सुवर्ण आकर्षण : प्राचीन ते अर्वाचीन...

    17-Dec-2023
Total Views |
Different types of Medals given to the winners

सोन्या-चांदीचे महत्त्व जसे अन्य क्षेत्रांत दिसते; तसेच ते क्रीडा क्षेत्रातही आढळते. सोने-चांदी-कांस्य पदकांचा ‘ऑलिम्पिक’मधील स्वर्णिम सहभागाचा तसेच ‘नोबेल’ पारितोषिकाचा आढावा घेणारा सुवर्ण आकर्षण ः प्राचीन ते अर्वाचीन हा माहितीपूर्ण लेख...

ऋग्वेद काळापासून भारतात सोन्याचे चलन प्रचलित होते. वेदात नाण्याचा ‘निष्क’ असाही उल्लेख आढळतो. भारतासह अनेक लहान-मोठ्या राज्यांत सोन्याचे मुख्य नाणे व चांदी, तांबे या धातूंची उपनाणी प्रचारात होती. शिवरायांच्या राज्यातही अशी नाणी वापरात होती. भारतात १८३५ मध्ये चांदीचे चलन अगर रौप्यमापन पद्धती अस्तित्वात आली. मग नंतर पुढे ‘रिझर्व्ह बँके’च्या अधिपत्याखाली चलन, सोने-चांदी असे आर्थिक व्यवहार नियंत्रित ठेवले गेले. सोने-चांदी असे हे मोलाचे धातू राष्ट्राच्या श्रीमंतीचे द्योतक ठरू लागले. सोने-चांदी मग ते नाणी, वेडणी, साखळी, अंगठी असे दागिने, तरुणाईचे टेंपल, पेंडल अशा विविध प्रकारात सोने-चांदी बाळगण्यात सगळ्यांचा विशेष कल दिसू लागला. आपल्या श्रीमंतीचे ते द्योतक असते. गणेशोत्सव, धनत्रयोदशी, दिवाळी आणि पाठोपाठ येणार्‍या लग्नसराईच्या हंगामात सराफी बाजारातील मागणीत मोठी चढउतार होत, सोन्याचे भाव उसळी मारत असतात, तर कधी स्थिरावत असतात. हे वर्षानुवर्ष चालू असलेले आपण बघत असतोच. त्या सोन्याबरोबर चांदीदेखील मौल्यवान मानली जाते. आपल्या जन्मापासूनच त्या मौल्यवान धातूला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

राख ते रोखे...

सोने, सुवर्णप्राशन करण्यात ‘लेहन’ हादेखील एक प्रकार असतो. पुष्य नक्षत्राला सोने खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी होत असते. तसेच सुवर्णप्राशनही केले जाते. जन्मापासून बालकास सुवर्णप्राशन करण्याचे फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. त्यानुसार बाल्याची बुद्धी वाढते, त्याला चांगली भूक लागते, त्याची शारीरिक शक्ती वाढते, शरीराची कांती वाढते आणि रोगप्रतिकारक्षमता वाढून त्यांचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. लहानांबरोबर मोठ्यांनीदेखील त्याचा फायदा कसा घ्यावा, हे आयुर्वेदात सांगितले आहेच.

चांदीला संस्कृतमध्ये ‘रौप्य’, ‘रजत’, ’रुप्यक’, ’तारा’, ‘पांढरा’, ‘वसुत्तम’, ‘रुप्य’, ‘चंद्रहास’ तर इंग्रजीमध्ये ‘सिल्व्हर’ असे म्हणतात. सोन्याबरोबर चांदी आयुर्वेदात मोलाची मानली जाते. त्याचा भस्म किंवा राखेच्या स्वरुपातील औषधी गुणधर्म आयुर्वेदातही कथन केले आहेत. जनता सोने-चांदी यात गुंतवणूक करत असते. आता तर (गोल्ड बॉण्ड) सुवर्ण रोखेही सरकार विक्रीस काढत असते.

क्रीडा क्षेत्रातही महत्त्व

सोन्या-चांदीचे महत्त्व जसे इतरत्र आहे; तसेच महत्त्व क्रीडा क्षेत्रातही ते आढळते. भारतात नुकतीच एकदिवसीय क्रिकेट ‘विश्वचषक’ स्पर्धा झाली होती, त्यावेळीच्या बातमीत वाचण्यात आले होते की, एका नाशिककराने चक्क सोन्याचा विश्वकरंडक साकारला होता. भारत विजेता ठरल्यास, हे दोन्ही सुवर्ण करंडक कर्णधार रोहित शर्मा आणि फलंदाज विराट कोहली यांना भेट म्हणून देण्याचा त्यांचा विचार होता. दुर्दैवाने तसे होऊ शकले नव्हते. क्रीडा क्षेत्रात होणारे ’ऑलिम्पिक’, ‘आशियाई’, ‘राष्ट्रमंडल’ अशा स्पर्धांची धामधूम असो अथवा देशांतर्गत राष्ट्रीय स्पर्धा, ‘खेलो इंडिया’च्या स्पर्धा असोत, त्या सगळ्या विजेत्यांचा सन्मान केला जातो तो-प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे, चषक, ढाल (शिल्ड), पदके अशा विविध स्वरुपांनी. त्यातही परत या सोन्या-चांदीचा अंतर्भाव अपरिहार्य असतो.

बाल्यावस्थेतच जडते सवय

बक्षीस वितरणाच्या मंचावर(पोडियम) प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जेव्हा सुवर्णपदक विजेत्याच्या गळ्यात घातले जाते, तेव्हा लगेच तो विजेता ते सुवर्णपदक आपल्या मुखी लावत, ते दातांनी चावण्याचा नकळत प्रयत्न करतो. चावायला सोपे व त्यामानाने मऊशार असलेले ते सुवर्णपदक त्याला जणू आपल्या बाल्यावस्थेत घेऊन जाते. आपण नेहमी बघत असतो की, बाळाला जेव्हा आई कडेवर घेत असते, तेव्हा लगेच आपल्या आईच्या सौभाग्यालंकारातील मंगळसूत्राच्या मध्यभागी असलेले, सोन्याचे चार गोल मणी व सोन्याच्या दोन लहान बसविलेल्या वाट्या हे तोंडात घेत घेतच चावायला सुरुवात करत असते. बालपणापासून सोने चावायची सवय त्याला असतेच. स्पर्धेच्या थोरवीप्रमाणे विजेत्यांना देण्यात येणारी पदके अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विंबल्डन टेनिस, क्रिकेट, फुटबॉल अशा अनेक स्पर्धांत चषक, ढाल वगैरे देताना तसेच सांघिक अजिंक्यपद विजेत्यांना, वैयक्तिक पदके, प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे दिली जातात. प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी पदके प्रदान करण्यात येतात.

’ऑलिम्पिक’चे स्वर्णिम महत्त्व

अशा जागतिक स्पर्धेत ‘ऑलिम्पिक’ ही स्पर्धा सगळ्यात मोठी व मोलाची समजली जाते. अमक्या देशाच्या पारड्यात एकूण एवढ्या सुवर्णपदकांचा, एवढ्या रौप्य तर एवढ्या कांस्यपदकांचा समावेश आहे, अशा बातम्या ऐकल्यावर आपण त्या पदक विजेत्यांचे अभिनंदन करत असतो. अशा ’ऑलिम्पिक’चा प्रारंभ ज्या ठिकाणी झाला, त्या ग्रीकच्या संस्कृतीत खेळांना, खेळाच्या स्पर्धांना प्राचीन काळापासून महत्त्वाचं स्थान आहे. प्राचीन ग्रीकमध्ये इसपू आठव्या शतकात म्हणजे सुमारे २,७०० वर्षांपूर्वी या क्रीडास्पर्धांची सुरुवात झाली होती. सुमारे ५० हजार जण त्या खेळांसाठी हजेरी लावायचे, असे उल्लेख आपण इतिहासात वाचतो. तशा ग्रीकांसाठी ’ऑलिम्पिक’ हा एक धार्मिक उत्सवही मानतात. ग्रीक संस्कृतीतील झ्यूस या देवांच्या राजाच्या सन्मानार्थ ऑलिम्पिया इथे या खेळांचं आयोजन केलं जायचं. तिथल्या झ्यूसची मंदिरातील त्या दैवताची सोनं आणि हस्तिदंतानं मढवलेली मूर्ती आढळते.

अशा ग्रीकमधे प्रारंभी झालेल्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांचे आता रूपडे आमूलाग्र बदललेले दिसते. त्यातही आता विजेत्यांना (मेडल्स) सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी पदके दिली जाताना आपण बघत असतो. त्या पदक विजेत्यांचा जितका त्यामुळे सन्मान होत असतो, तितकाच त्याच्या देशाचाही त्यातून सन्मान होत असतो.

कसे घडते ’ऑलिम्पिक’ पदक...

सोने-चांदी-कांस्य पदकांचा ’ऑलिम्पिक’मधील स्वर्णिम सहभागाचा आपण येथे थोडक्यात आढावा घेऊ. ’ऑलिम्पिक’ विजेत्यांना प्रदान करण्यात येणार्‍या पदकांची रचना, बांधणी कशी करतात, त्याचे नियोजन कसे करतात, त्याचे नमुने आणि अंतिम आकृतीबंध ठरवणे, ते प्रत्यक्षात उतरवणे असे प्रकार रोचक वाटतील असे आहेत. स्पर्धेत प्रदान करण्यात येणार्‍या, पदकांची जबाबदारी ही स्पर्धा जेथे आयोजित करण्यात येणार असते, त्या यजमान देशाची असते. यजमान देश त्या पदकांची रूपरेषा ठरवतो. त्यासाठी तो यजमान देशवासीयांत चढाओढ निर्माण करत, ज्याचे डिझाईन सर्वोत्तम ठरते, त्या रचनेनुसार पदक बनवायला घेण्याआधी आंतरराष्ट्रीय ’ऑलिम्पिक संघटने’ची मान्यता घेतो. ही पदके देशाच्या टांकसाळीत(मींट) बनवली जातात. योजनाबद्ध प्रारुपाचा कच्चा मसुदा केला जातो. पदकांची हुबेहूब प्रतिकृती बनवली जाते.

सोन्या-चांदीचं प्रमाण

पदकांमध्ये सोन्या-चांदीचं प्रमाण किती असतं, हे जाणून घेण्यासाठी आपण वानगीदाखल टोकियो ’ऑलिम्पिक’च्या पदकांचे उदाहरण पाहू. त्या पदकांचे नमुने ओसाका येथील ग्राफिक डिझायनर कलाकार जुनिची कवानिशी यांनी तयार केले होते. त्यांनी याआधी ’पॅरा ऑलिम्पिक’साठीच्या पदकांचे यशस्वी नियोजन केले होते. ’ऑलिम्पिक’ पदकांच्या प्रारुपात ग्रीक देवता नाईकीचे चित्र आहे. त्या पदकांसाठी जपानमधील धातूंचा पुनर्वापर करून, जवळपास ६.२१ दशलक्ष इलेक्ट्रॉनिक घटक गोळा करून, ही पदके बनवण्यात आली होती. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही पदकांचा व्यास सुमारे ८५ मिमी होता. त्या पदकाची जाडी ७.७ मिलीमीटरपासून १२.१ मिलीमीटरपर्यंत असते. विजेत्याला जे सुवर्णपदक दिले जाते. त्यात सोन्याचे प्रमाण फार कमी असते. खरं तर सुवर्णपदक हे शुद्ध चांदीपासून बनवतात. त्यानंतर त्यावर सोन्याचे पाणी चढवले जाते. सुवर्णपदकाचे वजन सुमारे ५५६ ग्रॅम इतके असते. पण, यात सोने हे फक्त सहा ग्रॅमच असते, तर रौप्यपदकाचे वजन हे ५५० ग्रॅम असते. यात शुद्ध चांदी असते; मात्र त्यासोबत तांबे आणि जस्त याचे मिश्रणही यात असते. रौप्यपदकात ९५ टक्के तांबे आणि पाच टक्के जस्त असते.

पदकांचे बाजार मूल्य
 
’ऑलिम्पिक’मध्ये मिळालेली पदकं ही अनमोल असतात. मात्र, जर यातील सुवर्णपदक विक्रीस काढले, तर त्याला साधारण ८०० डॉलर म्हणजे साधारणपणे ६० हजार रुपये मिळतात. त्याचवेळी रौप्य आणि कांस्य पदकांची किंमत अनुक्रमे ४५० डॉलर आणि पाच डॉलर इतकी होते. त्या पदकांसोबत काही देश या खेळाडूंचा सन्मान म्हणून विविध गोष्टी पुरस्कार स्वरुपात देऊ करतात. एका पदकातून जी कमाई होते, ती समजल्यावर म्हणून तर चोरटे हावरट बनतात आणि हातोहात आपले कसब दाखवत, पदक विजेत्याला दुःखात ढकलतात.

नोबल आणि नोबेल...

क्रीडा क्षेत्रात जसे सुवर्ण, रौप्य, कांस्य हे आपण पदकांसाठी मोलाचे मानतो, तद्वतच हे नोबल धातू जगप्रसिद्ध असलेल्या ’नोबेल’ पारितोषिक विजेत्यांना सुवर्णपदकाच्या स्वरुपात अनमोल वाटतात. त्या ’नोबेल’ पारितोषिक विजेत्याच्या सुवर्णपदकाचे वजन जरी निरनिराळे असले, तरी प्रत्येक ’नोबेल’ सुवर्णपदकात १८ कॅरेट शुद्धतेचे हिरव्या छटेच्या २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा मुलामा दिलेले पदक असते. त्याचे सरासरी वजन साधारणपणे १७५ ग्रॅमच्या मागेपुढे असते. २०१२ सालच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, आपल्याला त्या ‘नोबेल’ पारितोषिकातील सुवर्णपदकाच्या किंमतीचा अंदाज येईल. तेव्हा १७५ ग्रॅमच्या पदकाचे बाजारमूल्य ९ हजार ,९७५ अमेरिकन डॉलर्स होते.

पदकांचे स्तेन कर्म...

आजमितीस नोबेल सुवर्णपदकाचे बाजारमूल्य जरी आपण जाणून घेतले, तरी त्या सुवर्णपदकाचे मूल्य त्या पदकविजेत्याच्या दृष्टिकोनातून मोजता न येणार्‍या, बहुमोल किमतीचेच असते, मग ते पदक नोबेलचे असो, सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांच्या ’ऑलिम्पिक’चे असो, ’खेलो इंडिया’चे असो अथवा अगदी स्थानिक पातळीवरील स्पर्धेत मिळवलेले असो. त्यावरून आठवतात भारतातीलच पदक विजेत्यांकडे झालेल्या चोरींच्या कहाण्या. चोरी ही संकल्पना प्राचीन काळापासूनच चालत आलेली आहे. ऋग्वेदामध्ये तस्कर, स्तेन हे चौर्यकर्माशी संबंधित शब्द वारंवार आढळून आले आहेत. येथे आपण मोजक्याच क्रीडा क्षेत्रातील अन् ’नोबेल’ विजेत्यांच्या पदकांच्या सत्यकथा थोडक्यात पाहणार आहोत.

राष्ट्राचे प्रथम ’नोबेल’ पदक

पहिली चोरी रवींद्रनाथांच्या भारताच्या पहिल्या ‘नोबेल’ सुवर्णपदकाची तर दुसरी कैलाश सत्यार्थी यांच्या २०१७ साली पकडलेल्या चोरीची. रवींद्रनाथ टागोर हे ’गीतांजली’ या महाकाव्यासाठी साहित्यात ‘नोबेल’ पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते. हा पुरस्कार विश्व भारती विश्वविद्यालयाकडे सांभाळायला देण्यात आला होता. मात्र, तेथे त्यांचे ‘नोबेल’ चोरीला गेले होते. त्यानंतर अकादमीने विश्व भारती विश्वविद्यालयाला ‘नोबेल’ पुरस्काराच्या दोन प्रतिकृती दिल्या. त्यातील एक सोन्याची आणि दुसरी पुतळ्याची आहे. त्यानंतर आठवण येते, ती सरकारी गलथानपणाने न सापडलेल्या क्रीडा क्षेत्रातील पदकांच्या चोरीची.

१९८५ मध्ये मेजर ध्यानचंद यांच्यानंतर हॉकीत जागतिक सुवर्णपदक विजेते बलबीर सिंग (ज्येष्ठ) यांच्याकडे भारतीय क्रीडा संघटन (साई)ने मागणी केली होती की, तुम्ही तुमच्याकडे तुम्ही जिंकलेली ’ऑलिम्पिक’ सुवर्णपदकांसमवेत जी काही पदके आहेत, ती आमच्याकडे द्या. ती सगळी आम्ही प्रदर्शित करत आमच्याकडे ठेवतो. त्यामुळे ते प्रदर्शन बघायला जे येतील, त्यांना त्यातून प्रेरणा मिळेल आणि तो आमचा बहुमान असेल. त्या विनंतीला मान देत, त्यांनी ते सारे मान सन्मान ’साई’कडे सुपुर्द केले. नंतर २०१२च्या लंडन ’ऑलिम्पिक’च्या संयोजकांनी जगातील प्रमुख सुवर्णपदक विजेत्यांना सांगितले की, आम्हाला तुमचा सन्मान करायचा आहे, तेव्हा तुम्ही तुमची पदके आणि तुमचा ब्लेझर घेऊन या आम्ही ते लंडनच्या ऑपेरा हाऊसमध्ये प्रदर्शनात ठेवू. त्या प्रमाणे बलबीर सिंग यांनी तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री अजय माखन आणि साई यांच्याकडे मागणी केली. त्यांच्याकडून आलेलं वृत्त धक्कादायक होते. त्यात निर्लजासारखे उत्तर होते व त्याचा मथितार्थ असा होता की, ’आम्हाला माफ करा. तुमची पदके, ब्लेझर वगैरे सापडत नाही. ते गहाळ झाले आहे अथवा चोरीस गेले आहे.’ नंतर ते मिळालेच नाही. या ३६ पदकांचे मूल्य त्या चोरांच्या लेखी काय असेल, यापेक्षा बलबीर सिंग यांच्या लेखी काय असेल! हे ’साई’वाले ते मूल्य चुकवूपण शकणार नाहीत. हे सुवर्ण मूल्य वेगळेच असते.

थोडक्यात, सुवर्ण-रौप्य-कांस्य पदकांचे मूल्य प्राचीन ते अर्वाचीन काळात आपल्या आपल्या दृष्टीने कसे असते, हे समजून घेतले तर स्वर्णिम पदके नक्कीच रोचक आणि विचारात पाडणारीच असतील. नाही का!


श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.