मेळघाटमधून 'या' दुर्मीळ पक्ष्याची प्रथमच नोंद; पक्ष्याच्या यादीत भर

    14-Dec-2023
Total Views |
Common Buzzard


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये सामान्य बाज (Common Buzzard) या पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मेळघाटच्या पक्ष्याच्या यादीत नव्या प्रजातीची भर पडली आहे. मेळघाटात पक्ष्याच्या ३०४ प्रजाती आढळत असून देशभरात आढळणाऱ्या एकूण प्रजातींपैकी २५ टक्के प्रजातींची या ठिकाणी नोंद झालेली आहे. (Common Buzzard)
मेळघाटचे जंगल हे विविधतेने संपन्न असा अधिवास असून या ठिकाणी पक्षी प्रजातींची विविधता विशेष संपन्न आहे. मेळघाटच्या जंगलात पक्षी अभ्यासाची सुरुवात सुमारे दीडशे वर्षापूर्वी झाली होती. याठिकाणी नुकतेच 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (BNHS) चार दिवसीय निसर्गशिबीर संपन्न झाले. या दरम्यान शिबिरातील सहभागी व तज्ञ मार्गदर्शक हे अकोट वन्यजीव विभागातील जंगल भ्रमंतीमध्ये असतांना धारगड भागातील जंगलात सामान्य बाज (Common Buzzard) हा दुर्मिळ पक्षी आढळून आला. पक्षी अभ्यासक तथा अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. निशिकांत काळे, 'बीएनएचएस'चे अभ्यासक नंदकिशोर दुधे, महाराष्ट्र पक्षिमित्रचे अमोल सावंत व शिबिरार्थींना हा पक्षी एका वाळलेल्या झाडाच्या खोडावर बसलेला आढळून आला. त्याचे निरीक्षण केले असता तो शुभ्रनयन तिसा (White eyed Buzzard) या प्रजाती पेक्षा वेगळा वाटल्याने त्याचे थांबून सखोल निरीक्षण केले आणि त्याची चांगली छायाचित्रे टिपण्यात आली. शेवटी हा पक्षी सामान्य बाज नावाचा दुर्मिळ पक्षी असल्याची खात्री पटली. ही या पक्ष्याची मेळघाटातील प्रथम नोंद आहे. यापूर्वी मेळघाटच्या पक्ष्यांच्या यादीमध्ये या पक्ष्याचा समावेश नव्हता.
 
सामान्य बाझ हा पक्षी भारतात हिवाळी स्थलांतर करून येणारी एक दुर्मिळ प्रजाती असून याच्या तुरळक नोंदी यापूर्वी मध्य भारतात व महाराष्ट्रात झालेल्या आहेत. हा पक्षी उत्तर पाकिस्तान व काश्मीर या प्रदेशातील रहिवासी असून तो हिवाळ्यात दक्षिणेकडे, विशेषतः श्रीलंका व केरळ राज्यात स्थलांतर करून जातो. बाझ कुळातील सामान्य बाझ या पक्ष्याची इंग्रजी ओळख कॉमन बझार्ड (Common Buzzard) किंवा स्टेपी बझार्ड (Steppe Buzzard) अशी असून शास्त्रीय नाव बुटीओ बुटीओ Buteo buteo vulpinus असे आहे. मेळघाटात आढळून आलेला हा पक्षी बुटीओ बुटीओ प्रजातीची वूल्पीनस ही उप प्रजाती असून यामध्ये दोन उप प्रजाती आढळतात. आकाराने शुभ्रनयन तिसा (White eyed Buzzard) या प्रजाती पेक्षा मोठा जवळपास ५५ सेंमी असलेला हा बाझ रंगाने गडद विटकरी असून छातीवर व डोक्यावर तपकिरी रंगाच्या उभ्या रेषा असतात. चोच आखूड व टोकावर काळ्या रंगाची असून डोळ्यावर काळ्या रंगाची भुवई दिसते. शेपूट आखूड व त्यावर खालून बारीक उभ्या रेषा असतात. शिकारी पक्षी गटातील या पक्ष्याचे खाद्य इतर गरुड किंवा बाझ प्रमाणे लहान प्राणी, सरडे साप इत्यादी असून तो मासाहारी पक्षी आहे. सामान्य बाझ प्रजातीच्या या नोंदीमुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी ३०५ इतकी झाली आहे. या महिन्याच्या अखेरीस मेळघाटात पक्ष्यांच्या अभ्यासासाठी मेळघाट सर्वेक्षण कार्यक्रम सुद्धा होणार असून या मधून सुद्धा मेळघाटातील पक्ष्यांच्या स्थितीवर प्रकाश टाकला जाणार आहे.
सातपुडा स्थलांतरीत पक्ष्यांसाठी महत्त्वाचा
मेळघाटचे जंगल हा सातपुड्यातील सर्वात जैवविविधता संपन्न प्रदेश असून सुरक्षित असा अधिवास आहे. स्थलांतर करून दक्षिणेकडे जाणाऱ्या पक्ष्यांसाठी सातपुडा हा महत्वाचा संचार मार्ग असून या मार्गाने अनेक पक्षी स्थलांतर करीत असतात व या भागात सुद्धा स्थलांतर करून येत असतात. सामान्य बाझ या पक्ष्याची नोंद कदाचित त्याच्या प्रवासादरम्यान झाली असावी. हा पक्षी या ठिकाणी संपूर्ण हिवाळाभर दिसला तर या ठिकाणी तो स्थलांतर करून येत असावा असे समजता येईल. या नोंदीमुळे सातपुडा हा स्थलांतरासाठी महत्वाचा संचार मार्ग असल्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मेळघाटात अशा अनेक महत्वाच्या पक्ष्यांच्या नोंदी होण्यास वाव आहे. – डॉ. जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.