अनाथांचा आधार देव

27 Dec 2023 20:33:27
god

अजामेळाच्या या कथेतील तात्पर्यार्थ शोधताना भगवंताविषयी पूर्ण श्रद्धा, आदर व भक्तिभाव मनात ठेवला पाहिजे, तरच या कथा भागवतकारांनी का अंगीकारल्या, याचा उलगडा होईल. या कथेचा वरवर अर्थ पाहणार्‍याला असे वाटेल की, आयुष्यभर वाटेल ते पापाचरण करूनसुद्धा मरतेसमयी काही मिषाने भगवंताचे नाम मुखी आले, तर त्याची सारी पापे धुतली जातात व जीवाचा उद्धार होतो. परंतु, या कथेचा अर्थ असा घेणे बरोबर नाही.

मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे, देव भक्ताच्या ठिकाणची अनन्यभक्ती पाहतो, भक्ताच्या इतर बाबींचा परिणाम भक्तीवर होत नाही. परमेश्वर भक्तांच्या बाबतीत श्रीमंत-गरीब, बालक-वृद्ध, मानव-पशु अथवा वन्यजीव असा भेदभाव करीत नाही. भक्तिपंथात भगवंताच्या समदृष्टीचे दर्शन घडते. भक्त कसाही असला तरी देवाला खर्‍या भक्ताचा अभिमान असतो. भगवंत त्याची उपेक्षा करीत नाही. इतकेच नव्हे, तर भागवतातील ‘गजेंद्रमोक्ष’ या कथेतून हेही समजते की, भक्ताच्या संकटसमयी भक्ताने आकांताने देवाला साद घातली, तर तो भक्तासाठी धावून येतो व त्याला संकटातून बाहेर काढले, हे विचार स्वामींना श्रोत्यांच्या मनावर बिंबवायचे आहेत.

मागील श्लोकातून उल्लेखलेल्या पुराणकथांतील भक्त, म्हणजे राजा अंबरीष, गरीब घराण्यात जन्मलेला उपमन्यु, अपमानीत निश्चयी ध्रुवबाळ या सार्‍यांना पूर्वजन्मीच्या कर्मानुसार गैरसमज, शाप, दारिद्य्र, अपमानीत वागणूक इत्यादींचा भास सहन करावा लागला. तथापि ते सर्व सदाचरणी, चारित्र्यवान व नीतिवान होते, असे त्यांच्या कथांतून दिसून येते. आता ज्यांनी पूर्वायुष्यात पापाचरण केले, नीतिमानता, चारित्र्य यांना झुगारून दिले, अशा भक्तांकडे परमेश्वर कशारितीने पाहतो, त्यांना आधार देतो का? या शंकेचे उत्तर स्वामी पुढील श्लोकात देत आहेत-

अजामेळ पापी तया अंत आला।
कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला।
अनाथासि आधार हा चक्रपाणी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥११९॥


या श्लोकात ज्या पापी अजामेळ नावाच्या ब्राह्मणाचा उल्लेख आला आहे, त्या अजामेळाचा उल्लेख मनाच्या श्लोकात दोन ठिकाणी आला आहे. भागवतकारांनी पापी अजामेळाच्या कथेचा भक्तिपंथात का समावेश केला, त्यामागे भागवतकारांचा काय हेतू असावा, यावर चर्चा करण्याअगोदर अजामेळ ब्राह्मणाची मूळ हकिगत समजून घेतली पाहिजे,श्रीमद्भागवतातील कथेनुसार अजामेळ नावाचा हा ब्राह्मण सुरुवातीच्या काळात एक सदाचार संपन्न साधे जीवन जगणारा सामान्य निरुपद्रवी माणूस होता. परंतु, एकदा तो एका रुपवान गणिकेच्या संपर्कात आला. तो त्या वेश्येच्या इतका आहारी गेला की, लोकलाजेची, जननिंदेची पर्वा न करता तो तिच्याकडे सतत जाऊ लागला. तिच्याशिवाय त्याला चैन पडेना. तिच्यावर तो पैसे उधळू लागला. साहजिकच त्याला द्रव्याची कमतरता भासू लागली. त्यामुळे त्याचे समाजातील वर्तन बिघडले. तो खोटेनाटे व्यवहार करू लागला.


पापाची त्याला भीती वाटेनासी झाली. तो राजरोसपणे पाप आचरण करू लागला. त्याच्यातील नीतिमत्ता लयाला गेली. या पापाचरणी ब्राह्मणाच्या दुर्गुणाला लोक कंटाळले. त्या अजामेळाला गाव सोडून जायला सांगितले. तो गावाबाहेर एक झोपडी बांधून राहू लागला. त्याच्या पापाचरणातून, अनैतिक संबंधांतून त्याला मुलेबाळे झाली. अजामेळाला पश्चाताप झाला तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार होईना, गाव त्याला स्वीकारायला तयार नव्हते.एक दिवस एक साधुपुरुष त्याच्या झोपडीत मुक्कामाला राहिला. त्यांच्या सांगण्यावरून अजामेळाने सर्वांत धाकट्या मुलाचे नाव नारायण ठेवले. अजामेळाला या धाकट्या मुळाचा खूप लळा होता. त्यामुळे तो सतत नारायण, नारायण करीत असे, त्यांच्या तोंडी सतत नारायण नावाचा उच्चार होऊ लागला. अजामेळाचा अंतकाळ आला, तेव्हाही त्याने नारायण, नारायण करत प्राण सोडला. अंतकाळी त्याच्या मुखातून भगवंताचे नाम आल्याने पूर्वायुष्य पापाचरणात जाऊनसुद्धा तो उद्धरून गेला, असे ही कथा सांगते.या अजामेळ ब्राह्मणाचा उल्लेख मागे श्लोक क्र. ९५ मध्ये आला आहे. अर्थात तो वेगळ्या संदर्भात आला आहे. त्यातील सुरुवातीच्या ओळी अशा आहेत-


अजामेळ पापी वदे पुत्रकामें।
तया मुक्ती नारायणाचेनि नामे।

त्या ठिकाणचा उल्लेख नामस्मरणाने माणूस कसा उद्धरून जातो, हे सांगण्यासाठी आला आहे हे उघड आहे. परंतु, प्रस्तुत श्लोक क्र. ११९ मध्ये अजामेळाच्या कथेचा उल्लेख हे सांगण्यासाठी आला आहे की, अत्यंत दीन झालेल्या माणसाला जेव्हा कोणाचाही आधार नसतो, तेव्हा भगवंत त्याच्या पापी पूर्वायुष्याचा विचार न करता अनाथाला हात देतो आणि त्याचा उद्धार करतो. समाजबहिष्कृत पापी अजामेळाला मृत्यूसमयी पुत्रप्रेमाने का होईना, नारायण हे भगवंताचे नाव अजामेळाच्या मुखी आल्याने भगवंतांनी त्याला मृत्यूनंतर चांगली गती दिली, असा या कथेचा सारांश आहे. म्हणून स्वामी या श्लोकाच्या ओळीत सांगतात की, ‘कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला।’ हे सांगून झाल्यावर स्वामींनी एक महत्त्वपूर्ण विचार पुढे मांडला आहे, ‘अनाथासि आधार चक्रपाणी॥’

अजामेळाच्या या कथेतील तात्पर्यार्थ शोधताना भगवंताविषयी पूर्ण श्रद्धा, आदर व भक्तिभाव मनात ठेवला पाहिजे, तरच या कथा भागवतकारांनी का अंगीकारल्या, याचा उलगडा होईल. या कथेचा वरवर अर्थ पाहणार्‍याला असे वाटेल की, आयुष्यभर वाटेल ते पापाचरण करूनसुद्धा मरतेसमयी काही मिषाने भगवंताचे नाम मुखी आले, तर त्याची सारी पापे धुतली जातात व जीवाचा उद्धार होतो. परंतु, या कथेचा अर्थ असा घेणे बरोबर नाही. भागवतकारांनी अजामेळ किंवा पिंगला नामक वेश्येची कथा (श्लोक क्र. ९५), संकटसमयी भगवंताचा आधार असतो हे सांगण्यापुरत्या घेतल्या आहेत. त्यातील तार्किकता शोधत गेलो, तर त्यातून भलतेच अर्थ प्रतीत होईल. तेव्हा शहाण्याने तसे करू नये. भक्तिमार्गात साधकाच्या ठिकाणी विवेक, चारित्र्य, नीतिमत्ता यांना महत्त्वाचे स्थान आहे, हे विसरून चालणार नाही. भागवतातील पुराणकथा भगवंताचा नि:पक्षपातीपणा, कृपाळूपणा, अनाथांचा कैवारी हे दाखवण्यासाठी समाविष्ट केलेल्या आहेत. हे भगवंताचे गुण ऐकून आपण त्याची अनन्यभावे भक्ती करावी. भगवंत कोणत्याही परिस्थितीत भक्ताची उपेक्षा करीत नाही. भक्ताचा देवाला अभिमान असतो, असे सांगून लोकांना भक्तिमार्गाकडे वळवावे हा समर्थांचा हेतू आहे.
 
-सुरेश जाखडी


Powered By Sangraha 9.0