मुंबई : मुंबईतील प्राचीन व आध्यात्मिक इतिहास लाभलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाच्या सुशोभीकरण प्रकल्पाचे दि. १८ डिसेंबर रोजी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या 'डी' विभागामार्फत या प्रकल्पांतर्गत तलावाच्या पायऱ्यांची, संरक्षक भिंतीची, दीपस्तंभाची दुरुस्ती तसेच सभोवतालच्या मुख्य मंदिरांचे सुशोभीकरण यासारखी विविध कामे करण्यात येणार आहेत. यावेळी परिसराच्या स्वच्छतेसाठी क्लीनिंग व्हॅनचे देखील मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या डी विभागामार्फत बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी विविध कामे पूर्ण केली जाणार आहेत.
प्रस्तावित प्रकल्पात तलावा सभोतालच्या परिसराची स्वच्छता, रामकुंड परिसराची स्वच्छता, बाणगंगा तलावाची स्वच्छता, तलावाच्या पायऱ्यांची, संरक्षक भिंतींची, दीपस्तंभाची, दुरुस्ती आणि जीर्णोद्धार, तलावाच्या आतील बांधकाम काढणे, बटरफ्लाय झडपेची दुरुस्ती आणि सुधारणा आदी कामांचा समावेश आहे. मंत्री लोढा यांनी परिसरातील अतिक्रमणे हटवून त्याचे वारसापण पुनर्संचयित करण्याची योजना आखली असून, यामुळे ऐतिहासीक महत्व प्राप्त असलेल्या राम कुंडाचा कायापालट होणार आहे. तसेच तलावाचे प्राचीन महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या ठिकाणाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. बाणगंगा तलाव विकास प्रकल्पामुळे शहरातील एक लक्षणीय पर्यटनस्थळ म्हणून बाणगंगा तलाव परिसर विकसित होईलच, पण त्याचबरोबर नागरिकांच्या धार्मिक भावनाही जपल्या जातील.
दरम्यान, बाणगंगा तलावाच्या आतील परिसरात १४ अनधिकृत स्ट्रक्चर (झोपड्या) आहेत. सदर बांधकाम निष्कासित करण्याचे काम सुरू असून लवकरच निष्कासनाची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर दिली.
बाणगंगा तलावाविषयी...
पुरातन, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारे वाळकेश्वर येथील आणि मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड आणि ग्रँट रोड रेल्वेस्थानकांपासून जवळील एक ठिकाण म्हणजे ‘बाणगंगा तलाव'.
मलबार हिलच्या एका छोटेखानी टेकडीवर वसलेल्या वाळकेश्वर मंदिर परिसरातील पाण्याचा तलाव ‘बाणगंगा’ या नावाने ओळखला जातो. हा तलाव भूविज्ञान आणि स्थापत्यकलेचादेखील एक उत्तम नमूना असून अनेक पर्यटकही आवर्जून या ठिकाणी भेट देण्यास येतात. तलावाला धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्वदेखील आहे. येथे पितृपक्षात आणि इतरवेळी पूजा आणि श्राद्धाच्या विधीसह अनेक वर्षांपासून येथे दीपोत्सवही साजरा करण्यात येत आहे.