आशिष शेलारांचा ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, "कोकणच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांची..."

05 Dec 2023 18:33:23

Shelar & Thackeray
मुंबई : सिंधुदुर्गमधील आमच्या मालवणच्या पावन भूमीमध्ये देशाचे पंतप्रधान आलेत. पण कोकणच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांची तोंड आता का शिवली आहेत? उबाठा आज ज्या लोकांबरोबर बसले आहेत, त्यांचे पंतप्रधान कधी मालवणला आले होते का? असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
 
विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, "तीन राज्यांमध्ये भाजपला निर्विवाद यश मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचे सरकार संपुर्ण देशातील गरिबांची, श्रमिकांची, महिला वर्गाची आणि युवकांनी सेवा करत आहेत. त्यामुळे भाजपला जनतेचा आशिर्वाद आहे, यावर आता पुन्हा शिक्कामोर्तब झाला आहे. यापुढे आमचा विकासाचा रथ यापेक्षाही जास्त गतीने काम करेल. लोकसभा निवडणुकीतही समस्त भारतवासीयांना आशिर्वाद आणि विश्वास हा पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरच राहील यात काही दुमत नाही."
 
"सिंधुदुर्गमधील आमच्या मालवणच्या पावन भूमीमध्ये देशाचे पंतप्रधान आलेत याचा मालवणी माणसाला अभिमान आहे. चार राज्याचे निकाल लागल्यानंतर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदीजी आलेत. कोकणच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांची तोंड आता का शिवली आहेत? उबाठा आज ज्या लोकांबरोबर बसले आहेत, त्यांचे पंतप्रधान कधी मालवणला आले होते का? कोकणविरोधी लोकांबरोबर उद्धवजी बसले आहेत," असेही ते म्हणाले आहेत.


Powered By Sangraha 9.0