मुंबई : मनोज जरांगे काहीही बोलू शकतात. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनादेखील आदेश देऊ शकतात, असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरु केलेला पुण्यातील भिडे वाडा महापालिका प्रशासनाने सोमवारी ताब्यात घेतला. त्यामुळे तिथे ऐतिहासिक स्मारक बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर मंगळवारी मंत्री छगन भुजबळ यांनी याविषयी माध्यमांशी संवाद साधला.
छगन भुजबळ म्हणाले की, "मनोज जरांगे काहीही बोलू शकतात. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनादेखील आदेश देऊ शकतात, तर तुमचं आमचं काय आहे. सगळ्यांना ऑर्डर द्यायला मनोज जरांगे काही महाराष्ट्राचा नेता झाला नाही. माहित नसताना काहीतरी बोलायचं आणि लोकांची दिशाभुल करायची असं सुरु आहे. त्यामुळे ते जे बोलत आहेत त्याचा मनोज जरांगेंनी अभ्यास करावा."
"मनोज जरांगे रोजच बोलत असतात. त्यांच्या १५-२० सभांनंतर मी एकदा बोललो तर लोक माझ्यावर तुटून पडतात. महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्यासाठी जरांगे आणि भुजबळ दोघे प्रयत्न करतात असे म्हणतात. पण तो रोज बोलतो १५ दिवसांतून एकदा मला उत्तर द्यावं लागतं."
ते पुढे म्हणाले की, "मी काही जाळपोळ करत नाही. मी काही बेकायदा पिस्तुल घेऊन आणि गुंडांना घेऊन फिरत नाही किंवा ज्या गुंडांनी जाळपोळ केली त्यांना सोडा म्हणून सांगत नाही. फक्त लोकशाही मार्गाने मी माझी बाजू मांडतो," असे ते म्हणाले. तसेच त्यांनी सर्व मराठ्यांना असं कुणबी प्रमाणपत्र द्यावं. एका दिवसात ते कोर्टात थांबेल. कारण त्यांच्या अभ्यासाबद्दल न बोललेलं बरं," असा टोलाही भुजबळांनी जरांगेंना लगावला.
"सर्व पक्षांचं एकच म्हणणं आहे की, ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. पण मागच्या दाराने जी एन्ट्री सुरु आहे त्याला माझा विरोध आहे. मनोज जरांगे सतत माझा एकेरी उल्लेख करत वाट्टेल ते बोलत आहे. मी काही बोललो तर ताबडतोब सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जातं. परंतु, भुजबळांच्या संयमालादेखील काही मर्यादा आहेत. त्यामुळे ज्यावेळी बोलायचं तेव्हा मी सडेतोड उत्तर नक्की देणार," असे भुजबळ म्हणाले आहेत.