जालना : मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी ते आंतरवाली सराटी येथून पुणे मार्गे मुंबईला येणार आहेत.
या मोर्चामध्ये मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हानही मनोज जरांगेनी केले आहे. साधारण ३ कोटी मराठा बांधव मोर्चात सहभागी होतील असा अंदाज त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. मराठा बांधवांनी गटातटात विभागून राहू नये मराठा समाजातील लेकरांसाठी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी व्हावे असही ते यावेळी म्हणाले.
मराठा आंदोलकांचा मोर्चा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी होणार असल्याने मुंबईतील मैदाने सरकारने उपलब्ध करून द्यावीत असही मनोज जरांगे पाटील म्हणाले.