लोकसंस्कृतीचे लोकऋषी ‘पद्मश्री’ प्रभाकर मांडे!

23 Dec 2023 20:06:44
Article on Folk Culture Dr. Prabhakar Mande

अगदी अलीकडेच २०२२-२३ मध्ये मांडे सरांना राष्ट्रीय पातळीवरचे सन्मान प्राप्त झाले होते. आधी ‘चतुरंग’ संस्थेचा पुरस्कार, पुणे येथे त्यांना भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. त्यानंतर भारत सरकारच्या ’संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला आणि लागोपाठ भारत सरकारचा ‘पद्मश्री’ हा मानाचा नागरी सन्मानही आदरणीय मांडे सरांना प्राप्त झाला. गेले काही दिवस ते आजारी होते, तरी लोकसाहित्याच्या क्षेत्रातील तरूण अभ्यासकांना ते मार्गदर्शन करत असत. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला आहे. मांडे सरांचे आणि माझे नाते गुरू-शिष्य असे होते. पण, ते मला धाकटा भाऊ समजत. लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी त्यांनी १९७७-७८ मध्ये ‘लोकसाहित्य संशोधन मंडळा’ची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर लोकसाहित्याची संशोधनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर उभी राहिली.

विद्यापीठ पातळीवर लोकसाहित्याचे अनेक अभ्यासक मांडे सरांच्या मार्गदर्शनाखाली घडले. ‘लोकसाहित्य संशोधन मंडळा’च्या लोकसाहित्य परिषदा ज्येष्ठ विदुषी डॉ. दुर्गा भागवत, लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली मांडे सरांनी आयोजित केल्या. छत्रपती संभाजीनगर, जुन्नर, सांगली, अहमदनगर, गोवा, श्रीगोंदा, अंबड अशा किती तरी ठिकाणी लोकसाहित्य परिषदा आयोजित झाल्या. त्यातून अनेक अभ्यासक घडले. विद्यापीठ पातळीवर लोकसाहित्याचा स्वतंत्र अभ्यास सुरू झाला. इतकंच नव्हे, तर मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठात ’लोककला अकादमी’ची स्थापना २००४ साली झाली. या अकादमीला सातत्याने मांडे सरांचं मार्गदर्शन लाभत होतं. दुर्गा भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. मांडे सर, डॉ. गंगाधर मोरजे सर, डॉ. तारा भवाळकर, डॉ. अनिल सहस्रबुद्धे अशा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात मी स्वतः, तसेच डॉ. अरुणा ढेरे, डॉ. विश्वनाथ शिंदे, डॉ. बाळासाहेब बढे, डॉ. धोंडिराम वाडकर, गणेश हाके, डॉ. तुलसी बेहेरे, डॉ. रमेश कुबल अशा अनेक अभ्यासकांची फौज तयार झाली.

भटक्या-विमुक्त समाजातील लोककलावंतांचा, तसेच या भटक्या-विमुक्त समाजातील साहित्याचा अतिशय साक्षेपी धांडोळा प्रभाकर मांडे यांनी आपल्या क्षेत्रीय संशोधनातून घेतला, तसेच मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र यांच्या अंगाने त्यांनी मौलिक ग्रंथसंपदा निर्माण केली, ज्यामध्ये ’गावगाड्या बाहेर’, ’लोकगायकांची परंपरा’, ‘लोकरंगभूमी’, ’लोकसाहित्याचे अंतःप्रवाह’, ‘लोकसाहित्याचे स्वरूप’, ‘मांग आणि त्यांचे मागते’, ’मराठवाड्यातील कलगीतुर्‍याची आध्यात्मिक शाहिरी’ अशा अनेक ग्रंथांचा समावेश आहे.

’गावगाड्या बाहेर’ हा मांडे सरांचा मानवववंशशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा सुंदर समन्वय घडविणारा अभ्यापूर्ण ग्रंथ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने या अभ्यासासाठीच शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च अशा ’डिलिट’ पदवीने मांडे सरांना सन्मानित केले. ’गावगाड्या बाहेर’ या ग्रंथातूनच एकप्रकारे पुढच्या काळात लोकप्रिय ठरलेल्या ’लोकरंगभूमी’, ’लोकगायकांची परंपरा’, ’लोकरंग कला’ यांसारख्या मांडे सरांच्या महत्त्वाच्या ग्रंथांच्या निर्मितीची बीजे रोवली गेली. कारण, ’गावगाड्या बाहेर’ या ग्रंथात मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र या अंगाने विशिष्ट समाजांचा साक्षेपी अभ्यास करण्यात आला आहे.

ब्रिटिशांनी लादलेल्या गुन्हेगार जमातीच्या कायद्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेल्या अनेक समाज गटांच्या पुनरुत्थानासाठी चाललेल्या प्रयत्नांची दखल घ्यावी, या अभ्यासातून ’गावगाड्या बाहेर’ची निर्मिती झाली आहे. मांग, मांग-गारुडी, जातपुराण लावणारे डक्कलवार, रायरंद, गोपाळ, कोल्हाटी, ज्योतिषांची एक भटकी जमात मेंढगी, कैकाडी, वैदू आणि याशिवाय पारधी, श्रमणारे वडार, भटके कारागीर शिकलगार, बहुरंगी स्मशान जोगी, नंदीबैलवाले तिरमाळी, जोगी गोसाव्यांच्या भटक्या जाती अशा अनेक भटक्या जाती-जमातींना ब्रिटिशांच्या गुन्हेगार जमातीच्या कायद्याचा जाच सहन करावा लागला. या सार्‍या जमातींचा सामाजिक-सांस्कृतिक अंगाने केलेला अभ्यास मांडे सरांनी आपल्या ग्रंथात मांडला आहे.

गावगाड्याचे हे सूत्र पकडूनच पुढे मांडे सरांनी ’लोकरंगभूमी’ या अद्वितीय ग्रंथात, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृती जपणार्‍या लोककला आणि लोककलावंतांचा वेध घेतला आहे. बोहाडा, पंचमी, आखाडी चैती... यांसारखी ग्रामोत्सवातील नाट्ये, गोंधळ-जागरण-भराड यांसारखी विधी नाट्ये, चित्रकथी-कळसूत्री बाहुलेकार वासुदेव जोशी, बाळसंतोष, पिंगळा यांसारखे अनेक भक्तिप्रधान गाणी गाणारे लोकगायक या सर्वांचा अंतर्भाव ’लोकरंगभूमी’ या ग्रंथात मांडे सरांनी केला आहे. ’लोकरंगभूमी’ हा ग्रंथ विशिष्ट लोककला आणि त्यामागची लोकसंस्कृती यांना शास्त्रपूत करण्याचा आणि सैद्धांतिक बैठक देण्याचा एक मोठा प्रयत्न आहे.

’लोकरंगभूमी’नंतर ’लोकगायकांची परंपरा’ या ग्रंथात मांडे सरांनी ब्रिटिशांनी त्यांच्या काळात आपल्या सर्वच लोकपरंपरांबद्दल जी तुच्छतेची भावना निर्माण केली, त्याबद्दल आपली परखड निरीक्षणे नोंदविली आहेत. ब्रिटिशांनी लोकपरंपरेतील या लोकगायकांना ‘भारतातील भिक्षेकरी’ असे संबोधन दिले होते. डॉ. रा. चिं. ढेरे आणि डॉ. प्रभाकर मांडे यांनी या लोकगायकांना ’लोकसंस्कृतीचे उपासक’ अथवा ’लोक-पुरोहित’ असे म्हटले आहे. विधी नाट्य, नाट्यात्मक विधी आणि नाटकी विधी असे वर्गीकरण डॉ. प्रभाकर मांडे यांनी केले. अनेक लोककला परंपरांमध्ये विशिष्ट विधी हीच आधारशीला असते. विधीशिवाय हे प्रकार संभवत नाहीत. काही परंपरांमध्ये नाटकी विधींचा अंतर्भाव होतो. लोककलेतील विशुद्धता, स्वाभाविकता सहजस्फूर्तता, अंगभूत कौशल्य जे पिढ्यान्पिढ्यांच्या संस्कारातून अनुवंशिकरित्या आलेले आहे, याचा विचार तसेच उपयोजित कौशल्याचा विचार, विशुद्धतेबरोबरच कृतकतेचा विचारही मांडे सरांनी ’लोकरंगभूमी’ आणि ’लोकगायकांची परंपरा’ या ग्रंथांमधून मांडला आहे. ज्या ठिकाणी विधी नाट्य होते, ती भूमी अभिमंत्रित केलेली असते, ते पूजा स्थळही असते आणि कल्पित रंगभूमीही असते. लोकपुरोहित हे विशिष्ट देवदेवतांचे भगतही असतात आणि गायकही असतात. त्यांच्याकडे गायक म्हणून अंगभूत कौशल्य असते, असे विविध सिद्धांत मांडे सरांनी आपल्या ग्रंथात मांडले आहेत.

शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्यावरील एक मौलिक ग्रंथ मांडे सरांनी अलीकडेच लिहिला आहे. या ग्रंथात शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांचे स्वरूप-भेद त्यांनी स्पष्ट केले आहेत. लोकनृत्य हे स्वाभाविक अंगभूत असे असते. शास्त्रीय नृत्याला आपली अशी स्वतंत्र शैली असते आणि ही शैली विशिष्ट व्याकरणासहित सादर होते, असे त्यांनी या ग्रंथात स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानला लोकसंस्कृती, लोकजीवन आणि लोककला यांची दीर्घ परंपरा आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या युगात जीवनाच्या सर्व क्षेत्रांचे सपाटीकरण झाले आहे. या सपाटीकरणामुळे स्वयंस्फूर्तता आणि या स्वयंस्फूर्ततेतील चैतन्य अस्तंगत होत चालले आहे. स्वाभाविक संस्कृती दिवसेंदिवस अस्तंगत होत चालली असून, विविधतेऐवजी एकसुरीपणा आला आहे. मुक्त अर्थव्यवस्था बाजारीकरण यामुळे लोककलांकडेही एक क्रय वस्तू म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे लोकसंस्कृती आणि लोककलांच्या क्षेत्रात देशी सांस्कृतिक उत्थान गरजेचे आहे, अशी भूमिका मांडे सरांनी सातत्याने मांडली आहे.

एकूणच लोकजीवन-लोकसंस्कृती-लोककला-लोकसाहित्य हा मांडे सरांचा श्वास आणि ध्यास राहिला होता.

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
(लेखक लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)
९८२१९१३६००
Powered By Sangraha 9.0