रसिका शिंदे-पॉल
मुंबई : मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध मनोरजंनाच्या माध्यमातून विविध भूमिकांची मेजवानी कायमच भरत जाधव यांनी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. आता पुन्हा एकदा अशाच एका वेगळ्या विषयाची तर्रीदार मेजवानी 'लंडन मिसळ' या चित्रपटातून भरत जाधव घेऊन येत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत पहिल्यांदाच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे झळकणार आहे. गौरव मोरे याने 'महाएमटीबी'शी बोलताना भरत जाधव यांच्यासोबत काढलेल्या पहिल्या फोटोचा खास किस्सा सांगितला.
नोकियाच्या छोट्या फोनमध्ये भरत जाधव सोबत काढला होता पहिला फोटो
“मी कॉलेजला असताना एक गोष्ट माझ्या कानावर पडली होती ती म्हणजे ‘पछाडलेला’ नावाचा चित्रपट आला आहे आणि त्यात भरत जाधव म्हणूव अभिनेते आहेत त्यांनी अफलातून काम केले आहे. त्यानंतर तो चित्रपट मी पाहिला आणि त्यांना भेटायची इच्छा मनात आली. त्यावेळी त्यांची एकामागून एक नाटकं पण येत होती. त्यापैकी मी त्यांचं पहिलं नाटक पाहिलं ते म्हणजे ‘सही रे सही’. नाटकाचा प्रयोग झाला, सगळ्यांनी भरज सरांसोबत फोटो काढले. मी सर्वात शेवटी त्यांच्याकडे गेलो पण माझ्या मनात रुखरुख सुरु होती; इतका मोठा कलाकार आणि त्यांच्यासोबत पोटो या नोकियाच्या फोन मधून काढायचा. पण मग सरांनीच विचारलं कुणी राहीलं आहे का? मी गेलो आणि त्यांच्यासोबत त्या नोकियाच्या फोनमध्ये फोटो काढला. बरेच दिवस तो फोटो माझ्या फोनचा वॉलपेपर होता. पण नंतर तो फोन हरवला आणि फोटोही. पण त्यानंतर आता त्यांच्याचसोबत मोठ्या पडद्यावर लंडन मिसळ चित्रपटाच्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळत आहे ही माझ्यासाठी पार मोठी गोष्ट आहे”, असा भरत जाधव यांच्यासोबत काढलेल्या पहिल्या फोटोचा किस्सा गौरव मोरे याने सांगितला.
‘लंडन मिसळ’ चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत तर भरत जाधव एका हटके भूमिकेत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसणार आहेत आणि ही प्रेक्षकांसाठी मोठी मेजवानी असेल.
आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची ही कथा आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे 'लंडन मिसळ'. नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी आपल्याला या चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे.