कोयासन विद्यापीठाची गाथा

31 Dec 2023 21:08:04
Koyasan University has strong ties to the Shingon sect of Buddhism

जपानमधील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या, कोयासन विद्यापीठातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद घटना आहेच. परंतु, ज्या विद्यापीठाने ही डॉक्टरेट फडणवीस यांना प्रदान केली, त्या कोयासन विद्यापीठाविषयी अधिक माहिती जाणून घेणे क्रमप्राप्त ठरते. सम्राट सागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर, महान जपानी बौद्ध भिक्षू तथा जपानमधील शिंगोन बौद्ध धर्माचे संस्थापक कोबो दाईशी कुकाई यांनी इसवी सन ८२६ मध्ये माऊंट कोया येथे एक मठ अर्थात बौद्ध प्रशिक्षण केंद्र सुरू केले आणि तेथे इसवी सन ८३५ मध्ये वयाच्या ६२व्या वर्षी त्यांचे निधन झाले. इसवी सन ९२१ मध्ये त्यांना सम्राट डायगोकडून मरणोत्तर ‘कोबो’ ही मानद पदवी दिली गेली. पुढे याच बौद्ध प्रशिक्षण केंद्राचे रुपांतर १८८६ साली कोयासन विद्यापीठामध्ये झाले.
 
कोयासन विद्यापीठ हे कोया शहरामध्ये कोया पर्वताच्या शिखरावर असलेल्या पठारावर आहे, जे ’युनेस्को’च्या जागतिक वारसा पवित्र स्थळांचा भाग आहे आणि की पर्वत रांगेतील तीर्थक्षेत्र मार्ग आहेत. कोयासन विद्यापीठाला पूर्वी कोगिडायगाकुरिन या नावाने ओळखले जात असे. हे विद्यापीठ आजपर्यंत कुकाई यांच्या शैक्षणिक तत्त्वांचे पालन करत आहे. दरम्यान, शिंगोन बौद्ध धर्म हा गूढ बौद्ध धर्माचा एक प्रकार असून, ज्याचा उगम भारतात झाला आणि नंतर तो तांग चीन भागात विस्तारला. त्यानंतर हा धर्म चीनमधून नामशेष होऊन पुढे नारा आणि सुरुवातीच्या हेयान काळात जपानमध्ये रूजला. कुकाई यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे कोयासन येथे वाकायामा प्रांतातील की द्वीपकल्प पर्वतांवर ध्यान आणि शिक्षणात घालवली. त्यांनी त्यांच्या लेखनात आणि त्यांच्या कृतीमध्ये शिक्षणाच्या महत्त्वावर जोर दिला. कोयासन विद्यापीठाने बौद्ध धर्मातील सर्वांना शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन कुकाई यांची परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवली आहे.

कोयासन विद्यापीठाला जवळपास १२ शतकांहून अधिक काळचा इतिहास आहे. शिंगोन बौद्ध सिद्धांताच्या पारंपरिक अभ्यासासह कोयासन विद्यापीठ बौद्ध विषय आणि त्यातील संपूर्ण श्रेणींचे आधुनिक पद्धतीने शैक्षणिक प्रशिक्षण देते. बौद्ध धर्म आणि गूढ बौद्ध धर्मापासून मानविकी आणि सामाजिक अभ्यासापर्यंत सर्वसमावेशक अभ्यासक्रम आणि संशोधन करण्यासाठी शिक्षण प्रदान करणे. तसेच विद्यार्थ्यांचे चारित्र्य जोपासणे, शैक्षणिक, सांस्कृतिक परंपरा आणि विकासामध्ये योगदान देणे हे विद्यापीठाचे ध्येय आहे. विद्यापीठामध्ये गूढ बौद्ध धर्म विभाग आणि ‘लेटर्स फॅकल्टी’मधील मानवतावादी मानववंशशास्त्र विभाग असून गूढ बौद्ध धर्माचा पदवीधर शाळा कार्यक्रम, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ लेर्ट्समधील बौद्ध धर्माचा पदवीधर शाळा कार्यक्रम तसेच दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम यांचादेखील समावेश आहे. २०१६ साली दीर्घकालीन योजनेअंतर्गत विद्यापीठाने मध्यम आणि दीर्घकालीन योजना म्हणून कोयासन विद्यापीठ पुनरुज्जीवन ’व्हिजन’ तयार केले.

विद्यापीठाने ‘कोयासन आर्काईव्ह’च्या माध्यमातून जुनी हस्तलिखिते, मुद्रित पुस्तकांसह, बौद्ध धर्म, गूढ बौद्ध धर्म आणि माऊंट कोयावरील मौल्यवान ऐतिहासिक साहित्याचे डिजिटलायझेशन केले आहे. केवळ नवशिक्या भिक्षूंनाच नव्हे, तर शिक्षक आणि कल्याणकारी कामगार बनण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनाही आकर्षित करण्यासाठी, विद्यापीठाने २०१५मध्ये मानवतावादी मानववंशशास्त्र विभागाची स्थापना केली, जे मानसशास्त्र आणि समाजशास्त्राचे अभ्यासक्रम प्रदान करते.

२०१७ मध्ये विद्यापीठाने हे अभ्यासक्रम ओसाका येथील सॅटेलाईट शाळेत कार्यरत प्रौढांना शिकविण्यास सुरुवात केली. १९८०च्या दशकात दरवर्षी ५०हून अधिक भिक्षू पदवीधर व्हायचे. मात्र, आता ही संख्या घसरून दहावर आली आहे. त्यामुळे ही विद्यापीठासाठी चिंतेची बाब आहे. २०१५ हे वर्ष कुकाई यांनी स्थापन केलेल्या, कोयासन बौद्ध प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेचा १२००वा वर्धापन दिन आणि २०१६ वर्ष कोयासन विद्यापीठाचा १३०वा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात आला. अशा या गूढ बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणार्‍या आणि अतिप्राचीन विद्यापीठाने उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केलेली डॉक्टरेट खर्‍या अर्थाने महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्यातही फडणवीस यांनी ही डॉक्टरेट महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करून, संबंध महाराष्ट्राचे मन जिंकले.

७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0