अयोध्या : अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू असून यासंदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी अयोध्येच्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाची चाचणी घेण्यात आली. यादरम्यान विमान धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरवण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. ३० डिसेंबरलाच इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेस दिल्ली ते अयोध्येपर्यंतचे त्यांचे उद्घाटन विमान चालवतील. कंपनीच्या निवेदनानुसार, दिल्लीहून विमान ३० डिसेंबरला अयोध्या विमानतळावर पोहोचेल. यानंतर पुढील वर्षी 6 जानेवारी 2024 पासून दिल्ली आणि अयोध्या दरम्यान थेट विमानसेवा सुरू होईल आणि त्यानंतर लगेचच अहमदाबाद आणि अयोध्या दरम्यान 11 जानेवारी 2024 पासून आठवड्यातून तीन दिवस उड्डाणे सुरू होतील.
६ जानेवारी रोजी पहिले विमान दिल्लीहून सकाळी ११.५५ वाजता उड्डाण करेल आणि दुपारी १.१५ वाजता अयोध्येला पोहोचेल. हे विमान अयोध्येहून दुपारी 1.45 वाजता सुटेल आणि दुपारी 3 वाजता दिल्लीला पोहोचेल. सध्या इंडिगो एअरलाइन्समध्ये ६ जानेवारीला दिल्ली ते अयोध्येचे भाडे ७,७९९ रुपये आहे.