलेश यादव यांच्या आक्रमक सभांनंतरही एकाही जागेवर समाजवादी पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आला नाही. पराभूत उमेदवारांमध्ये बुधनी मतदारसंघातून 'मिर्ची बाबा' म्हणून प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध स्वामी वैरागानं देखील आहेत.
 
मध्य प्रदेशात आम आदमी पक्षाची (आप) अवस्था कमी-अधिक प्रमाणात जेडीयू आणि सपासारखीच होती. अरविंद केजरीवाल यांनी मध्य प्रदेशात एकूण ७० उमेदवार उभे केले होते. अंतिम निकाल आणि ट्रेंड एकत्र घेतल्यास, एकही विजयाच्या जवळपासही दिसला नाही. सर्व 70 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले. मध्य प्रदेशात आप पक्षाची एकूण मतांची टक्केवारी ०.४२ होती. पराभूत उमेदवारांमध्ये दमोह मतदारसंघातून टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे आणि सिंगरौलीच्या महापौर राणी अग्रवाल यांचा समावेश आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0