मस्त कलंदर कलाकार

17 Dec 2023 20:14:46
Article on Charandas Jadhav

चरणदास जाधव याचा पारोळा जळगाव ते मुंबई प्रवास आणि त्याच्या कारकिर्दीची ऑफिस बॉय ते स्वतःचा स्वतंत्र स्टुडिओ अशी पुढे गेलेली वाट शोधण्याचा या लेखातून केलेला हा प्रयत्न...

खान्देशातील जळगावजवळ एका खेड्यात एका कलाकाराचा जन्म होतो. हाताला लागेल ते काम करणार्‍या, तांड्यासोबत त्याचा प्रवास सुरू होतो. मातीची शिल्प बनवणे, घडे घडवणे, सुक्या लाकडांच्या सुरेख वस्तू बनवणे हे पाहत तो मोठा होतो. ओघानेच करूही लागतो. सौंदर्यदेवता हाताच्या बोटांवर वास्तव्याला येते. शिक्षणात रस नसतोच. सौंदर्य घडवणारे हात शब्दांची गुलामी कशी करतील? अक्षर मात्र सुंदर. जणू मोत्याच्या दाण्यासारखे! त्यात कुठेतरी चित्रकलेची आवड लागली. चित्रकलेचं शिक्षण घ्यावे म्हणून ’एटीडी’चा डिप्लोमा करायचा ठरवला. परीक्षा आली, तेव्हा रंग साहित्य घेऊन जायचे असते, याची कल्पनाच नाही. इतक्या प्रारंभिक अवस्थेतली चित्रकला.

पुढे आपले नशीब आजमावायच्या दृष्टिकोनातून चरणदासने मुंबईची वाट धरली. मुंबईत त्याचे काही नातेवाईक होते. एका कार्यालयात ऑफिस बॉयचे काम त्यावेळी तो करायचा. मुंबईत आल्यावर मात्र त्याला आयुष्यातले रंग दिसू लागले. त्याच्या कलाप्रतिभेला खाद्य मिळू लागलं. कामाव्यतिरिक्त उर्वरित वेळ तो जे.जे.च्या पटांगणात घालवू लागला. तिथे कला क्षेत्रातील विविध शाखांबद्दल माहिती झाली. कला क्षेत्रात एवढ्या संधी उपलब्ध आहेत, याची नव्यानेच जाणीव झाली आणि त्याने एकदिवस धीर करून घरी सांगितले, यापुढे शिकायचे आहे. नोकरी काही काळ बंद.

शिक्षणासाठी सुरुवात करायची म्हणजे प्रवेश प्रक्रियेपासून तयारी. प्रवेश प्रक्रिया काय असते? तिचे स्वरूप काय असते, याची कल्पना नाहीच. ’सीईटी’ची परीक्षा होती. सामान्य ज्ञानाविषयी पूर्णपणे अनभिज्ञता. परीक्षा गृहात प्रथम उत्तरपत्रिका वाटण्यात आल्या. प्रश्नपत्रिका वेळ झाल्याशिवाय देता येत नाहीत ना! उत्तर पत्रिकेवर योग्य पर्याय निवडून खूण करायची होती. काहीही न समजल्याने प्रश्नपत्रिका हातात मिळण्यापूर्वीच एकेक पर्यायावर अंदाजाने त्याने खुणा केल्या आणि प्रश्नपत्रिका वाटायला सुरुवात करेपर्यंत चरणदासचा पेपर सोडवून झाला होता. एवढेच पुरे नाही, तर त्या परीक्षेत त्याला ४० पैकी ३२ गुण मिळाले आणि सर्वांपेक्षा अधिक गुणांनी तो उत्तीर्ण झाला.
 
प्रवेश रेखा व रंगकला विभागात मिळाल्याने काहीसा तो नाराज होता. त्याला रस होता-तो शिल्पकलेत. मध्यंतरी अभ्यास सोडून द्यायचाही, त्याचा विचार झाला होता. तेव्हा शिक्षकांनी समजावले. हातात पदवी आल्यानंतर तू काहीही करू शकतोस. त्यासाठी शिक्षण सोडायची गरज नाही. पुढे त्याने मास्टर्ससुद्धा केले. पदव्युत्तर शिक्षण मात्र त्याने ’प्रीटिंग’ हा विषय घेऊन केले. आता तो धातू, लाकूड, दगड अशा अनेक माध्यमांतून काम करतो. प्रत्येक माध्यमाची पद्धत वेगळी. त्याच्या कलेविषयी म्हणायचे, तर त्यात पराकोटीचा बोल्डनेस आहे. त्याविषयी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला की, “यात वेगळे असे मला काही दिसत, वाटत नाही. मी ज्या कुटुंबातून आलो, तेथे स्वातंत्र्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं की, या मुंबईच्या जीवनातल्या बंधनांना काही अर्थ नाही,असे मला वाटते. बालपणापासून मी जे पाहत आलो, तेच साहजिक माझ्या कलेतून उतरते. त्याला कल्पनेचा आकृतिबंध नसतो.”

मुंबईतही काही बदनाम गल्ल्या आहेत, तिथे मजकूर मोठ्या प्रमाणावर मिळतो. चरणदास तिथल्या माणसांचे जनजीवन, स्त्रिया, यांचा अभ्यास करत फिरत असायचा. महाविद्यालयात शिकत असतानाच, त्याचे लग्नही झाले. पत्नी गावाला आणि मुलगाही झाला. अशावेळी त्याचे मन मुंबईत रमत नसे. पण, शिक्षकांनी सांगितल्यामुळे शिक्षण पूर्ण करायचे ठरले. या काळात मिळत असलेली कामं तो घ्यायचा. अशाने व्यासंग वाढत गेला. आजच्या घडीला अंबरनाथमध्ये त्याचा स्टुडिओ आहे.

त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत; तसेच त्याचे कित्येक कलादालनात प्रदर्शने झाली आहेत. २०२२चा ‘इंटरनॅशनल टागोर अवॉर्ड’, भोपाळ, २०२२चा ’प्रफुल्ल डहाणूकर ग्रांट’, २०१९चा पुण्याचा ’आर्ट एक्झिबिशन अवॉर्ड’, २०१९चे ’जयंतराव टिळक पारितोषिक’, त्याच वर्षात मिळालेले बिर्ला ’अकादमी पुरस्कार’, ’डॉ. मेहता पुरस्कार’, ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’, २०१८चा ’अप्रोच गॅलरी अवॉर्ड’ आणि २०१७चा प्रिंट मेकिंग स्टुडिओ पारितोषिक प्राप्त झाले आहेत.

२०१७ साली त्याचे पहिले प्रदर्शन मुंबईत आर्टिस्ट एक्झिबिशन येथे झाले. त्यानंतर पुढील वर्षीय मुंबईतीलच द फर्स्ट मुंबई कोरियन बिनाला आणि डायलॉग विथ नेचर येथे झाले. त्यानंतर जयपूरला ‘अनोळखी ५’ नावाने एक समूहाचे प्रदर्शन होते. २०२१ मध्ये त्याची कला भादव्यासारखी बहरली. येरेवान, युक्रेन आणि असं या तीन ठिकाणी त्याच्या कलाकृतींची प्रदर्शने झाली. २०२३ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी आणि नवीन फिश कलादालनात समूह प्रदर्शन झाले.

बर्‍याच कार्यशाळांमध्ये त्याचा सहभाग दिसतो. नेरळ, हैदराबाद, मुंबई येथे संपन्न झालेल्या, अनेक कार्यशाळांमध्ये त्याची उपस्थिती होती. त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून त्याला अनेकानेक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0