स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांवर आजवर अनेक विद्वानांनी, तसेच तरूण अभ्यासकांनी सुद्धा प्रदीर्घ लेखन केले आणि अजूनही ही आशयनिर्मितीची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु आहे. याचाच मूर्त आणि सबळ पुरावा म्हणजे ’बखर सावरकरांची.’ कायद्याचे शिक्षण घेऊन, त्यातच पूर्णवेळ काम करणारे, अॅड. आदित्य रुईकर यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. सुरुवातीला एकाच भागात ग्रंथरुपाने प्रकाशित करावयाचा हा ग्रंथ पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत प्रकाशित करावयाचे ठरले होते, त्यानंतर त्याचे तब्बल तीन भाग झाले. हा त्याचाच पहिला भाग.
एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाबाबत जेव्हा काळ उलटून गेल्यावरही, नवनवीन अंगाने लेखन होत असते, तेवढे त्या व्यक्तिमत्त्वाच्या विचारप्रभावाचे आयू असते, असे म्हणता येईल. या न्यायाने ’बखर सावरकरांची‘ या त्रिखंडी ग्रंथाचे सारे श्रेय आदित्य यांना न जाता, सावरकरांना जाते असेच म्हणायला हवे! छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्यांच्यावर अव्याहत तरुणांकडूनही साहित्यनिर्मिती होते आहे, अशा मोजक्या नावांमध्ये सावरकरांचे नाव अगदी अग्रक्रमाने घ्यायला हवे. या पूर्वार्धाच्या पुस्तकाला प्रस्तावना सात्यकी सावरकर यांनी दिली आहे. त्यांचे म्हणणे थोडक्यात सांगायलाच हवे. ते म्हणतात की, ”सावरकरांना केवळ देश स्वतंत्र व्हावा, असे वाटत नव्हते, तर व्यक्तिस्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत होतं. उद्या ब्रिटनचे स्वातंत्र्य धोक्यात आले, तर मी त्यांच्याही बाजूने जाऊन लढेन,” असे ते म्हणाले होते.
zनाला प्रारंभ करताना, सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत त्यांच्या आयुष्यातील लहान-लहान घडामोडींचा उल्लेख करत, त्यांचे चरित्र मांडले आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या आशीर्वादाने त्यांच्या लेखनकार्याची सुरुवात झाली. बाबासाहेब आदित्य यांना म्हणाले होते की, ”तुम्ही व्यवसायाने वकील आहात; पण इतिहासात ज्यांच्यावर अन्याय झाला, अशा थोरांचे वकीलपत्र घेऊन, तो दूर करण्याचे कार्य तुम्ही करावे.” या पहिल्या ग्रंथात सावरकरांच्या आयुष्यातील चार पर्वांचा समावेश आहे. बाल पर्व, कार्यारंभ पर्व, इंग्लंड पर्व आणि अंदमान पर्व. सावरकरांच्या संपूर्ण आयुष्यातील त्यांनी केलेल्या कारकिर्दीची नांदी या बाल पर्वातच पाहायला मिळते.
आजही सावरकरांना उत्तम राजकीय नेते म्हणून मान्यता देण्यात उदासीन असलेले; मात्र त्यांच्या काव्यप्रतिभेला सलामच करतात. त्यांच्या कवितेची ओळख त्यांना स्वतःला आणि महाराष्ट्राला या बालपणीच झाली. याचवेळी त्यांनी त्यांचे पहिले भाषण केले. वक्तृत्व आकार घेऊ लागले, तो काळही हाच. हे वाचताना मनसुद्धा सुखासीन असतं. उज्ज्वल भविष्यासोबतच सुखी आयुष्याची कामना आपण करावी, असं तीव्रतेने वाटते, ते इथेच.
दुसर्या पर्वात त्यांचा खर्या अर्थाने कार्याचा आरंभ होतो. गुप्तमंडळ, मित्रमंडळ अशा संस्थांची स्थापना, गणेशोत्सव, शिक्षणासाठी पुण्याकडे प्रस्थान, यातच आर्थिक अडचणी, विदेशी कपड्यांची होळी आणि इंग्लंडला जाण्याचे स्वप्न. याच काळात त्यांचे वृत्तपत्रीय लेखन सुरू झाले. विवाहसुद्धा याच वेळेस झाला. इंग्लंड पर्वात काही प्रमाणात त्यांचा वैचारिक संघर्ष आणि त्यातून आकाराला येत असलेली त्यांची वैश्विक बैठक जाणवते. बोटीवरून प्रवास करताना, कुबलांच्या चालीरिती श्रेष्ठ वगैरे प्रश्न पडण्याचा काळ. ’१८५७चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाचे लिखाणसुद्धा याच काळात झाले. शेवटच्या पर्वात मात्र त्यांच्या इंग्लंमधील वास्तव्य आणि कार्यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे. कैद्यांचे अन्न, त्यांची स्थिती आणि तात्याराव. तेथील व्यवस्थापन आणि सर्व कैद्यांना सहन करावे लागलेले हाल. हिंदू-मुसलमान, पुन्हा हिंदू धर्मातील घरवापसी अशा अनेक मुद्द्यांवर चिंतन यात झालेले आहे. एकूणच आवर्जून वाचावे असे हे पुस्तक...
पुस्तकाचे नाव : बखर सावरकरांची (पूर्वार्ध)
लेखक : अॅड. आदित्य रुईकर
प्रकाशन : दिवाकर प्रकाशन
प्रथमावृत्ती : दि. २६ फेब्रुवारी, २०२३
पृष्ठसंख्या : ५१५
मूल्य : ६५० रु/-