डॉ. नयन दाभोळकर हे उच्चशिक्षित आणि उच्चपदावर कार्यरत असून, त्यांचे व्यक्तिमत्त्वही तितकेच समाजशील. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मध्ये ऑफिसर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, नयन यांनी त्यांच्या वडिलांना हात धरून स्वतःच्या कॅबिनमध्ये नेले. प्रशस्त इमारत आणि त्यातील लेकाची अत्याधुनिक आणि महत्त्वाची केंद्रस्थानी असलेली कॅबिन बघून, त्या पित्याच्या डोळ्यातही अश्रू तरळले. ते इतकेच म्हणाले की, ”मी जिंकलो पोरा!“ नयन यांचे काका मंत्रालयात मोठे अधिकारी होते. ते नयन यांच्या कुटुंबाचे प्रेरणास्थान होते. आपल्या मुलाने आपल्या भावासारखे काशिनाथ यांच्यासारखे मोठे अधिकारी बनावे, त्याच्यासाठी स्वतंत्र कॅबिन असावी. नयन यांनी उच्चपदी गेल्यामुळे समाजाला अभिमान वाटावा, असे नयन यांच्या आई-बाबांचे स्वप्न. ते स्वप्न नयन यांनी पूर्ण केले. मात्र, त्यानंतरही कुटुंबाला आणि समाजाला अभिमानस्पद वाटेल अशी यशाची घोडदौड नयन यांनी सुरूच ठेवली. मागासवर्गीय समाजाच्या व्यक्तीबद्दल असा आक्षेप घेतला जातो की, समाजातील व्यक्ती उच्चशिक्षित आणि यशस्वी झाली की, ती समाजाला विसरते. मात्र, डॉ. नयन यांच्याबाबतीत असे नाही. यशाची प्रत्येक पायरी चढताना, त्यांनी समाजाशी ऋणानुबंध जपले. समाजात शैक्षणिक टक्का कसा वाढेल, उच्चशिक्षितांची संख्या कशी वाढेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
रोहिदास समाजाची हिंदू व्यक्ती म्हणून त्यांनी हिंदू संस्कृतीचा कायमच अभिमान बाळगला. समाजातील हुशार, होतकरू मुलांसाठी बाबांच्या नावे ’शांताराम दाभोळकर शिष्यवृत्ती’ सुरू केली. संपर्कातील कोणत्याही युवांच्या शिक्षण संस्कारासाठी डॉ. नयन नेहमीच पुढे असतात. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया.शांताराम आणि सुशीला दाभोळकर हे दाम्पत्य मूळचे रत्नागिरी दाभोळ गावचे. कामानिमित्त भांडूप येथे स्थिरावले. त्यांना चार अपत्ये त्यापैकी एक नयन. शांताराम हे रेल्वेत चतुर्थ श्रेणी कामगार होते. त्यावेळी रेल्वे कामगारांना वेतन जास्त नव्हते. त्यामुळे शांताराम संध्याकाळी अर्धवेळ मजुरी करत. रात्री घरी आले की, त्यांचा थकलेला चेहरा, वेल्डिंग काम करून लाल झालेल डोळे आणि त्यातून येणारे लाल पाणी पाहून, त्यावेळी लहान असलेल्या नयन यांना खूप वाईट वाटे. मात्र, शांताराम म्हणत की, ”तू खूप शिक. तुझे काका काशिनाथ जसे मोठे अधिकारी आहेत, तसा तू हो. माझी ही एकच इच्छा आहे.” वडिलांची ही इच्छा पूर्ण करायचीच, असे नयन यांनी ठरवले. त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र त्यांनी वाचले आणि त्यांच्या आयुष्याला प्रेरणादायी कलाटणी मिळाली.
पुढे बारावीनंतर नयन यांनी ’हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट’चा तीन वर्षांच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याने, त्यांना इथे खूप अडचण येऊ लागली. ’रोहिदास पंचायत संघ’ हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार करे. अशाच एका सत्कारात नयन यांना संघाने इंग्रजी शब्दकोश भेट दिला होता. नयन त्या शब्दकोशाचे पारायण करू लागले. त्यांचे इंग्रजी चांगले झाले. डिप्लोमा पूर्ण झाला आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीही मिळाली. पण, नोकरी करताना नयन यांना जाणवले की, या नोकरीमध्ये समाजाला अभिमान वाटावा, असेही काही नाही. त्यामुळे नोकरी करता-करता त्यांनी कला शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले आणि ते स्पर्धा परीक्षा देऊ लागले. त्याच दरम्यान ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मध्ये नोकरीची संधी चालून आली. इथे ही पोस्ट आरक्षित नव्हती. नयन यांनी खुल्या प्रवर्गातून स्पर्धा परीक्षा दिली, त्यात ते अव्वल आले. त्यांना नोकरी मिळाली. उत्तम नोकरी असताना, नयन यांनी सरकारी अधिकारी व्हावे, या ध्यासासाठी स्वतःला सिद्ध केले होते आणि विजयी झाले होते. त्यामुळे आपल्या बाबांना त्यांच्या कॅबिनमध्ये नेताना, नयन यांनाही आनंद वाटणे साहजिकच होते.
’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’मध्ये नोकरी करत असताना, नयन यांनी तिथे मागासवर्गीय जाती-जमातीच्या कामगारांसाठी ’एससी, एसटी फेडरेशन युनियन’ ही संघटना बनवली. त्यांच्या वरिष्ठांना या संघटनेबद्दल कळाले, तेव्हा त्यांनी नयन यांना संघटनेची गरज काय विचारले. नयन म्हणाले की, ”कर्मचार्यांना स्वतःलाही माहिती नाही की, त्यांना काय सवलती आहेत आणि त्या कशा मिळतील. संघटना केवळ त्यासाठी काम करेल.” नयन यांच्या स्वच्छ हेतूबद्दल वरिष्ठ आश्वासक होते. असो. डॉ. नयन हे उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व. त्यांनी ’बिझनेस मॅनेटमेंट’ आणि ’हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट’ हे दोन डिप्लोमा केले असून, कला शाखा आणि लोकप्रशासन या दोन शाखांची पदवी आहे. ’बिझनेस मॅनेजमेंट’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी ’मानव संसाधन’ या विषयात ’पीएचडी’ केली. ’प्रशिक्षण आणि विकास’ या विषयावर त्यांचे सात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध सादर केले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ‘रिसर्च स्कॉलर’ म्हणून आमंत्रितही केले जाते. ’विद्या’ या सामाजिक संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. २००५ साली मुंबईत पूर आला, तेव्हा आणि २०२० साली ’कोरोना’ने थैमान घातले, तेव्हाही डॉ. नयन हे समाजासाठी काम करण्यास पुढे सरसावले होते.
आज नयन ‘आयआयटी मुंबई’ येथे मुख्य प्रबंधक म्हणून कार्यरत आहेत. ’आयआयटी’मध्ये कामाची घडी बसवताना, त्यांनी अनेक निर्णय घेतले. या निर्णयाला विरोध म्हणून एका कंत्राटी कामगाराने नयन यांना गंभीर धमक्या द्यायला सुरुवात केली. या काळात ’आयआयटी’ त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली. तेव्हा त्यांची पत्नी प्रतिभा गरोदर होती. पण, याच वेळी नाही, तर आयुष्यभर प्रतिभा यांनी नयन यांना सार्थ साथ दिली. नयन म्हणतात की, ”युवा पिढीच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेणार आहे.” डॉ. नयन दाभोळकरांसारख्या व्यक्ती केवळ रोहिदास समाजासाठीच नाही, तर सर्वच समाजासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत.