नवी दिल्ली : पुणे ISIS मॉड्युल प्रकरणात ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आलेल्या शाहनवाज आलमचा, महाराष्ट्र ISIS मॉड्युल मास्टरमाइंड साकिब नाचन याच्याशीही संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. फ्री प्रेस जर्नलच्या एका अहवालातुन ही माहिती उघड करण्यात आली आहे. साकिबला एनआयएने ९ डिसेंबर रोजी अटक केली होती. दरम्यान, शाहनवाजच्या अटकेच्या काही महिन्यांपूर्वी साकिबचा मुलगा शमिल नाचन यालाही ऑगस्टमध्ये पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी एनआयएने अटक केलेले १५ जण महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आहेत. या संपूर्ण मॉड्यूलचा मास्टरमाइंड साकिब नाचन (६३ वर्षे) असल्याचा दावा एनआयएने केला आहे. नाचननेच या लोकांना दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील करून घेतले. एनआयएचा दावा आहे की हे मॉड्यूल देशभरात दहशतवादी कारवाया करण्याची योजना आखत होते.
साकिब नाचन 1990 पासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. त्याच्यावर अनेक दहशतवादी गुन्हे दाखल आहेत. 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला खलिस्तानी दहशतवाद्यांच्या सहकार्याने दहशतवादी हल्ल्यांची योजना केल्याबद्दल दोषी ठरवले. 2002-03 च्या मुंबई बॉम्बस्फोटातही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि 2016 मध्ये मुंबई न्यायालयाने त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्याने दोन्ही शिक्षा पूर्ण केल्या आणि 2017 मध्ये त्याची सुटका झाली. यापूर्वी, त्याचा मुलगा शमिल नाचन याला एनआयएने महाराष्ट्र ISIS मॉड्यूलशी संबंधित एका दहशतवादी प्रकरणात अटक केली होती.