सिंधुदूर्ग : नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. २ मार्च २०२४ मध्ये ही जत्रा असल्याचं आंगणे कुटुंबियांनी जाहीर केलं आहे. कोकणात आंगणेवाडी जत्रेला विशेष महत्त्व आहे. या जत्रेला देशभरातून भाविक पोहोचतात. भराडी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी सुमारे लाखो भाविक येथे येतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या दिवशी धार्मिक भजनांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
प्रथेनुसार, देवीला कौल लावून जत्रेची तारीख निश्चित केली जाते. आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबाची ही देवी आहे. मात्र नवसाला पावणारी देवी असा या देवीचा लौकिक आहे. देवीचं दर्शन सगळ्यांसाठी खुले असते. मागच्या वर्षी या देवीच्या यात्रेला सात लाख भाविकांची उपस्थिती होती. यावर्षी ही संख्या आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
मंदिराची स्थापना कशी झाली?
मालवण तालुक्यात असलेल्या मसुरे गावात आंगणेवाडी नावाचे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. अंगणेवाडी मंदिराच्या संदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. अशाच एका कथेनुसार, एके दिवशी एका गावकऱ्याने पाहिले की, एका गायीने जंगलात दूध दिले तेव्हा त्या दुधाचे दगडात रूपांतर झाले. गावकऱ्याने ही गोष्ट गाईच्या मालकाला सांगितल्यावर मालकाला सत्य पाहून आश्चर्य वाटले. त्याच दिवशी त्यांना स्वप्नात संदेश मिळाला की, हा दगड योग्य ठिकाणी बसवून त्याची नित्य पूजा केल्यास त्यांचे सर्व संकट दूर होतील. ही बातमी गावात, शहरात पसरली. त्या खडकाचे दर्शन व पूजा करण्यासाठी लोक त्या ठिकाणी येऊ लागले. त्या भागातील खडकाळ मातीला भराडी म्हणत असल्याने देवीला भराडी या नावाने ओळखले जाऊ लागले. येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जत्रेच्या तारखा निश्चित केल्या जातात. येथे जत्रेची कोणतीही निश्चित तारीख नाही. येथे मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक यांच्या परस्पर संमतीने जत्रेची तारीख ठरवली जाते.