मुंबई (विशेष प्रतिनिधी): साताऱ्यातील शिरवळ गावाजवळ असलेल्या एका शेतामध्ये पाईड व्हिटइअर या स्थलांतरित पक्ष्याचे दुर्मिळ दर्शन झाले आहे. या पक्ष्याचे दुर्मिळ दर्शन पक्षीनिरिक्षक वैभव पाटील, हरीश पाटील आणि सुरेंद्र पाटील या तिघांना रविवार दि. २४ डिसेंबर रोजी झाले आहे. या पक्ष्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच नोंद आहे.
थ्रश कुळातील हा पक्षी युरोप ते आफ्रिका आणि आग्नेय आशिया या भागात स्थलांतराचा प्रवास करणारा असून तो भटकुन महाराष्ट्रात आल्याची शक्यता पक्षीनिरिक्षकांनी वर्तवली आहे. पाईड व्हीटइअर या पक्ष्याच्या भारतात लडाख, पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक अशा मोजक्याच नोंदी आहेत. वैभव पाटील, हरीश पाटील आणि सुरेंद्र पाटील हे रायगड जिल्ह्यातील पक्षीनिरिक्षक असून बहाराई फाउंडेशनमार्फत गेली काही वर्ष पर्यावरणाशी संबंधीत कामे करत आहेत.
यापूर्वी रायगड जिल्ह्यात रेड क्रेस्टेड पोचर्ड आणि कॉमन क्वेल या पक्ष्यांची पाहिली नोंद केली आहे. इ-बर्ड या पक्षीनिरिक्षण नोंदींच्या अॅप वर रायगडमधून तिघांनीही सर्वाधिक नोंदी केल्या आहेत. सतत प्रवास करणारा पक्षी असल्यामुळे तो एकाच ठिकाणी आढळत नाही.