रसिका शिंदे-पॉल
मुंबई : काळानुरुप मालिका, चित्रपटात दिसणाऱ्या अभिनेत्रींची व्याख्या बदलली. आधुनिक काळानुसार त्यांचे कपडे परिधान करण्याची फॅशन देखील अत्याधुनिक होत गेली. मात्र, तरीही अलीकडे मराठी अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन किंवा त्यांनी केलेल्या बोल्ड फोटोशुटवरुन सोशल मिडियावर अनेकजण ट्रोल करतात. याबद्दल आपले वैयक्तिक मत ‘महाएमटीबी’शी स्मिता तांबे हिने मांडत अभिनेत्री सई ताम्हणकर आणि मिताली मयेकर यांचे विशेष कौतुक तिने केले आहे.
काय म्हणाली स्मिता?
”सई ताम्हणकर कपडे उत्तम कॅरी करते. तिच्याकडे पाहून मला कधीच वेगळं वाटलं नाही. याशिवाय मिताली मयेकर देखील तिने घातलेल्या कपड्यामध्ये उत्तम वावरते. झीच्या एका पुरस्कार सोहळ्यात मितालीने एक सुंदर लो नेकचा गाऊन घातला होता. पण त्यात ती स्वत:ला अतिशय सुंदर पद्धतीने हाताळत होती. त्यामुळे तात्पर्य काय? तर त्या-त्या अभिनेत्री त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांमध्ये स्वत:ला नीट सांभाळू शकत असतील तर त्यांना पाहणाऱ्या लोकांच्या विचारधारा देखील सकारात्मक असतील”.
प्रत्येक कलाकाराला त्याचे पुस्तक लिहिता आले पाहिजे
मनोरंजन क्षेत्रातील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना स्मिता म्हणाली, “अभिनय क्षेत्रात आल्यापासून माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. सुरुवातीच्या काळात मी या क्षेत्रात आले त्यावेळी माझं पाठांतर चांगलं आहे मी संवाद बोलू शकते इथपासून सुरु झालेला प्रवास आज मला आंतरराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत घेऊन आला. मला कायम असं वाटतं की जीवनात जर तुम्हाला कलाकारा व्हायचे असेल तर तुम्हाला तुमचं पुस्तक लिहिता आलं पाहिजे. आणि त्याची प्रस्तावना फार महत्वाची आहे. आता पुस्तक लिहायचं म्हणजे काय? तर ज्यावेळी मागे वळून तुमच्या जीवनात घडलेले प्रसंग, घटना तुम्हाला आठवून त्या सविस्तर मांडता येतील त्यावेळी तुमचं पुढचं भवितव्य हे उज्वल असतं”.
पुढे स्मिता म्हणाली, “मनोरंजन क्षेत्राचं खरं तर एक खास वैशिष्ट्य आहे ते असं की हे क्षेत्र फार अस्थिर आहे. आणि हिच या विश्वाची खासियत आहे, कारण तुम्ही तुमचं प्रत्येक पात्र, भूमिका रोज नव्याने जगत असता आणि घडवत असता”. दरम्यान, ‘जोरम’ या चित्रपटात मनोज वाजपेयी, मेघा माथूर, राजश्री देशपांडे, मोहम्मद झिशान अय्युब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.