खिचडी घोटाळ्यावर पहिल्यांदाच बोलले CM! "मापात पाप झालं"

20 Dec 2023 16:21:33
CM shinde on Khichadi scam

नागपूर :
गोरगरीब कामगार जनतेला कोविड काळात पोटाची खळगी भागवता यावी यासाठी मुंबई महापालिकेने खिचडी वाटप निर्णय घेतला होता. मात्र, यातूनही गोरगरीब जनतेच्या तोंडातला घास हिसकावत स्वतःची तुंबडी भरवण्याचे काम करण्यात आले असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन पालिका प्रशासन आणि संबंधितांवर केला आहे. विधानसभेच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री शिंदे बोलत होते तेव्हा त्यांनी हा आरोप केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, "कामगार व गोरगरीब आणि मजूर वर्गाला तिनशे ग्राम खिचडी ३३ रुपयांना देण्याचा निर्णय तेव्हा झाला. मूळ कंत्राटदाराने त्यावर एक आणखी एक उपकंत्राट दिले. यातूनच हा घोटाळा झाला. तिनशे ग्राम ऐवजी फक्त शंभर ग्राम खिचडी १६ रुपयांना देऊन मापात पाप करण्यात आलं. गोरगरीबांच्या हातातोंडाशी आलेला घास कोविड काळात हिसकावून स्वतःची तुंबडी भरण्यासाठी करण्यात आला", असेही मुख्यमंत्री म्हणाले. कुणाकुणाच्या खात्यात किती किती पैसे गेले ते तपासात निष्पन्न झालेले आहे. हे प्रकरण लवकरच बाहेर येणार आहे, असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0