भारताप्रमाणे विविध देशांमधील हिंदू समाजही दि. २२ जानेवारीकडे डोळे लावून बसला आहे. काही ठिकाणी आतापासूनच मिरवणुकांचे आयोजन करून, या सोहळ्याचा आनंद साजरा केला जात आहे. या निमित्ताने विश्व हिंदू परिषद, अमेरिकेने दि. १६ डिसेंबर रोजी मेरिलॅण्ड येथील श्री भक्त आंजनेय मंदिरापासून मिनी कार रॅली आणि बाईक रॅली यांचे आयोजन केले होते.
दि. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान होणार आहेत. त्या दिवशी भगवान रामांच्या मूर्तीची त्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची अयोध्येसह देशा-विदेशातही जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वत्र दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेने त्या दृष्टीने अनेक कार्यक्रमांची योजनाही केली आहे. भारताप्रमाणे विविध देशांमधील हिंदू समाजही दि. २२ जानेवारीकडे डोळे लावून बसला आहे. काही ठिकाणी आतापासूनच मिरवणुकांचे आयोजन करून, या सोहळ्याचा आनंद साजरा केला जात आहे. या निमित्ताने विश्व हिंदू परिषद, अमेरिकेने दि. १६ डिसेंबर रोजी मेरिलॅण्ड येथील श्री भक्त आंजनेय मंदिरापासून मिनी कार रॅली आणि बाईक रॅली यांचे आयोजन केले होते. प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी, या दोन्ही मिरवणुकांमध्ये हिंदू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अयोध्या मार्ग म्हणून संबोधल्या गेलेल्या मार्गावरून या मिरवणुका गेल्या.
या कार्यक्रमाचे एक आयोजक आणि विश्व हिंदू परिषद, अमेरिकेचे एक नेते महेंद्र सापा म्हणाले की, “राम मंदिराच्या उद्घाटन दिनी आम्ही वॉशिंग्टन डीसी भागात एका ऐतिहासिक समारंभाचे आयोजन केले आहे. हिंदू समाजाने केलेल्या ५०० वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर उभारले जात आहे. त्यानिमित्ताने दि. २० जानेवारी रोजी आम्ही सुमारे एक हजार अमेरिकन हिंदू कुटुंबांच्या उपस्थितीत भव्य समारंभाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये राम लीला, रामकथा, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. अमेरिकन हिंदू मुलांना समजेल, अशा भाषेत प्रभू रामचंद्राच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. भारतातील विविध राज्यांमधून अमेरिकेत स्थायिक झालेले, हिंदू नागरिक मोठ्या संख्येने या सर्व कार्यक्रमात सहभागी होतील, असा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे.”
‘एसएफआय’च्या धमक्यांना न घाबरणारे राज्यपाल!
केरळमधील डाव्या आघाडीचे सरकार आणि राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान यांच्यात तणावाचे संबंध असून, राज्यपाल पदासारख्या घटनात्मकपदाची प्रतिष्ठा पिनराई विजयन सरकारकडून राखली जात नसल्याचे दिसून येत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्या पक्षाची स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ही विद्यार्थी संघटना राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान यांचा जितका अपमान करता येईल, तेवढा करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान हे तेवढेच खंबीर असून, तेही सडेतोड उत्तरे देऊन, ‘एसएफआय’च्या गुंडगिरीला तोंड देत आहेत. दि. १६ डिसेंबर रोजी कालिकत विद्यापीठातील एका परिसंवादासाठी राज्यपाल त्या विद्यापीठात येणार होते आणि त्यांच्या विद्यापीठाच्या अतिथीगृहात मुक्कामही होता. राज्यपालांना कोणत्याही विद्यापीठाच्या परिसरात पाऊलही ठेवू देणार नाही, अशी धमकी ’एसएफआय’ने दिली होती. पण, या धमक्यांना भीक न घालता राज्यपाल आणि कुलपती डॉ. आरिफ मोहम्मद खान हे ठरल्यानुसार कालिकत विद्यापीठ परिसारत पोहोचले. राज्यपालांचे आगमन होण्याआधी दोन तास ’एसएफआय’च्या निदर्शकांनी निदर्शने केली. पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेऊन तेथून हलविले. राज्यापालांविरुद्ध निदर्शने करणार्यांनी आक्षेपार्ह घोषणा दिल्या. पण, पोलिसांनी त्या सर्व प्रकाराकडे डोळेझाक केली. पोलीस त्यांच्याशी अत्यंत सौम्यपणे वागले, असे दिसून आले. विद्यापीठाच्या अतिथीगृहात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना, ”आपल्याला कोठे निदर्शने दिसली नाहीत,“ असे राज्यपाल म्हणाले. राज्यपालांनी निदर्शनासंदर्भात एक ठाम भूमिका घेतली आहे. निदर्शकांनी आपल्या सरकारी वाहनावर हल्ला करता कामा नये. त्यांना माझ्यावर हल्ला करायचा असेल, तर तसे ते करू शकतात; पण त्यांनी शासकीय वाहनाचे नुकसान करता कामा नये, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. निदर्शने करणार्यांच्या पुढे वाहन थांबवायचे आणि गाडीबाहेर येऊन त्यांना सामोरे जायचे, असे राज्यपालांनी ठरविले. स्वामी विवेकानंद हे माझे आदर्श आहेत. ”तुमच्यावर कोणी हल्ला करत असेल, तर त्यास खंबीरपणे सामोरे जा,” असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. ’एसएफआय’चे लोक गुंड प्रवृत्तीचे असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना निदर्शनासाठी भाडोत्री म्हणून घेतले आहे. ही निदर्शने मुख्यमंत्री पुरस्कृत आहेत, असा आरोप राज्यपालांनी केला आहे. राज्याच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवरून त्यांना जनतेचे लक्ष अन्यत्र वळवायचे आहे. असेही राज्यपाल डॉ. खान यांनी म्हटले आहे. आपण देशाच्या राष्ट्रपतींना उत्तरे देण्यास बांधील आहोत, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले. विद्यापीठांचे भगवेकरण केले जात असल्याच्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ”राज्यामध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यालाही भगवेकरण असे म्हणणार का,“ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दरम्यान, मुख्यमंत्री विजयन यांनी राज्यपालांनी निदर्शकांबद्दल अपशब्द वापरल्याचा आणि आपल्या वाहनाबाहेर येऊन राज्यपालांनी शिष्टाचाराचे पालन न केल्याचा आरोप केला आहे. केरळचे राज्यपाल डॉ. अरिफ मोहम्मद खान हे डाव्या सरकारला आणि त्यांच्या पित्त्यांकडून केल्या जात असलेल्या, आक्रमक निदर्शनांना खंबीरपणे तोंड देत आहेत. राज्यपालपदाचा मान राखायला हवा, एवढी सुबुद्धी मुख्यमंत्र्यांना होवो, एवढी एक अपेक्षा!
केरळ : भगवान अय्यपा दर्शनासाठी भाविकांचा महासागर!
शबरीमला मंदिरातील भगवान अय्यपा देवाचे दर्शन घेण्यासाठी दि. १७ डिसेंबर रोजी भाविकांचा महासागर उसळला होता. भगवान अय्यपा देवस्थानचा ’मंडलम ः मकरविलक्कू’ कार्यक्रमास दि. १७ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. ही यात्रा लक्षात घेता, केरळ सरकारने ज्या सोईसुविधा पुरविणे आवश्यक आहे, त्या पुरविल्या जात नसल्याच्या भाविकांच्या तक्रारी आहेत. गैरव्यवस्थापनामुळे भाविकांना दर्शनासाठी कित्येक तास प्रतीक्षा करावी लागत आहे. भाविकांना किमान आवश्यक असलेल्या वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी, असे पत्र केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना लिहिले आहे. तसेच अधिक कर्मचारी नियुक्त करून भाविकांना दर्शनासाठी फार थांबावे लागणार नाही, अशी व्यवस्था केली जावी, असेही या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे. सन्निधानम येथे भाविकांना जी प्रतीक्षा करावी लागत आहेत, तो वेळ कसा वाचेल या दृष्टीनेही उपाय योजावेत, असे त्यांनी कळविले आहे. मार्क्सवादी मुख्यमंत्री हे सर्व किती गांभीर्याने घेतात, ते आता पाहायचे!
तुर्कस्तानमधील इमामांना जर्मनीचा नकार!
जर्मनीमध्ये सध्या जे विदेशातून आलेले इमाम आहेत, त्यांच्या जागी जर्मनीत प्रशिक्षित केलेले इमाम नियुक्त करण्याचा, त्या देशांना मानस आहे. दरवर्षी असे १०० इमाम प्रशिक्षित करण्याचा विचार आहे. जर्मनीमधील मशिदींमध्ये तुर्कस्तानमधून आलेल्या इमामांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. एकात्मता साधण्यासाठी जर्मनीच्या गृह खात्याने हा निर्णय घेतला आहे. दि. १४ डिसेंबर रोजी जर्मनीच्या गृह खात्याने हा निर्णय घोषित केला. जर्मनीमध्ये सध्या सुमारे एक हजार तुर्की इमाम आहेत. यापुढे जर्मनीमध्ये प्रशिक्षण देऊन इमाम तयार केले जातील. विद्यमान तुर्किश इमामांची जागा हे नवीन प्रशिक्षित इमाम घेणार आहेत. इमामांनी विविध धर्मियांशी चर्चा केली पाहिजे, आपल्या समाजातील श्रद्धांबाबत जे प्रश्न आहेत, त्यावर चर्चा केली पाहिजे. एकात्मता साधण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असेल आणि अशा उपक्रमात मुस्लीम समाजाचा सहभाग वाढेल, असा त्या मागचा विचार असल्याचे गृह खात्याने म्हटले आहे. जर्मनीमध्ये सुमारे ५५ लाख मुस्लीम आहेत. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ६.६ टक्के आहे. देशात २ हजार, ५०० मशिदी आहेत. तुर्कस्तानमधील धार्मिक संघटनेकडून यातील अनेक मशिदींना इमाम पुरविले जातात. पण, लोकसंख्येचे बदलते प्रमाण लक्षात घेऊन, जर्मन सरकारही सतर्क झाले असून, तेथील मशिदींमध्ये देशामध्ये प्रशिक्षित इमाम नेमण्याचा निर्णय त्या सरकारने घेतला आहे.
९८६९०२०७३२