लोकसभेच्या निवडणुका दृष्टिपथात दिसू लागल्या की, देशातील काही लब्ध प्रतिष्ठित ख्रिश्चन मंडळींना आपला धर्म आणि आपल्या संकटात नसलेल्या धर्मबांधवांवर ओढावणार्या संकटांचे उमाळे येऊ लागतात. हे सगळे उमाळे धर्माच्या नावाखालचे असले, तरी ते राजकीयच असतात. कारण, कोणत्याही एकेश्वरवादी धर्माची शिकवण ही सरतेशेवटी राजकीयच असते; भले त्यांनी काळे बुरखे घालोत किंवा पांढरे झगे, उद्देश खरा राजकीयच!
गोव्यात एका कार्यक्रमात बोलताना ज्युलियो रिबेरो म्हणाले की, “पाकिस्तानात हिंदू आणि ख्रिश्चनांना दुय्यम नागरिकांची जागा मिळते. मला भीती वाटते की, एक दिवस भारतातही तसेच होईल.” यापुढे त्यांनी नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आपल्या निवासस्थानी नाताळच्या स्नेहमिलनावरही राजकीय संशय व्यक्त केला.
ख्रिस्ती समुदायाचे आणि आपले नाते जुने असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर, सारा देश आज जसा मोदीमय झाला आहे, तसे ख्रिस्ती लोकही मोदीमय होईल, अशी या मंडळींची भीती. नाताळनिमित्त जे लोक पंतप्रधानांना भेटले, त्यांनी नंतर उत्साहाने सोशल मीडियावर स्वतःचे अनुभव लिहिले. ते सगळेच सकारात्मक आणि उत्साहपूर्ण. आता याचा अर्थ अखिल हिंदुस्थानातील ख्रिस्त्यांची मते भाजपच्या पदरात पडणार आहेत, असा अर्थ खुद्द मोदींनीही काढलेला नसावा.
मात्र, केवळ आपल्या धर्माच्या नावावर आपले अस्तित्व टिकवून असलेल्या मंडळींना मात्र असुरक्षित वाटायला सुरू झाले आहे. खरे तर रिबेरो हे भले गृहस्थ. पंजाबमधील दहशतवाद संपुष्टात आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, आता त्यांचे नव्याने पंजाबात बिघडलेल्या परिस्थितीवर काहीएक भाष्य नसते, ते असते केवळ भाजपच्या विरोधात. यापूर्वीचे त्यांचे लिखाण असेच एककल्ली. ‘टॉपकॉप’ म्हणून प्रसिद्धी पावलेले रिबेरो एकाएकी ख्रिश्चन होतात आणि हिंदुत्ववादी चळवळीविषयी संशय व्यक्त करायला सुरुवात करतात. हे मियाँ जावेद अख्तरसारखे! म्हणून सोयीचे तेव्हा मुसलमान, नाही तर नास्तिक, मग कधी रामभक्त. एक ना अनेक. ज्या गोव्यातून रिबेरो यांनी ही विधाने केली आहेत, त्यांनी ती करण्यापूर्वी गोव्यातला ‘हात कातरो खांब’ पाहिला असेल, अशी अशा बाळगायला हरकत नाही.