रसिका शिंदे-पॉल
मुंबई : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच तिच्या सोशल मिडियावरील मालवणी भाषेतील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेच असते. याशिवाय राजकारण, सामाजिक स्थिती अशा विविध विषयांवर ती आपली मते परखडपणे मांडत असते. याशिवाय ती स्वत: मालवणी असल्यामुळे तेथील पर्यटनस्थळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती व्हिडिओ करुन लोकांना त्या ठिकाणांबद्दल वेळोवेळी माहिती देखील देत असते. परंतु, कोकणातील पर्यटन आणखी सुधारावे अशी अपेक्षा अंकिताने ‘महाएमटीबी’शी बोलताना व्यक्त केली.
अंकिता म्हणाली, “कोकणातील अशीच बरीच पर्यटन स्थळे किंवा ठिकाणं आहेत जी अजून जगासमोर आली नाही आहेत. परंत, जरी एक सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर आणि कॉंटेन्ट क्रिएटर म्हणून मी जर त्या ठराविक ठिकाणी जाऊन व्हिडिओ केले आणि ते ठिकाण पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली तर तेथील गावकऱ्यांना ती गर्दी सांभाळण्यासाठी उपयुक्त यंत्रणा किंवा सामग्री आहे का? याचा देखील विचार केला पाहिजे. मी सिंधुदुर्गातील पर्यटनाविषयी सांगेन की तिथे माझ्या बाजूच्या माणसांनी लोकांना राहायला जागा केली आहे तर मी पण घरात दोन खोल्या वाढवून व्यवसाय सुरु करेन अशी मानसिकता आहे. परंतु, त्यात कुठेही पर्यटनाविषयी शिक्षण न घेता किंवा अभ्यास न करता उभारलेली राहण्याची ठिकाणे आहेत. तिथे लोकांना पर्यटन म्हणजे नेमकं काय याची व्याख्याच माहित नसल्यामुळे केवळ पर्यटकांना राहायला जागा देऊन, जेवण देऊन पैसे कमवणे हिच त्यांच्यासाठी मोठी बाब आहे. परंतु, हे बदलणं फार गरजेचे आहे,” असे ठाम मत अंकिताने मांडले. तसेच, नुकतीच ती परदेशी जाऊन तेथील पर्यटन कसे असते याचा अभ्यास देखील करुन आल्याचे तिने सांगितले.
स्मृती इराणींच्या मासिक पाळीबद्दलच्या विधानाला अंकिताचा पाठिंबा
अंकिता म्हणाली, “स्मृती इराणी मला व्यक्ती म्हणून देखील खुप आवडतात. नुकतेच त्यांनी मासिक पाळीबद्दल वक्तव्य केले होते. की मासिक पाळीसाठी महिलांना सुट्टीची गरज नाही हे त्यांचं स्पष्ट मत मला पटलं. त्यांचं ते बोलणं बऱ्याच जणांना पचणी पडलं नाही आणि त्यामुळे त्यांना ट्रोल केलं गेलं. इतकंच नाही तर एक महिलाच महिलांची वैरी होऊ शकते असं देखील म्हटलं गेलं. परंतु, मासिक पाळीबद्दल किंवा एकूणच महिलांबद्दल इतकं मोठं वक्तव्य करताना स्मृती यांनी कुठेच हा विचार केला नाही की आता लोकसभेच्या निवडणूका तोडांवर आल्या आहेत तर मी महिलांच्या बाजूने बोलले पाहिजे. त्यांनी अतिशय योग्य भाष्य केले आहे”, असे प्रामाणिक मत अंकिता वालावलकर हिने दिले.