काठमांडू : राममंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी नेपाळ विविध प्रकारची स्मृतीचिन्हे पाठवणार आहे. ज्यामध्ये विविध प्रकारचे दागिने, भांडी, कपडे आणि मिठाई यांचा समावेश आहे. माय रिपब्लिका या नेपाळी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ही स्मृतिचिन्हे जनकपूरधाम ते अयोध्याधाम असा प्रवास करणार आहेत. हा प्रवास जलेश्वर नाथ, मलंगवा, सिमरौनगड, गधीमाई, बीरगंज ते बेतिया, कुशीनगर, सिद्धार्थनगर गोरखपूर मार्गे केला जाणार आहे.
ही स्मृतिचिन्हे १८ जानेवारीला नेपाळच्या जनकपूरधाम येथुन निघतील व २० जानेवारीला अयोध्येत पोहोचतील. २० जानेवारीलाच ही स्मृतिचिन्हे श्री रामजन्मभूमी राम मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केली जातील असे जानकी मंदिराचे संयुक्त महंत रामरोशन दास वैष्णव यांनी सांगितले. २२ जानेवारी ला अयोध्येमध्ये प्रभु श्रीरामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
तत्पूर्वी, नेपाळमधील कालीगंडकी नदीपात्रातून गोळा केलेले शालिग्राम दगड रामाची मूर्ती बनवण्यासाठी अयोध्येला पाठवण्यात आले होते, जी उद्घाटनाच्या दिवशी मंदिरात स्थापित केली जाईल. या शिळांपैकी एका शिळाचे वजन २६ टन तर दुसऱ्या शिळाचे वजन १४ टन होते. या शिळा सुमारे ६ कोटी वर्षे जुने असल्याचा दावा केला गेला होता.