मिझोरम : मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार विरोधी पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) वर प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे. झेडपीएम सध्या २९ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट फक्त ७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ३ आणि काँग्रेस अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.
राज्य निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर झेडपीएम कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पक्षाने २ जागा जिंकल्या असून एकूण ४० जागांपैकी २९ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे झेडपीएमचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ने २०१८ च्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत २६ जागा जिंकलेल्या मिझो नॅशनल फ्रंट (MNF) चा पराभव केला आहे. २०१८ मध्ये झेडपीएम ८ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु झेडपीएम आतापर्यंतच्या मतमोजणीत आघाडीवर आहे. त्यांना बहुमत मिळाले आहे.
६ वर्ष जुना पक्ष 'झोरम पीपल्स मूव्हमेंट
१९८४ पासून, प्रबळ मिझो नॅशनल फ्रंट (जी २२ ऑक्टोबर १९६१ रोजी अस्तित्वात आली) आणि काँग्रेस पक्ष ईशान्येकडील राज्यात निवडणुकांमध्ये आमने-सामने होते. पण २०१७ मध्ये माजी आयपीएस लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखाली नवा राजकीय पक्ष अस्तित्वात आला. 'झोरम पीपल्स मूव्हमेंट' असे या पक्षाला नाव देण्यात आले.
मिझोराममध्ये सरकार स्थापन करण्यापासून कोणताही पक्ष रोखू शकत नाही, असा दावा झेडपीएमच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काँग्रेससोबत युती करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. गेल्या वर्षी याच पक्षाला निवडणुकीत केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले होते.