मुंबई : लेखिका शिल्पा गायंगी गंजी यांच्या "नंदिनी" या दुसऱ्या कादंबरीचं आणि "प्रतीक्षा" या कादंबरीच्या दुसर्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता कला नगर सभागृह ३८, कलानगर, मधुसुदन कालेलकर मार्ग, वांद्रे (पूर्व) येथे पार पडला. हेडविग मीडिया हाऊसतर्फे सदर पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार इब्राहीम अफगाण या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक किरण येले उपस्थित होते. किरण येले यांनी स्त्रीविषयी आणि साहित्यातील स्त्री लेखिका याबद्दल मांडलेले विचार उद्बोधक होते. त्यांनी शिल्पा गंजी यांच्या कादंबरीचा धागा पकडून स्त्री लेखिकांच्या आणि स्त्रीच्या मनाचा ठाव घेतला. अधिकाधिक स्त्रियांनी अतिशय धाडसी होऊन लिहावे हा इब्राहीम सरांनी मांडलेला विचार खूप मोलाचा वाटला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली वीरकर यांनी केले. यावेळी नृत्यांगना वैष्णवी भालेकर यांनी प्राध्यापिका गायत्री लेले यांच्या कवितांवर नृत्याभिनय सादर केला. मानसिक दृष्ट्या जागृत झालेल्या स्त्री मनाचे विविध पैलू त्यांनी नृत्याविष्कारातून दाखवले. कार्यक्रमस्थळी सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध होती. अधिकाधिक पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमींनी ती वाचावीत असे आवाहन हेडविग मीडिया हाऊसतर्फे चिन्मय पंडित यांनी केले.