महाराष्ट्राच्या विकासाचा ‘अटल’ सेतू

25 Dec 2023 14:07:20

MTHL


मुंबई, दि. २५ :
देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग अशी ओळख असलेल्या ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे’ लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाचा हा अटल सेतू ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या सागरी सेतूची ९८ टक्के कामे पूर्ण झाली असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली आहे.
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू या 21.8 किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गामुळे नवी मुंबई ते मुंबई हे अंतर 20 ते 25 मिनिटांत विनाअडथळा पार करता येणार आहे. प्रकल्पामध्ये शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा शेवा यांना जोडणार्‍या, सुमारे 22 किमी लांबीच्या सहा पदरी पुलाचा समावेश आहे. 100 किमी/तास या वेगाने या पुलावरून वाहतूक होणार असल्याने वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे. नवी मुंबईतील उरण, उलवे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेशी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याने, या प्रवासालादेखील गती मिळणार आहे. मुंबई व नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गातील अंतर सुमारे 15 किमी कमी झाल्यामुळे इंधन, वाहतूक खर्च आणि वेळेत सुमारे एका तासाची बचत होणार आहे.


प्रकल्पाची पार्श्वभूमी

राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असताना, 15 वर्षांहून अधिक काळ या प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र, राज्यात सत्तांतर होताच, देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात या प्रकल्पाला खर्‍या अर्थाने गती मिळाली. मात्र 2019 मध्ये आलेल्या ठाकरे सरकारच्या काळात प्रकल्प उभारणी मंदावली. त्यानंतर 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन, महायुतीचे सरकार स्थापन झाल्याबरोबर, या प्रकल्पाला पुन्हा वेग आला. हा सागरी सेतू पूर्ण होताच, भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले जाणार आहे.

उर्वरित कामे प्रगतिपथावर

सागरी मार्गिकांवरील डांबरीकरणाचे काम सर्व पॅकेजेसमध्ये पूर्ण झाले आहे. याचसोबत अत्याधुनिक टोल यंत्रणेची कामे 98 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. हा सागरी सेतू नवी मुंबईतील चिर्ले येथे उतरतो. चिर्लेतील सर्व रॅम्प्स आणि सर्व्हिस रोड क्रमांक 2 ची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच चिर्ले सर्व्हिस रोड क्रमांक 1 ची 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पात चार आंतरबदल देण्यात आले आहेत. नवी मुंबईत शिवाजीनगर येथे आंतरबदल देण्यात आला आहे. या शिवाजीनगर जोड रस्त्यांची 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. याचसोबत, पॅकेज 3 सिव्हिलची कामे जवळ-जवळ पूर्ण झाली आहेत. पॅकेज-3अंतर्गत मार्गदर्शक फलक बसवणे व रोड मार्किंगची कामे प्रगतिपथावर आहे. पॅकेज 1 व 2 अंतर्गत क्रॅश बॅरिअर रंगविणे, मार्गदर्शक चिन्हे-फलक बसविणे, दृश्य अडथळे व ध्वनिरोधक बसविणे इत्यादी कामे सुरू आहेत. पॅकेज 3अंतर्गत चिन्हे बसवणे आणि रोड मार्किंगचे कामे सुरू आहेत. त्यामुळे लवकरच ही कामे पूर्ण करून या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात येईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

अटल सेतू भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगभरातील दहाव्या क्रमांकाचा सागरी सेतू आहे. पुलाच्या उभारणीत ’ऑर्थोट्रोपिक स्टील डेक’ पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर करण्यात आला आहे. सुमारे 500 बोईंग 747 विमानांच्या वजनाइतका म्हणजेच 85000 मे.टन ऑथोट्रोपिक स्टील, सुमारे 17 आयफेल टॉवरच्या वजनाइतक्या म्हणजेच 1,70,000 मे. टन स्टीलच्या सळ्या, पृथ्वीच्या व्यासाच्या चार पट म्हणजेच सुमारे 48,000 किमी लांबीच्या प्रिस्ट्रेसोंग वायर्सचा वापर करण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुतळ्याकरिता वापरण्यात आलेल्या, काँक्रीटच्या सहा पट म्हणजेच सुमारे 9,75,000 घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. बुर्ज खलिफाच्या 35 पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किमी लांबीच्या पाईल लाईनर्सचा प्रकल्पात वापर करण्यात आला आहे. प्रकल्पात वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे पुढील 100 वर्षे हा पूल अखंडितपणे यावरून वाहतूक सुरू राहील.
प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन

प्राधिकरणामार्फत प्रकल्प राबविताना प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्यात आले असून, प्रकल्पबाधित मच्छीमारांना शासनाच्या धोरणानुसार नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0