माध्यम महोत्सव २०२३-२४ - भारतीय संस्कृती : जतन समृध्दीचे वारसा परंपरेचा

05 Dec 2023 21:32:10
madhyam mahotsav news

मुंबई
: विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयातील माध्यम विभागाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यम महोत्सवाचे आयोजन केले आहे. या माध्यम महोत्सवाच्या फलकाचे अनावरण दि. ५ डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात आणि ढोल ताशाच्या गजरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी केले यावेळी उप प्राचार्य डॉ. दत्तात्रय नेरकर, उप प्राचार्या श्रीमती प्रमोदिनी सावंत, माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा, सांस्कृतिक समन्वयक डॉ. केतन भोसले, डॉ. सूरज पंडित,प्रा. रसिका सावंत, प्रा .नारायण परब आदी प्राध्यापक उपस्थित होते. तसेच साठये महाविद्यालयातील माध्यम विभागाच्या विद्यार्थ्यानी ही यावेळी सहभाग नोंदवला.
 
विविध प्रांतातील गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत या महोत्सवाची एक झलक दिली. या अनावरण सोहळ्यातून महोत्सवाच्या तारखा, संकल्पना जाहीर करण्यात आली. यंदाचा माध्यम महोत्सव ‘भारतीय संस्कृती : जतन समृध्दीचे, वारसा परंपरेचा’ या संकल्पनेवर आधारित आहे. हा माध्यम महोत्सव दिनांक १५,१६ आणि १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून विविध राज्यांतील संस्कृतीचे प्रदर्शन केले जाणार आहे. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी या महोत्सवात इन्फोटेनमेंट स्वरुपातील खेळांचे आयोजन विद्यार्थ्यांद्वारे केले गेले आहे. यात पोस्टर मेकिंग, गायन, नृत्य, मिमिक्री, स्टँड अप कॉमेडी, शॉर्टफिल्म, कोलाज, ठिपक्यांची रांगोळी इ. स्पर्धांमधून भारतीय संस्कृती आणि कलांचे दर्शन होणार आहे. विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही महोत्सवात असणार आहेत. तसेच विविध स्पर्धांच्या प्रवेशाकरीता आकर्षक असा डेस्क सुद्धा विद्यार्थ्यांनी बनवला आहे.

दरम्यान, हा माध्यम महोत्सव विद्यार्थ्यांसाठी नेहमीचं आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. याआधी माध्यम महोत्सवाला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, रत्नाकर मतकरी, स्वप्नील जोशी, चिन्मय मांडलेकर, अवधूत गुप्ते आदी दिग्गज कलाकार आणि साहित्यिकांची उपस्थिती होती. यंदाच्या माध्यम महोत्सवातसुद्धा दरवर्षप्रमाणे कलाकारांची आणि मान्यवरांची मांदियाळी असणार आहे.



Powered By Sangraha 9.0