'आयटीआय'च्या अभ्यासक्रमात शिवराय, फुले, टिळक, आंबेडकर आणि सावरकर!

16 Dec 2023 20:40:37
IIT news


नागपूर : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय') विद्यार्थी आता छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौशल्य विचार शिकणार आहेत. त्यासाठी एक विशेष पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ही संकल्पना आहे.

सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र सतत आघाडीवर राहिला आहे. याचे कारण महाराष्ट्राच्या समाज मनाची अनेक महापुरुषांनी योग्य मशागत केली आहे. कौशल्य विकासात महाराष्ट्र सक्रिय योगदान देत आहे. या मागचा इतिहास शोधला तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या अनेक महामानवांचे द्रष्टेपण दिसून येते. या महापुरुषांच्या विचार आणि कृतीत तंत्रशिक्षण, कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.
 
टाकसाळ निर्मिती, किल्ले बांधणी, आरमार उभारणी, शस्त्र निर्मिती करण्याचे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला दिले आणि त्यांच्या सहकार्याने रयतेचे राज्य उभे केले. इंग्रजी शिक्षणाचा प्रसार सुरू झाल्याच्या प्रारंभ काळात महात्मा जोतीराव फुले यांनी कन्स्ट्रक्शन कंपनी उभी केली. दर्जेदार पूल, रस्ते, इमारती बांधल्या. मुद्रण कला शिकून घेतली. प्रिंटिंग प्रेस निर्माण करून पुस्तक छपाई केली. शेअरचे महत्त्व जनतेला सांगितले, त्याचबरोबर कौशल्य शिक्षण आणि उद्योजकता यांबाबत त्यांच्या अखंडांमधून जनप्रबोधन केले.
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्योगधंदे देशाचा कणा मानले. त्यासाठी आवश्यक शिक्षण देण्याचा त्यांनी नेहमीच पुरस्कार केला. लोकमान्य टिळकांनी 'घंदे शिक्षण' (व्यवसाय शिक्षण) देण्याचा आग्रह धरला. स्वतःची प्रिंटिंग प्रेस उभी करून केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. नोकरी ऐवजी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारा असा सल्ला स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमीच तरुणांना देत असत. कौशल्य शिक्षण घेतानाच आरोग्याकडेही तरुणांनी लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राचे अस्सल रांगडे खेळ तरुणांनी खेळून शरीरही कमाविले पाहिजे, आशा मताचे ते होते. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांपर्यंत महापुरुषांचे हे विचार पोहोचविण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.

महापुरुषांचे तेजस्वी विचार महाराष्ट्र आणि देशाला नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरले आहेत. या विचारांतून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि आधुनिक कौशल्य शिकून देशाच्या उद्योग व्यवसायात योगदान द्यावे. त्यातूनच देशाचा विकास होईल, हा उद्देश मनात ठेवून 'महापुरुषांचे कौशल्य विचार' या पुस्तकाची निर्मिती केली आहे.- मंगलप्रभात लोढा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री




Powered By Sangraha 9.0