गॅरंटीचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदीजी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

04 Dec 2023 18:09:21

CM Shinde


सिंधुदुर्ग :
या देशात गॅरंटीचे दुसरे नाव नरेंद्र मोदीजी आहे हे देशातील जनतेने सिद्ध केले आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय नौदल दिन साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पार पडले.
 
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. तसेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तीन राज्यांत भाजपचा विजय झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधांन मोदींचे अभिनंदनही केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सगळ्यांनी मोदी मॅजिक बघितली. या देशात गॅरंटीचे दुसरे नाव नरेंद्र मोदीजी आहे हे देशातील जनतेने सिद्ध केले आहे."
 
"आधी हर घर मोदी असे म्हटले जायचे तर आता मनामनांत मोदी असे म्हणतात, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच यावेळी आपण ज्या सागराच्या लाटा बघत आहोत, अशीच मोदी लाटदेखील काल संपुर्ण देशाने बघितली," असेही ते म्हणाले. "पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाचे नाव जगात उंचवण्याचे आणि देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्याचे काम केले याचा आम्हाला आनंद आहे."
 
"देशातील महिलांच्या आत्मसन्मानाचं आणि आत्मनिर्भरतेचं नवं पर्व मोदीजींमुळे सुरु झालं आहे. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं हिंदवी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्याचा ध्यास पंतप्रधान मोदींनी घेतला आहे आणि त्याची फळं देशातील जनता चाखत आहे, शिवछत्रपतींनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा वारसा आपण सगळे पुढे घेऊन जातोय. जगाला भारताच्या सामर्थ्याचं दर्शन घडवण्याचा हा काळ असून जगाने आपल्या सामर्थ्याची नोंद घेतली आहे," असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0