दै. ’मुंबई तरूण भारत’ने जानेवारी २०२३ मध्ये ‘माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ या विषयी २०० सभांचा संकल्प केला. त्यानुसार आतापर्यंत १३१ सभा यशस्वीरित्या संपन्न झाल्या. यादरम्यान लाखो मुलींशी संवाद साधला. अभियानासाठी सज्जनशक्ती पाठीशी उभी रहिली. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विशेष सहकार्य, सुविधा दिली. समाजमंडळ, मित्रमंडळे, शाळा-महाविद्यालयांनी स्वतःहून हे व्याख्यान आयोजित केले. वर्षभरात या अभियानाचा सकारात्मक परिणाम झाल्याच्या काही घटनांचा सरत्या वर्षानिमित्त घेतलेला हा आढावा.
पुण्यात दै. ’मुंबई तरूण भारत’च्या ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ सभेनंतर एक उच्चशिक्षित युवती मला म्हणाली की, ”थँक्स ताई, माझे आईवडील खूप संशयी आहेत. माझ्यावर बंधनं टाकतात, असे मला वाटायचे. पण, दै. ’मुंबई तरूण भारत’चे ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ व्याख्यान ऐकले आणि आता मला वाटते की, आईबाबा होते म्हणूनच मी वाचले. तुमचे व्याख्यान ऐकून मला आठवले की, हो ‘तो’सुद्धा माझ्याशी विनाकारण गोड बोलायचा. काही कारण नसताना, महाविद्यालयाच्या प्रागंणात भेटून, आपुलकीने विचारायचा ‘आपने खाना खाया क्या? आप कैसे हो, ठीक होना. कुछ प्रॉब्लेम हैं तो बताना, बंदा हाजीर हैं’ असं म्हणायचा. ओळख वाढवत त्याने मला दिल्लीच्या त्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला येण्यासंदर्भात विचारले. त्यावेळी मम्मी-पप्पांनी मला विचारले की, कोणती कॉन्फरन्स आहे? एकटी कशी जाशील? त्यासंदर्भात सगळी माहिती दे. त्यावेळी मला वाटले की, मम्मी, पप्पा किती संशयी आहेत. केवळ तो हिंदू नाही, म्हणून त्याच्यावर संशय घेणे म्हणजे धर्मांधता आहे. पण, तुमचे ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ व्याख्यान ऐकून मन निश्चित झाले. वाटले बरं झालं, मी त्याचं ऐकलं नाही, मी नकार दिला.
आता आठवले की, मी त्याला तेव्हा म्हटले होते की, कॉन्फरन्सचा तपशील दे. मी घरी विचारते. तर तो म्हणाला की, ‘इसमे पुछने की क्या बात? आपका पुरा डिटेल मैने वहा दिया हैं. आपको सिर्फ चलना हैं.’ आता विचार केल्यावर वाटते की, खरे तर त्याची आणि माझी मैत्री नव्हती. तो मुस्लीम असून, केवळ त्याचे नावच मला माहिती होतेे. पण, त्याला माझ्याबद्दल सगळी माहिती होती. ती कशी काय? माझ्या नकळत माझी परवानगी न घेता, त्याने माझे नामांकन दिल्लीच्या त्या कुठल्याशा कॉन्फरन्समध्ये केले होते. दिल्लीच्या त्या कॉन्फरन्सबद्दल मला काहीच माहिती देत नव्हता. मी कॉन्फरन्सला जाण्यास नकार दिल्यावर, त्याने माझ्याशी बोलणेही टाळले. इतकेच काय, मला तो आता दिसतही नाही. खरंच मी त्यावेळी योग्य निर्णय घेतला. मला तिथे न पाठवणार्या आणि त्या कॉन्फरन्सबद्दल माहिती विचारणार्या, माझ्या पालकांबद्दल मनात राग होता. ते उगीचच संशय घेतात, असे वाटत होते. पण, आज तुमचे व्याख्यान ऐकून वाटले की, माझ्या आई-बाबांमुळे माझे पुढे होणारे दुर्दैव टळले.“ ती भावनिक होऊन सगळं सांगत होती आणि सोबत असलेल्या तिच्या आईने तिला अगदी लाडाने जवळत ओढत, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले.
दुसरी घटना मुंबईची. मुंबईच्या एका शाळेत मुलींशी संवाद साधला. सभेदरम्यान एक मुलगी सारखी डोळे पुसत होती. तिला सभेनंतर विचारले, “बेटा, काय झाले?” तेव्हा ती म्हणाली की, “काही नाही.” मी तिला म्हटले की, ”ठीक आहे. मात्र, पुढे-मागे कधीही काहीही सांगायचे असेल, तर मला बिनधास्त फोन कर.“ काही दिवस गेले आणि त्या मुलीचा मला फोन आला. ती म्हणाली की, ”माझे मम्मी-पप्पा वेगळे राहतात. आम्ही दोघी बहिणी बाबांसोबत राहू लागलो. गॅरेजमध्ये काम करणार्या एका मुलाने ताईला मैत्री करण्यासाठी जबरदस्ती केली. ताईला आणि मला पण त्याची भीती वाटायची. तो मुस्लीम आहे म्हणून नाही, तर तो खरच खूप विचित्र आहे. त्याच्याशी मैत्री केली नाही, तर तो काहीतरी करेल, म्हणून घाबरून ताईने त्याच्याशी मैत्री केली. पण, ताईला तो आवडत नाही. हे बाबांना सांगायला भीती वाटायची. बाबा काय म्हणतील, असे वाटायचे. पण, परवा तुमचे ‘लव्ह जिहाद’विरोधी व्याख्यान ऐकले. तुम्ही म्हणाला होतात की, ”आईबाबा कधीच आपले शत्रू नसतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आपल्या पाठी ठामपणे उभे राहतात. हातून चूक घडली असेल, तरीसुद्धा ते पाठीशी उभे राहतात.” तुमचे म्हणणे ऐकूनच मला हिंमत आली आणि मी बाबांना सगळे सांगितले. खरंच बाबा आमच्यावर रागावले नाहीत. त्यांनी असे काही केले की, गेले आठ दिवस झाले, तो मुलगा ताईला बघून, मान खाली घालतो. बाबा म्हणतात की, ‘आई सोबत असती तर तुमच्याकडे लक्ष दिले असते.’ आता तर त्यांनी मम्मीसोबत परत एकत्र राहायचीही तयार दाखवली आहे. मम्मी पण आमच्यासाठी परत येईल.” हे सगळं सांगताना त्या मुलीचा आवाजही अगदी आनंदाने भारावलेला होता.
’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ विषय ऐकून एका चिमुरडीमध्ये आलेली ही हिंमत पाहून वाटते की, दै. ’मुंबई तरूण भारत’चे हे ईश्वरी कार्य आहे. महाराष्ट्रभर सभा घेतल्यानंतर, अनेक शाळा महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले की, तुमच्या व्याख्यानानंतर आमच्या शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात आम्ही विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. तेव्हा जाणवले की, काही टोळकी चौकात, रस्त्यावर उभे राहून मुलींना त्रास देतात. त्या त्रासाला कंटाळून, अनेक मुली महाविद्यालयात येतही नसत, तर काही मुली त्या बदमाशांपुढे हार मानून, मनाविरूद्ध त्यांच्याशी मैत्रीही करताना आढळल्या. तुमच्या व्याख्यानानंतर आम्ही विशेष लक्ष देऊन, मुलींना त्रास देणार्या टोळक्यांना जेरबंद करू शकलो. विशेष म्हणजे, या कामी आमच्या विद्यार्थिनीही पुढे आल्या. तुमचे ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ व्याख्यान ऐकून त्यांना वाटले की, आपण या टोळक्यांना फसलो नाही, तरी दुर्दैवाने कुणी ना कुणी तरी फसू शकते आणि ’लव्ह जिहाद’ची बळी ठरू शकते. त्यामुळे त्या अगदी स्वतःहून पुढे आल्या.
काल-परवाच झालेल्या एका सभेनंतर, एका समाजाच्या प्रमुखाने सांगितले की, ”आमचा समाज मागासवर्गीय आहे. हिंदू असूनही मी स्वतःला हिंदू मानले नाही. ’दलित-मुस्लीम भाई भाई, हिंदू कौम कहासे आयी’ यावर माझा विश्वास होता. पण, काही दिवसांपूर्वी माझ्या नातीला बुरखा घालून भीक मागताना मी पाहिले. तिला कितीही अडवले, तरी ती ऐकत नाही. रडते. ती म्हणते, माझी मजबुरी आहे. तिला जातीतून हकलवावे, तिच्याशी संबंध तोडून टाकावे, असं मी ठरवलं. पण, तुमचे आमच्या वस्तीतले ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ व्याख्यान ऐकले आणि तिच्या वागण्या पाठीमागचे कारण कळले. आता मी तिला विश्वासात घेऊन सांगणार आहे की, लेकरा, तुझी काहीही चूक झाली असेल तर विसर. आम्हाला तू हवी आहेस. तुला त्रास देणार्यांना घाबरू नकोस. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत.” त्या आजोबांचे ते शब्द ऐकले आणि वाटले की, खरंच समाजात ’लव्ह जिहाद’बद्दल आजही अज्ञान आहे. समाज, पालक ’लव्ह जिहाद‘ व ’ड्रग्ज जिहाद’ला बळी पडणार्या पीडितांना दोष देतात आणि खरे दोषी मोकाट सुटतात. त्या धर्मांधांचे कटकारस्थान समाजासमोर उघड करणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षभरात ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ सभांच्या निमित्ताने लाखो मुलींना आणि पालकांना भेटले. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समाजमन कळले. ’लव्ह जिहाद‘ व ’ड्रग्ज जिहाद’विरोधात ठीकठिकाणांहून सज्जनशक्तींचा लाखोंच्या जनसंख्येने मोर्चा का बरं निघत असेल, याचे अंतरंग मला कळले. दै. ’मुंबई तरूण भारत’च्या ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य. शेवटी काय, ‘हम दिन चार रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मॉँ...’
दै. ’मुंबई तरूण भारत’च्या ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ सभेची घेतलेली दखल आणि कौतुकाची थाप
राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका वं. शांताक्का यांनी ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियानाची समाजाला गरज आहे, असे म्हटले. केवळ २०० सभांवर न थांबता, समाजात सर्वत्रच याविषयी जागृती करावी, असेही त्या म्हणाल्या. तसेच साध्वी प्रज्ञासिंह यांनी ’लव्ह जिहाद’विरोधी जागृती करणे, हे ईश्वरी कार्य आहे, असे म्हणून अभियानाला आशीर्वाद दिला. ’माझे शहर, लव्ह जिहादमुक्त शहर’ अभियान दक्षिण मुंबई जिल्ह्यात गल्लीगल्लीत पोहोचून ’लव्ह आणि ड्रग्ज जिहाद’विरोधी जागृती व्हावी, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतील सर्वच ३४ वॉर्डांमध्ये ’मिशन दुर्गाशक्ती’अंतर्गत हे अभियान सुरू केले आहे. ठाणे जिल्ह्यातही भाजप जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनीही त्यांच्या प्रत्येक तालुक्यात हे अभियान सुरू केले.
९५९४९६९६३८