...तर पुन्हा जागतिक महामारी!

03 Dec 2023 21:36:27
Mysterious pneumonia outbreak in China

जागतिक महामारी ‘कोरोना’ विषाणूच्या विळख्यातून मानवजातीची जेमतेम सुटका होत असतानाच, चीनसह अमेरिकेतही गूढ न्यूमोनियाचे संकट उभे राहिले आहे. या आजारामुळे मुले आणि वयस्कर रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जवळपास दोन महिन्यांपासून चीनमध्ये धुमाकूळ घालणार्‍या गूढ न्यूमोनियाने जागतिक चिंता वाढवली आहे. या आजाराने गेल्या काही दिवसांत अमेरिकेत तोंड वर काढले आहे. त्यामुळे चिंतेत भर पडत आहे. अमेरिकेतील ओहियो राज्यातील असंख्य मुलांना गूढ न्यूमोनियाने ग्रासले आहे. या सर्व मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चीनमध्ये या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांची संख्या वाढल्यामुळे आरोग्य यंत्रणा ’हाय अलर्ट’वर आहेत. चीनमध्ये आढळून आलेला हा गूढ न्यूमोनियाचा आजार अमेरिकेसह अन्य काही देशांतही दिसून येत आहे.

ऑगस्टपासून गेल्या चार महिन्यांत या आजाराचा प्रादुर्भाव असलेली १४२ बाल वैद्यकीय प्रकरणे आढळून आली आहेत. या आजाराला त्यांनी ‘व्हाईट लंग सिंड्रोम’ असे नाव दिले आहे. ‘व्हाईट लिंग सिंड्रोम’ हे केवळ अमेरिकेसाठीच नव्हे, तर जगासाठी फार मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. ‘कोरोना’ विषाणूचा उगम, त्याचा प्रादुर्भाव त्यानंतर सर्वाधिक संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू हा सर्व इतिहास पाहता, जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. कोरोनाचा उगम चीनमध्ये झाला आणि त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अमेरिकेत चिंता वाढणे स्वाभाविक आहे. हा आजार चीनमध्ये पसरलेल्या गूढ न्यूमोनियासारखाच आहे. त्यामुळे आता चीननंतर अमेरिकेत ’कोरोना’च्या आगमनाच्या वेळी जसे वातावरण झाले, तशीच अवस्था आताही होऊ पाहत आहे. अमेरिकेनंतर नेदरलॅण्ड आणि डेन्मार्कमध्ये देखील या गूढ न्यूमोनियाचे रुग्ण आढळले असून, हे संकट गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. या दोन्ही देशांत लहान मुलांमध्ये आढळून येणार्‍या गूढ न्यूमोनियासारखीच काही प्रकरणे आढळली आहेत.

’कोरोना’ महामारीच्या दरम्यान ‘लॉकडाऊन’, मास्क सक्ती आणि शाळा बंद ठेवल्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे संशोधनात्मक अभ्यासांमधून समोर आले आहे. त्यामुळे या गूढ न्यूमोनियाचे संकट भविष्यातील मोठ्या हानीची चाहूल तर देत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. गूढ न्यूमोनियामुळे लहान मुले या आजाराच्या संसर्गाप्रति अधिक संवेदनशील झाली आहेत. त्यामुळेच अनेक देशांनी या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने ’कोरोना’ सारखीच नियमावली जाहीर केली आहे. यात लहान मुलांनी त्यांचे हात धुणे, खोकताना रुमालाचा वापर करणे आणि आजारी असल्यावर घरीच आराम करणे आणि लसींबाबत जागरूक राहण्याचा सल्ला आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे.

जागतिक संकट निर्माण होण्याआधीच या आजाराची लस तयार करण्याचे काम अमेरिकेने हाती घेतले आहे. एकदा का प्रादुर्भाव वाढला की, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असते. त्यातच वेळीच परिणामकारक उपचार न केल्यास मृतांचा आकडाही वाढण्याची भीती कायम असते. ’कोरोना’ काळात रुग्णांना कोणते औषध द्यावे, त्याने काय काळजी घ्यावी या संदर्भात सारेच अनभिज्ञ होते. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडणार्‍यांची सर्वाधिक होती. त्या तुलनेत दुसरी आणि तिसरी लाट प्रभावहीन ठरली. या सर्व घटनांची पुनरावृत्ती गूढ न्यूमोनियामुळे होऊ नये, यासाठी सर्वच प्रमुख देशांत विशेष खबरदारी बाळगण्यात येत आहे. गेल्याच आठवड्यात भारताच्या केंद्रीय आरोग्य विभागाने घेतलेल्या आढाव्यात, या संभाव्य आजाराचा तूर्तास भारताला धोका नसला, तरी खबरदारी बाळगण्यात येत आहे. एकीकडे गूढ न्यूमोनिया या आजाराची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे त्यावर परिणामकारक उपाययोजना शोधण्याचे आव्हान जागतिक शास्त्रज्ञांसमोर उभे आहे. ’कोरोना’ महामारीने सर्वच क्षेत्रांच्या मर्यादा उघड केल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अनेक देश सतर्क झाले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.

मदन बडगुजर 
Powered By Sangraha 9.0