पुणे : हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत या, रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त पुण्यात संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अटल संस्कृती गौरव पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवभारताची संकल्पना मांडली पण त्याची सुरुवात अटल बिहारी वाजपेयींनीच केली. अटलजींना हिणवण्याकरिता एकदा लोकसभेत विरोधकांनी विचारलं की, तुमच्या कार्यक्रमात राम मंदिरही नाही आणि ३७० कलमही नाही. यावर अटलजी म्हणाले की, आम्ही राम मंदिरही विसरू शकत नाही, कलम ३७० ही विसरू शकत नाही आणि समान नागरी कायदाही विसरणार नाही. आज आमचं २२ पक्षांचं सरकार आहे पण ज्यादिवशी या देशात आमचं सरकार येईल तेव्हा राम मंदिरही बनेल आणि कलम ३७० ही रद्द होईल."
"आता मोदीजींच्या नेतृत्त्वात सरकार तयार झालं आणि कलम ३७० ही गेलं आणि आता २२ तारखेला राम मदिराचं उद्धाटनही होत आहे. आज काही लोक विचारतात की, राम मंदिर तुमची खाजगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोकं आहेत जे म्हणायचे की, 'मंदिर वहीं बनायेंगे लेकिन तारीख नहीं बताऐंगे.' तुमच्या छातीवर चढून मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली. हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत या. तुम्हालादेखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू. अटलजींनी पाहिलेलं स्वप्न मोदीजींनी पुर्ण करून दाखवलं आहे," असेही ते म्हणाले.