'डबल लाईफ’ : एक धमाल विनोदी संगीत नृत्यनाट्य

15 Dec 2023 20:40:41
Article on Natak Double Life

'डबल लाईफ’ या विनोदी संगीत नाट्याचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच संपन्न झाला. पाश्चात्य संस्कृती, भारतीय प्राचीन परंपरा, संगीत, हिंदुस्थानी रागसंगीत, नातेसंबंध आणि बदलता काळ अशा अनेक मुद्द्यांना विनोदी शैलीत गुंफून तयार झालेली ही खुसखुशीत कलाकृती. आपल्या धारणा, आपल्या परंपरेविषयीच्या समजुती आणि आपल्याला मिळालेला वारसा याबाबत आपले काय विचार आहेत याबाबत सूक्ष्म विचार करायला लावणारे हे नाटक.

काही वर्षांपूर्वी आलेल्या पुरुष नाटकात जेव्हा स्त्री पडद्याआड न जाता, साडी बदलते तेव्हा तिच्या धैर्याचे कौतुकही झाले आणि गवगवाहीझाला. या नाटकात दोन्ही तरुणी आपलापदर फेडून साडी सोडून टाकतात, एकदा नव्हे दोनदा! पण, ही तिची कृती सहज स्वीकारली जाते, तेव्हा प्रेक्षकांची बदललेलीकिंवा सरावलेली नजर याच वाहून गेलेल्या काळाबद्दल बरंच काही सांगते.

नाटक पाहताना प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, दोन पिढ्यांमधून धो धो वाहून गेलेल्या काळाला दुर्लक्षित केलेले नाही आणि त्यावर साकव घालण्याचा वृथा प्रयत्नही झालेला नाही. पिढी बदलताना त्यांच्या विचारात, राहणीमानात बदल होतच असतात. परंतु, २०व्या शतकातून २१व्या शतकात बदललेली एकच पिढी एकमेकांपासून फार वेगळी आहे. याच काळात अनेक क्षेत्रात क्रांती झाली. सामाजिक अभिसरण आजही मोठ्या प्रमाणावर त्याचमुळे होतंय. ७५ वर्षांपूर्वी आपल्यावर सत्ता गाजवणार्‍या राज्यकर्त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव अजूनही आपल्या मनामनांवर मोठ्या प्रमाणात आहे आणि तरीही आपल्या संस्कृतीच्या मुळांचे अनाहूत आकर्षण या नव्या पिढीलासुद्धा आहे. त्याचबरोबर संगीतासारख्या अभिजात कलांचा वारसा मात्र या नव्या पिढीनेही अगदी अभिमानाने आणि भेसळ न करता पुढे आणलाय.

नाटकाचे कथानक तसे साधेसेच. एक कुटुंब, आई वडील आणि मुलगा. मुलाची प्रेयसी आणि त्याच्यासाठी वडिलांनी शोधलेली आपल्या मित्राची मुलगी, असे सहा जण आणि एक निवेदक. मधून मधून येणारी भुताच्या रूपात आजीबाईंची मूर्ती. १०० वर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या रूढी-परंपरा, बोलण्याच्या पद्धती, पेहराव, भाषा आणि संगीत हे सर्व घरातले नियम. त्यांचे उल्लंघन करायचे नाही. घरातली पुढची सूनही हे सर्व मानणारीच हवी, असा गृहस्वामिनीचा अट्टाहास. तिच्यावर हार घातलेल्या फोटोतल्या सासूबाईंचा वचक. आजचा बदलता काळ पाहता आपले लग्न होईल का, या प्रश्नाने मनाला घोर लागलेला गजा उर्फ गजानन. मग एका लालची मुलीला पिढीजात मालमत्तेचे आमिष दाखवून तिच्यावर प्रेम करायचे नाटक आणि दुसरीकडे आपल्या मुलाच्या लग्नाच्या काळजीने वडिलांनी आपल्या मित्राला सांगून त्यांच्या मुलीची घातलेली समजूत. वधुशोधनाला आईला मंदिरात पाठवायच्या वेळीस झालेला दैवी दृष्टांत आणि त्यावरून ठरलेले बापलेकाचे आपले स्वतंत्र प्लॅन्स! अशा रीतीने दोन्ही सुना घरात एकाच दिवशी वरपरीक्षेसाठी येतात आणि यांच्यात स्पर्धा घेतली जाते. असे खेळीमेळीचे वातावरण. सोबतीला पाश्चात्य आणि भारतीय रागसंगीत आहेच. त्यासोबत नृत्यही आहे. नाटकाची सुरुवातच गणेशवंदनाने होते, त्यापाठोपाठ नृत्य आणि मग निवेदकाचा प्रवेश होतो. सुरुवातीला प्रायोगिकच असावं, असं वाटणारं नाटक पुढे पुढे रंग भरत जातं.

संगीत नाटक असले तरीही पारंपरिक नाट्यसंगीत किंवा आलापी तेवढीशी रंगली नाहीये. दीप्ती भागवत आणि शर्वरी बोरकर या दोघी उत्तम गातात. परंतु, त्यांच्या गायकीला तेवढा वाव मिळालेला दिसत नाही हेही खरे. काही विडंबन गीते आहेत, काही नवी गीते आणि पाश्चात्य संगीतही आहे. निवेदकाची गरज तशी जाणवत नाही, तरीही त्याच्या वाट्याला संगीतातून निवेदन आले असते, तर त्याची भूमिका अधिक खुलून दिसली असती. प्रकाशयोजना आणि नेपथ्य मात्र उत्कृष्टच. खरेतर सर्वच तांत्रिक बाजूंत सावरलेल्या. बहुतांश बॅकस्टेज कलाकार मिसरूडं फुटू घातलेले आहेत तरी अननुभवी मात्र वाटत नाहीत. ब्लॅकआऊटच्या वेळी होणार्‍या चपळ हालचाली, पार्श्वसंगीत, अत्यंत कमी वेळात बदलणारे घडीचे नेपथ्य आणि टापटीप बैठक व्यवस्था पाहताना संचाला दाद द्यावीच लागते. रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा कालानुरूप साजेश्या आणि सुसंगत आहेत.

विनोदी नाटक आहे. तसा विनोदही लहानसहान खाचाखोचांत भरून राहिलेला. निखळ हसू वळणा- वळणावर आहेच. चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. तसे पाहिले, तर विजय गोखलेंनी एकहाती नाटकातला विनोद जीवंत ठेवला, असे म्हणणे अतिशयोक्तीचे वाटत नाही. आपल्या अनुभवी कारकिर्दीचा परिपूर्ण उपयोग त्यांनी आपल्या संवादातून केलेला आहे. आवाजाचे चढते-उतरते स्तर आणि वरून खालच्या पट्टीत येतानाचा तणाव जराही त्यांच्या चेहर्‍यावर दिसत नाही. शर्वरी हुशार अभिनेत्री आहे. आपल्या संपूर्ण शरीराचा आणि आवाजाचा उत्तम वापर ती करून घेते. रंगभूमीवर असताना केवळ आपला चेहरा दिसत नाही, तर संपूर्णपणे आपल्याला पाहिले जातेय, याचे भान तिला आहे. कॅमेर्‍यासमोर काम करताना हरवत गेलेल्या या खुबी तिच्यात मात्र कौतुकाने वाखाणण्यासारख्या आहेत. अभिनयाला तालासुरात दिलेली उत्तम सांगीतिक सोबत तिचे व्यक्तिमत्त्व आणि भूमिकासुद्धा खुलवून दाखवते. दीप्ती तशी नाजूक, गोड गळ्याची, सुंदर म्हणून आपल्या सवयीची आहे, मात्र सासूची खमकी भूमिका तिला विसंगत वाटली तरी साजेशी निभावली आहे. उदित घराला आणि सर्व पात्रांना एकत्र सांधणारा दुवा आहे आणि त्याच सहजतेने तो संपूर्ण रंगमंचावर वावरतो. शुभमचे प्रवेश त्यामानाने कमी असले, तरी आपल्या रसाळ वाणीने आणि प्रसन्न मुद्रेने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहेत. एकाच प्रवेशासाठी येणारे मंडप वाढेकर म्हणजेच शशिकांत दळवी आपल्या खळाळून हसण्याच्या सवयीने प्रेक्षागृहावर छाप पडून जातात. संपूर्ण नाटकात लक्षात राहणारा असाच हा प्रवेश.

विद्याधर गोखलेंच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त सुरू केलेल्या या नाटकाचे वेगळेपण असे विशेष उल्लेखनीय काही नाही. मात्र, या मंडळींनी रसिकांचे मनोरंजन करण्यात कुठेही कसर पडू दिली नाही. रवींद्र भागवते यांनी लिहिलेले ’डबल लाईफ’ हे नाटक रणजित पाटील यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य केले आहे, तर श्रीनाथ म्हात्रे यांनी संगीत दिले आहे. अमोघ फडके यांची प्रकाशयोजना तर कुणाल पाटील यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. दीपक गोडबोले हे नाटकाचे सूत्रधार आहेत, तर सविता गोखले या कार्यकारी निर्माती आहेत. धकाधकीच्या जीवनात त्रासून गेला असाल, आपल्या परंपरा आणि पाश्चिमात्य जीवनशैलीचे आक्रमण अशा विचारांत गुरफटून गेला असाल, तर एकदा जाऊन पाहावे असेच नाटक आहे. सोमवार, दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता या नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिर नाट्यगृहात आहे. ‘बुक माय शो’ या ऑनलाईन तिकीट विक्री पोर्टलवर नाटकाची तिकिटे उपलब्ध आहेत.

Powered By Sangraha 9.0