सी-व्होटर सर्व्हेबाबत काय म्हणाले बावनकुळे? वाचा सविस्तर...

27 Dec 2023 17:59:22

Bawankule


सोलापूर :
१५०० लोकांच्या सी व्होटर सर्व्हेमधून कसं काय कौल ठरवता येईल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. ते सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून बुधवारी पंढरपूर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सी व्होटर सर्व्हेबाबतही भाष्य केले.
 
महाविजय २०२४ अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सोलापूर लोकसभा क्षेत्राचा प्रवास केला. त्यावेळी ते पंढरपूर येथे माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधत होते. राज्यभर प्रवास करताना ४७ हजारांहून अधिक लोकांनी मोदींनाच पंतप्रधान म्हणून संमती दिली आहे, असे सांगून ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील केवळ १५०० लोकांच्या मतांच्या आधारावर कोणताही सर्वे केला जाऊ शकत नाही. प्रत्येक लोकसभा क्षेत्रात २५ लाखाहून अधिक मतदार असताना काही १२-१५ लोकांच्या मतांना जनमताचा आधार देता येत नाही. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागांवर महायुतीचे उमेदवार विजय मिळवतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
सोलापूर प्रवासात त्यांच्यासोबत खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार समाधान अवताडे, सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख, आ. विजय देशमुख, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र भाजपा विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, लोकसभा समन्वयक अमर साबळे, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर दक्षिण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, प्रशांत परिचारक, उदयशंकर पाटील यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
 
• सर्वांचे मंगल व्हावे - विठ्ठलचरणी प्रार्थना
 
प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात दुष्काळ येऊ नये, राज्यात कुठेही आपत्ती किंवा दुघर्टना होऊ नये, राज्यातील सर्व जनतेचे मंगल व्हावे, असे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातल्याचे त्यांनी सांगितले.
 
• विकसित भारत संकल्प यात्रा - सरकारी कार्यक्रम
 
विकसित भारत संकल्प यात्रा राजकीय नाही तर सरकारने काढलेली व प्रशासनाचा सहभाग असलेला शासकीय कार्यक्रम आहे. मोदी सरकारने मागील ९ वर्षांच्या काळात आखलेल्या विविध जनकल्याणाच्या योजनांची माहिती जनतेला व्हावी व त्याच्या लाभापासून वंचित असलेल्यांना त्यांचा लाभ घेता यावा हा त्याचा हेतू आहे. जनतेनी दिलेल्या मतांचे कर्ज विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यामातून व्याजासकट परत करण्याचा हेतु त्यामागे आहे.
 
• भाजपाचा प्रत्येक नेता ६०० घरी पोहचणार
 
सोलापूर लोकसभा प्रवासात पंढरपूर येथे मोहोळ व पंढरपूर या दोन विधानसभा तर सोलापूर येथे अक्कलकोट यासह सोलापूर शहरातील उत्तर, मध्य व दक्षिण या चार विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, २०२४ मध्ये भाजपा कार्यकर्त्यांना विजय नव्हे तर महाविजय साकारायचा आहे. यात सुपर वॉरियर्स या विजयाचे शिल्पकार ठरणार आहेत. भाजपा सरकारच्या योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी दररोज तीन तास संपर्क करावा, सोबतच राज्यातील सर्व प्रमुख नेते त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील ६०० घरापर्यंत पोहचून मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणार आहेत. कुणीही मोदी सरकारच्या योजनांपासून वंचित राहू नये याकडे जातीने लक्ष घालावे, असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0