गाझा पट्टीवरुन गोंधळात गोंधळ

19 Dec 2023 21:28:57
Article on Hamas Israel War Conflict

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर अनेक समस्या आणि गोंधळ निर्माण झाले आहेत. एकीकडे प्रमुख देशांमध्ये निवडणुकीचे वारे तर दुसरीकडे गाझा पट्टीत पुनर्वसन या गोंधळात हे युध्द जास्तीत जास्त कसे लांबेल यासाठी इस्रायल प्रयत्नशील आहे. युद्धानंतर तिथेही निवडणुका होऊ शकतील, या सर्व घटनांचा केलेला ऊहापोह...

‘हमास’विरूद्धच्या युद्धाला लवकरच ७५ दिवस पूर्ण होतील. ‘हमास’चा पूर्ण निःपात केल्याशिवाय थांबायचे नाही, असा निर्धार इस्रायलने केला असून त्याला आणखी काही महिने लागू शकतात. या युद्धात इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची मात्र तशी परिस्थिती नाही. अमेरिकेत २०२४ सालच्या निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले असून दि. १५ जानेवारीपासून विविध राज्यातील प्राथमिक फेरीच्या मतदानाला सुरुवात होईल. अमेरिकेत साधारणतः दोन्ही पक्षांचा इस्रायलला खंबीर पाठिंबा असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये डाव्या उदारमतवादी विचारसरणीच्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मतदारांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. पक्षाला मतदान करणार्‍या मुस्लीम, कृष्णवर्णीय आणि तरुण मतदारांमधील एका मोठ्या वर्गाचा या युद्धाला विरोध आहे.

२१व्या शतकात जन्मलेल्या तरुणांपैकी निम्याहून जास्त लोकांना वाटते की, ‘हमास’च्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करता येऊ शकेल, अशी परिस्थिती राहिल्यास जो बायडन यांना पुन्हा निवडून येणे अशक्य आहे. अमेरिका उघडपणे भूमिका घेत नसली तरी पडद्यामागील वाटाघाटींमध्ये हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, यासाठी बायडन प्रशासन प्रयत्न करत आहे. गेल्या आठवड्यात इस्रायली सैन्याला गाझामधील आजवरचा सगळ्यात मोठा बोगदा सापडला. इस्रायलच्या एरेत्झ सीमेपासून अवघ्या ४०० मीटरवर सुरुवात होणारा हा बोगदा जमिनीखाली ५० मीटर खणला आहे. त्याची उंची सुमारे दहा फूट असून लांबी साडेचार किमी आहे. त्यात विजेची जोडणी असून या बोगद्यातून ‘हमास’चे दहशतवादी गाझा सिटीपासून थेट इस्रायलच्या सीमेपर्यंत गाडीने येऊ शकत होते. असे सर्व बोगदे शोधून ते पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय ‘हमास’चे दहशतवादी हल्ले थांबणे अवघड आहे. या बोगद्याचे एक तोंड वाळूच्या टेकडीखाली होते. हा बोगदा बांधण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यात आली होती. त्याच्या बांधकामाचा खर्च कोट्यावधी डॉलरच्या घरात असू शकतो.

सुमारे ४० किमी लांबी आणि पाच ते दहा किमी रुंदी असलेल्या गाझा पट्टीत जमिनीखाली सुमारे ५०० किमी बोगद्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. अशा बोगद्यांमध्ये स्फोटकं दडवली असल्याने तसेच त्यांच्यात ‘हमास’चे दहशतवादी दबा धरून असल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करताना इस्रायलला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. पण त्याची पर्वा न करता हे जाळे संपूर्णपणे उद्ध्वस्त करणे हे इस्रायली लष्करापुढचे लक्ष्य आहे.

गाझा पट्टीत ‘हमास’च्या दहशतवादी कारवायांची केंद्र ही मुख्यतः उत्तरेकडील गाझा सिटी तर दक्षिणेकडील खान युनिस आणि राफा परिसरात आहेत. अनेक आठवड्यांनंतर इस्रायलने गाझा सिटीवर नियंत्रण मिळवले असून अन्य दोन परिसरात इस्रायलची कारवाई सुरू आहे. एवढ्या दाटीवाटीने वसलेल्या परिसरात लढताना तंत्रज्ञानाचा फायदा होत असला तरी अनेकदा त्याची किंमतही मोजावी लागू शकते. आजही ‘हमास’च्या ताब्यात १३० हून अधिक इस्रायली नागरिक बंधक आहेत. त्यातील तीन जण ‘हमास’च्या तावडीतून पळण्यास यशस्वी झाले. पण, हातात पांढरे झेंडे असूनही इस्रायलच्या सैन्याकडूनच शत्रू समजून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. अशा घटनांमुळे इस्रायलमध्येही सरकारवरचा दबाव वाढतो. आजच्या घडीला इस्रायलच्या बहुतांश लोकांचा या युद्धाला पाठिंबा असून इस्रायलने आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता हे युद्ध लढावे, असे त्यांना वाटते.

इस्रायलला भविष्याची चिंता असल्यामुळे हे युद्ध जेवढे लांबवता येईल तेवढे त्यांना हवे आहे. अरब इस्रायल संघर्षात नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे अरब देशांकडून किंवा संघटनांकडून इस्रायलच्या विरोधात युद्ध लादले जाते. जोपर्यंत अरब देशांची बाजू वरचढ असते तोवर कोणी युद्धबंदीची मागणी करत नाही. जेव्हा इस्रायलची बाजू वरचढ होते, तेव्हा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संयुक्त राष्ट्र तसेच अन्य माध्यमातून युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव टाकण्यात येतो. त्यामुळे इस्रायल आपल्याला मिळालेल्या अल्प मुदतीत शत्रूचे शक्य होईल तेवढे नुकसान करण्याचे प्रयत्न करते.

अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षामध्ये जो बायडन यांच्यानंतर इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा दुसरा कोणता नेता अध्यक्ष होऊ शकेल का याबाबत शंका आहे. रिपब्लिकन पक्षाच्या बहुतांश नेत्यांचा इस्रायलला पाठिंबा असला तरी इस्रायलचे युद्ध हे अमेरिकेविरूद्ध युद्ध मानून ते लढण्याची त्यांची तयारी नाही. लष्करीदृष्ट्या इस्रायल खूप बलाढ्य असला तरी प्रदीर्घ काळ चालणार्‍या प्रादेशिक युद्धामध्ये अमेरिकेच्या मदतीशिवाय इस्रायल जिंकू शकत नाही. अमेरिकेच्या डोक्यावरील कर्जाचा आकडा सातत्याने वाढत असून तेथील व्याजदर पाच टक्क्यांहून अधिक असताना आणखी कर्ज घेणे म्हणजे व्याजाच्या रकमेतही मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासारखे असते. त्यामुळे भविष्यात अमेरिकेला संरक्षणापेक्षा कितीतरी जास्त खर्च डोक्यावरील कर्ज आणि व्याजाची परतफेड करण्यासाठी करावा लागेल, असे झाल्यास इस्रायलसारख्या देशांना वार्षिक चार अब्ज डॉलर देणे अवघड होऊ शकेल.

या युद्धामध्ये आतापर्यंत गाझामधील ‘हमास’चे दहशतवादी आणि सामान्य नागरिक मिळून सुमारे २० हजार लोक मारले गेले असून हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. गाझा पट्टीच्या पुनर्वसनासाठी अब्जावधी डॉलर खर्च येणार आहे. हे पुनर्निर्माण करण्यात जर ‘हमास’चा सहभाग असेल, तर पुन्हा एकदा मदतीचा मोठा हिस्सा दहशतवादासाठी वळवला जाईल. दुसरीकडे पॅलेस्टिनी प्राधिकरणात प्रचंड भ्रष्टाचार असून त्यांची लोकप्रियता फारशी नाही. असे म्हटले जात आहे की, या युद्धामुळे गाझा पट्टीतील ‘हमास’ची लोकप्रियता कायम असून जॉर्डन नदीच्या पश्चिमी खोर्‍यातील पॅलेस्टिनी प्रदेशात सुमारे ८० टक्के लोक ‘हमास’ला पाठिंबा देऊ लागले आहेत. युरोपीय देशांवर युक्रेन युद्धामुळे असलेला आर्थिक बोजा, हजारोंच्या संख्येने घुसलेल्या शरणार्थ्यांचा खर्च तसेच आलेली आर्थिक मंदी यामुळे अमेरिका किंवा युरोपीय देश गाझा पट्टीच्या पुनर्वसनासाठी किती मदत करू शकतील याबाबत शंका आहेत. इस्रायलने हे स्पष्ट केले आहे की, इस्रायलशी शत्रुत्व असणार्‍या किंवा त्याच्याशी राजनयिक संबंध प्रस्थापित न केलेल्या देशांना गाझा पट्टीत पुनर्वसन करू दिले जाणार नाही.

संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियासारख्या देशांनी या युद्धात इस्रायलच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली. इराणच्या विस्तारवादाची असलेली भीती, इस्रायलशी संबंध वाढवून येणारी समृद्धी आणि मुस्लीम ब्रदरहूड तसेच ‘हमास’सारख्या इस्लामिक दहशतवादी संघटनांना तीव्र विरोध त्याला कारणीभूत होता. असे असले तरी या देशांना गाझा पट्टीच्या पुनर्वसनात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांच्या लोकसंख्येच्या दबावामुळे पॅलेस्टिनी राष्ट्र निर्मितीचा मुद्दा त्यांना पुढे करावा लागेल. इस्रायल सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या शांतता वाटाघाटींना तयार होणार नाही. या युद्धामुळे इस्रायलमध्ये सर्व पक्षीय सरकार स्थापन झाले असले तरी युद्धानंतर तिथेही निवडणुका होऊ शकतील. असे झाल्यास आणखी किमान सहा महिने इस्रायलमध्ये स्थिर सरकार येणार नाही. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या नेतृत्त्वावर सगळेजण विसंबून आहेत. अंतर्गत विरोधामुळे त्रस्त झालेली अमेरिका आपलाच गोंधळ सोडवत आहे.

Powered By Sangraha 9.0