नागपूर : तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी ठोस कायदा केला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी लेखी उत्तरात दिली.
स्पर्धा परीक्षा पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांसंदर्भात राज्य सरकार नवीन कायदा आणणार आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभाग तज्ज्ञांची समिती गठीत करेल. ही समिती अभ्यास करुन कायदा करण्याच्या संदर्भात राज्य सरकारला शिफारस करणार आहे. तलाठी भरती प्रक्रियेतील गैरप्रकरांसंदर्भात गुन्हे दाखल झाले असून, पोलीस अधिक्षक चौकशी करत असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.