मंदिर शिल्पकलेचा देदीप्यमान वारसा म्हणजे श्रीराम मंदिर!

29 Dec 2023 12:31:30
shri ram mandir
 
नवी दिल्ली : ‘मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे’ अशी घोषणा देशातील हिंदू समाजाने ९० च्या दशकात दिली होती. अयोध्येत श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्याच्या तब्बल ५०० वर्षांच्या लढ्याचे ही घोषणा एक प्रतीक होती. हिंदू समाजाच्या लढ्यास यश येऊन अखेर मंदिराची उभारणी निर्णायक टप्प्यात आली असून, दि. २२ जानेवारी रोजी श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिर प्रकल्पाचे मुख्य अभियंते आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, ज्येष्ठ स्थापत्त्य अभियंते जगदीश आफळे यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी अयोध्येतून साधलेला हा विशेष संवाद. श्रीराम मंदिराच्या उभारणीच्या कार्यासोबत आपण कसे जोडला गेला आणि त्याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया काय होती?
 
श्रीराम जन्मभूमीविषयी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर अत्यानंद झाला होता आणि आता मंदिराचे बांधकाम नक्कीच सुरू होणार, याची खात्री पटली होती. मात्र, मलादेखील त्यामध्ये सहभागी होता येईल, अशी कल्पना नव्हती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी मधुभाई कुलकर्णी यांच्याशी चर्चा करताना मंदिराच्या उभारणीविषयी काही सूचना कराव्यात, असे मनात आले. त्यानुसार कुलकर्णी यांच्याकडे मी माझ्या अभ्यासानुसार काही टिपणे पाठविली. त्यानंतर भैय्याजींकडून मला स्पष्ट निरोप आला की आता तुम्ही अयोध्येतच चला. त्यानंतर प्रारंभी माझी भूमिका मंदिराविषयी संतसमुदायाशी चर्चा करण्यापुरतीच मर्यादित होती. त्यानंतर मी मंदिर उभारणीच्या कामात पूर्णवेळ कसा ओढला गेलो; हे मलाही समजले नाही. त्यानंतर मग विविध सहकार्यांसह मी माझ्या कामाला प्रारंभ केला. मात्र, एकेकाळी श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय असलेल्या मला श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्ये मिळालेल्या या जबाबदारीविषयीची माझा आनंद हा शब्दातीत आहे.
 

shri ram mandir 
 
मंदिर उभारणीची तयारी कशी सुरू झाली?
मंदिर परिसराचा नकाशा यापूर्वीच म्हणजे श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या काळातच तयार करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये कालानुरूप आणि आवश्यक असे बदल प्रथम करण्यात आले. त्यासाठी स्टॅबिलिटी एनालिसिस, डिझाईन एनालिसीस करण्यात आले. उदाहरणार्थ, मंदिराच्या उभारणीसाठी शिळा घडविण्याचे काम ९० च्या दशकापासूनच सुरू होते. मात्र, त्यातील काही शिळा आता वापरता येणे शक्य नव्हते. अशाप्रकारे लहान लहान बाबींचा विचार करून मंदिर आणि मंदिर संकुल कसे असावे, याचा नव्याने विचार करण्यात आला.
 
प्रारंभी कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?
जन्मभूमीस्थळी मंदिर उभारणीमधील सर्वांत मोठे आव्हान होते ते शरयुतीरी असलेली वालुकामय जमीन. संपूर्णपणे पाषाणामध्ये बांधण्यात येणार्या मंदिराचा भार ही जमीन पेलू शकणार का, याचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यानंतर मंदिराचा पाया उभारण्यासाठी सुमारे १४ मीटरपर्यंत खोदकाम करून वाळू काढण्यात आली आणि त्यानंतर रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीटचे ५६ थर टाकून भक्कम अशा कृत्रिम खडकाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे शरयूस येणारे पूर पाहता मातीची धूप रोखण्यासाठी भक्कम अशी रिटेनिंग वॉलदेखील उभारण्यात आली आहे. खरे सांगायचे तर वैयक्तिक क्षमतांचा कस या कामात लागला होता.
 
कारण, आम्हाला असलेला अनुभव आणि येथे प्रत्यक्ष असलेल्या गरजा यामध्ये साहजिकच खूप मोठा फरक होता. त्यामुळेच भारतातील सर्व अभियांत्रिक आणि तंत्रज्ञानविषयक संस्थांची आम्ही मदत घेण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापनात्मक आणि अभियांत्रिकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी माझा अनेक कारखाने उभारण्याचा अनुभव नक्कीच कामी आला. प्रारंभीच्या काळी भारतासह जगभरात कोरोनाची साथही होती. त्या आव्हानाचाहीसामना आम्ही यशस्वीपणे केला आहे. त्याचवेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारसह सर्वसामान्य जनताही आव्हानांचा सामना करण्यासाठी आमच्या पाठीशी असल्याचा विश्वास आमच्यासाठी महत्त्वाचा होता.
 
मंदिराचा पाया ते कळस आणि मंदिर संकुलातील अन्य वास्तूंच्या उभारणीमध्ये कोणकोणते तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे?
मंदिराच्या उभारणीमध्ये वालुकामय जमिनीचे आव्हान होते, हे मी सांगितलेच आहे. त्यामुळे प्रथम जमिनीस मजबूत करण्यासाठी सिमेंटचे विविध प्रकार, विशेष पद्धती आणि विविध प्रयोग करण्यात आले. कारण, मंदिर उभारणीसाठी सर्वांत आधुनिक तंत्रज्ञानच वापरायचे, अशी आमची भूमिका होती. त्यासाठी ‘आयआयटी’ दिल्ली, गुवाहाटी, मुंबई, चेन्नई यांच्यासह ‘सीबीआरआय’ रूरकी आणि हैदराबाद येथील ‘एनजीआरआय’ या संस्थांनी सहभाग घेतला. बंगळुरुच्या ‘इंडियन इन्स्टिट्युट ऑफ रॉक मेकॅनिक्स’ने तर मंदिराच्या उभारणीमध्ये वापरात येणारी प्रत्येक शिळा आम्हाला तपासून दिली आहे.
 
मंदिर संपूर्णपणे पाषाणात बांधण्यात येत आहे, त्यासाठी धातूचा वापर करताना स्टीलचा वापर करण्याऐवजी तांब्याचा, ब्रासचा वापर करण्यात आला आहे. अगदी पंखादेखील लावायचा असेल, तर त्यातही स्टीलचा वापर टाळला आहे. अंतर्गत दिव्यांची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
 
श्रीराम मंदिराच्या स्थापत्त्याची वैशिष्ट्ये काय सांगता येतील?
 - श्रीराम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधण्यात आले आहे. मंदिर शिल्पकलेचा देदीप्यमान वारसा म्हणजे श्रीराम मंदिर!
- मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.
- मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २० फूट आहे. मंदिरात एकूण ३९२ खांब, ४४ द्वार आहेत.
- तळमजल्यावरील गर्भगृहात (गाभारा) भगवान श्रीरामाच्या बालस्वरुप विग्रह विराजमान होणार असून पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार असेल.
- नृत्य मंडप, रंगमंडप, गूढ मंडप (सभा मंडप), प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत.
- खांब आणि भिंतींमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.
- पूर्वेकडून ३२ पायर्या (उंची १६.५ फूट) चढून सिंहद्वारमधून मंदिरात प्रवेश मिळेल (अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सोय करण्यात आली आहे).
- सभोवताली गोल भिंत (आकाराची) - लांबी ७३२ मीटर, रुंदी ४.२५ मीटर आहे.
- उद्यानाच्या चार कोपर्यात सूर्य, शंकर, गणपती, देवी भगवती अशी चार मंदिरे. उद्यानाच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरेला अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे.
- मंदिराच्या दक्षिणेकडे पौराणिक सीताकूप आहे.
- उद्यानाच्या बाहेर दक्षिण दिशेला महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे प्रस्तावित मंदिर आहे.
 
एक अभियंता म्हणून तुम्ही या प्रकल्पाकडे कसे पाहता ?
मंदिराच्या बांधकामाचा मला अनुभव नाही. त्याचप्रमाणे बांधकाम करणार्या ‘एल अँड टी’ या कंपनीसदेखील मंदिर उभारणीचा अनुभव नाही. त्यामुळे आमच्या सर्वांसाठी मंदिर उभारणीचा हा पहिलाच प्रकल्प आहे. उभारणीत वापरत असलेले तंत्रज्ञान भारतीय हवामान, भारतीय पद्धती, भारतीय स्थापत्त्यकला यानुसार वापरले आहे. वानगीदाखल सांगायचे तर दगडात दगड अडकविण्यासाठी सांधे वापरण्याची पद्धत आपल्याकडे पूर्वी होती. आम्ही ते प्रत्यक्षात करून बघितले. मंदिराचे जे स्तंभ आहेत, ते करताना त्यामध्ये सहा तुकडे आहेत. मात्र, प्रत्येक तुकडा एकमेकांवर नेमकेपणाने बसावा, यासाठी काळजी घेण्यात आली आहे. कारण, याच स्तंभांचा मंदिराचा भार तोलून धरायचा आहे.
 
अशा विविध बाबींचा अभ्यास या प्रकल्पात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मंदिर बांधण्याचा अनुभव नसलेले सुमारे साडेचार हजार लोक एकत्र येऊन काम करत आहेत आणि त्यांना यशही येत आहे. कदाचित पूर्वीच्या काळी एखादे मंदिर बांधण्यास २२ ते २५ वर्षे लागली असतील. मात्र, आपल्याला अवघ्या चार ते पाच वर्षांतच हे मंदिर बांधायचे, या जिद्दीने सर्वजण उभे राहिले आहेत. त्यामुळे सकाळी कामाची सुरुवातच ‘जय श्रीराम’ने होते. मंदिराच्या बांधकामामध्ये आजपर्यंत एकही लहान अथवा मोठा अपघात झालेला नाही. हेदेखील एक अभियंता म्हणून माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
 
श्रीराम मंदिर आत्मनिर्भर कसे ठरणार आहे ?
मंदिराच्या उभारणीमध्ये भारतीय कंपन्यांचाच सहभाग आहे. एखाद्या परदेशी कंपनीस कंत्राट दिले असून ते काम करत आहेत, असे अजिबातच नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचा चिनी माल या मंदिराच्या उभारणीमध्ये वापरण्यात आलेला नाही. एकवेळी युके किंवा अमेरिका, जपान आदी देशांमधील माल वापरण्यात आला असेल. मात्र, चिनी मालाचा वापर जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. यामध्ये ९५ टक्के भारतीय मालाचाच वापर करण्यात आला असून अन्य पाच टक्के मालासाठी चीन वगळता युके, अमेरिका, जपानमधील मालास प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडून उभारणीची सामुग्री घेण्यात येते, त्यांनादेखील चिनी माल नको असे स्पष्टपणे सांगितले आहे. विशेष म्हणजे हे करताना आमचे काम अडले नाही. अगदी अडचणी आलीच तर त्यातून आम्ही मार्ग काढला. उदाहरणार्थ, विशिष्ट पद्धतीचेच लाईटनिंग अरेस्टर्सची गरज होती. त्यासाठी भारतातीलच माल घेऊन त्याची जर्मनी व स्पेनमध्ये तपासणी करून भारतीय तंत्रज्ञानाने तयार केलेले अरेस्टर्सही जागतिक दर्जाचे असल्यावर शिक्कामोर्तब करून घेऊन त्याचा वापर केला. ‘जिद्दीने केले, तर सर्वकाही शक्य आहे’ या ध्येयानेच आम्ही कार्यरत आहोत.
 
त्याचप्रमाणे दरदिवशी हजारो भाविक मंदिरात येणार आहेत. त्यासाठी मंदिर संकुलात विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. मात्र, या सेवा सुविधांचा भार अयोध्या महानगरपालिकेवर पडणार नाही. पाण्यासाठी मंदिर संकुलात स्वतंत्रपणे भूमिगत पाणी साठवले जाणार असून त्याचा भार शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर पडणार नाही. त्याचप्रमाणे विजेचीही स्वतंत्र वाहिनी मंदिर संकुलात जोडण्यात आली आहे. अग्निशमन दलासाठीदेखील पाण्याची व्यवस्था मंदिर संकुलातच करण्यात आली आहे. सुमारे ७० एकर परिसरात मंदिराव्यतिरिक्त स्वच्छतागृह संकुल, रुग्णालय, पादत्राणे, मोबाईल फोन ठेवण्यासाठी स्वतंत्र संकुल असणार आहे. त्यामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिर हे ’मंदिर इकोसिस्टिम’ कशी असावी, याचा नवा आदर्श निर्माण करणार आहे.
 

shri ram mandir 
 
अयोध्या व श्रीराम मंदिर संकुल भारतासाठी कशाप्रकारे महत्त्वाचे ठरणार आहे ?
श्रीराम मंदिर हे जगात सर्वोत्तम ठरण्यासाठी जे-जे काही आवश्यक आहे, ते-ते सर्वकाही आम्ही करत आहोत. श्रीराम मंदिर आणि अयोध्या हे तीर्थस्थळ - सांस्कृतिक स्थळ आणि पर्यटनस्थळही असेल. भारतीय मंदिर शिल्पकला, वास्तूकला, मूर्तीकला एकेकाळी जगभरात आश्चर्याची बाब ठरत होती. अलीकडच्या काळात तोच देदीप्यमान वारसा पुन्हा एकदा श्रीराम मंदिराच्या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर येणार आहे. पुढील दोन वर्षांत मंदिर संकुलाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या हजार वर्षातल्या आपल्या अनेक पिढ्यांसाठी हे मंदिर पथदर्शक ठरणार आहे. त्यामुळे हे श्रीराम मंदिर खर्या अर्थाने राष्ट्रमंदिर ठरणार आहे.
जगदीश आफळे
श्रीराम मंदिर प्रकल्पाचे मुख्य अभियंते आणि रा. स्व. संघाचे स्वयंसेवक
Powered By Sangraha 9.0