कोकणात समुद्री कासवांचा जन्मोत्सव; राजापूरमधून पिल्ले समुद्रात रवाना

14 Dec 2023 10:17:22
konkan sea turtle



मुंबई (अक्षय मांडवकर) -
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे (konkan sea turtle). यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामात संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्लांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे (konkan sea turtle). राजापूरमधील वेत्ये किनाऱ्यावरुन आज सकाळी (१४ डिसेंबर) सागरी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. (konkan sea turtle)

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर दरवर्षी समुद्री कासवांमधील 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. मात्र, यंदाच्या कासव विणीच्या हंगामातील पहिले घरटे आॅक्टोबर महिन्यामध्येच सापडले होते. वन विभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १४ किनाऱ्यांवर कासवांची विण होते.
राजापूर तालुक्यातील वडातिवरे, वेत्ये आणि आंबोळगडचा किनारा सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी या किनाऱ्यावर कासवांची ९ घरटी मिळाली होती. याच किनाऱ्यावर २६ आॅक्टोबर रोजी कासवमित्र गोकुळ जाधव यांना कासवाचे घरटे आढळले होते. त्या घरट्यात सापडलेली ११५ अंडी जाधव यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार संरक्षित केली होती. या अंड्यामधून आज सकाळी ६ पिल्ले बाहेर पडली. या पिल्लांना सुखरुप समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.




अंडी व घरटय़ांची जपणूक
समुद्राच्या भरतीमुळे कासवांनी वाळूमध्ये केलेल्या घरटय़ांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासव मित्रांकडून ही अंडी टोपलीत सुरक्षितरीत्या ठेवली जातात. भरतीरेषेपासून दूर कृत्रिम घरटय़ांची निर्मिती करण्यासाठी उबवणी केंद्र तयार केले जाते. त्याला हॅचरी म्हणतात. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खडय़ाप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जातो. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. त्याभोवती कुंपण तयार केले जाते. अंडय़ांमधून बाहेर पडलेली पिल्ले इतरत्र भटकू नयेत म्हणून त्यावर जाळीदार टोपले ठेवले जाते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0