मुंबई : वांद्रे पश्चिम येथे उभे राहणारे मुंबईतील पहिले अद्ययावत स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे लवकरच कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. १५ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
सायबर गुन्हेगारीमध्ये होत असलेली वाढ आणि सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक फसवणूक पाहता मुंबईत स्वतंत्र अद्ययावत सायबर पोलीस स्टेशन असावे, अशी मागणी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष शेलार यांनी केली होती. ती मान्य करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सायबर पोलीस स्टेशन उभारण्यास मंजूरी दिली. त्याचे भूमिपूजन १५ जून २०१९ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या बहुमजली इमारतीचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाजवळच्या स्वामी विवेकानंद मार्गावर असेल्या या इमारतीत अद्ययावत तंत्रज्ञान असलेले पोलीस ठाणे, अधिकारी निवास आणि साबर ट्रेनिंग सेंटरचा समावेश आहे.
दरम्यान, हे पोलीस ठाणे कधीपर्यंत सुरू होईल, अशी विचारणा शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. त्यावर, सध्या सुरू असलेल्या कामाचा आढावा घेऊन लवकरच हे सायबर क्राईम पोलीस ठाणे आणि लॅब सुरू होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.