रोहित पवार यांची ‘युवा संघर्ष यात्रा’ नुकतीच समाप्त झाली. या यात्रेत रोहित पवार यांनी ‘संघर्ष’ तर केला; पण त्याची व्याप्ती मात्र जगावेगळी होती. कधी ते पावसात भिजले, शेतकर्यांच्या बांधावर गेले, तर कधी धरणात उडी मारून पोहण्याचा आनंद लुटताना दिसले. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ’युवा संघर्ष यात्रे’चा समारोप नागपुरात झाला. यावेळी शरद पवार आणि संजय राऊत यांची भाषणेही पार पडली. सगळं काही सुरू असताना, नंतर ‘मंत्रिमंडळातील सदस्य आमचे निवेदन घ्यायला येत नाही, तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही,’ असा पवित्रा रोहित पवारांनी घेतला. मात्र, त्यांच्या या हट्टीपणाला दाद मिळाली नाही आणि त्यांनी विधानभवनावर धडक मोर्चा काढला. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पोलिसांनी अडवलं आणि ताब्यातही घेतलं. विशेष म्हणजे, या युवा संघर्ष यात्रेची सांगता, त्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवशीच केली. राज्यातील बेरोजगारी, नापिकी, दुष्काळ, शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवर ही यात्रा रोहित यांनी काढली. मात्र, त्यामागील मूळ मुद्दे भरकटून उरली केवळ शोबाजी आणि दिखाऊपणा. मुळात ही यात्रा संपल्यावर अनेकांना समजलं की, अशी यात्रा महाराष्ट्रात काढली गेली होती, इतका कमी प्रतिसाद या यात्रेला मिळाला. आवाज उठवायला, यात्रा काढायला कुणाचीही बंदी नाही; मात्र केवळ यात्रेच्या नावाखाली गोंधळ घालून वातावरण बिघडवणेदेखील योग्य नाही. मंत्री भेटायला येत नाही, म्हणून आम्ही जागेवरून उठणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला खरा. मात्र, ते जेव्हा सत्तेत होते! तेव्हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती लोकांना प्रत्यक्ष भेटत होते, असा सवाल त्यांनी तिथेच उपस्थित संजय राऊतांना विचारायला हवा होता. खुद्द उद्धव हे त्यांच्या मंत्र्यांनाही भेटत नव्हते. रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. तेव्हा त्यांनी तरी रोहित यांना अधिवेशनाचे गांभीर्य समजावून सांगून, यात्रेची सांगता शांततेत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु, दोन महिने चाललेल्या यात्रेचा ना कुठे गाजावाजा, ना कुठे प्रसिद्धी. त्यामुळे शेवटी काहीतरी गोंधळ निर्माण करून, यानिमित्ताने यात्रेला प्रसिद्धी मिळवून द्यायची होती का? म्हणूनच या रोहित पवारांचा या यात्रेतून कोणताही संघर्ष नव्हे, तर अपकर्षच झाल्याचे दिसते.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील एक मंत्री जमीर अहमद खान यांच्या एका वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. तेलंगण विधानसभेच्या प्रचारादरम्यान जमीर खान यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. सध्या ते कर्नाटक सरकारमध्ये घरकुल, वक्फ आणि अल्पसंख्याक मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, मिळालेल्या मंत्रिपदाप्रमाणेच त्यांनी त्याचा परतावा देण्यासही सुरुवात केली आहे. हा परतावा वादग्रस्त वक्तव्ये करून, गोंधळ निर्माण करून दिला जात आहे. “कर्नाटकच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही मुस्लीम व्यक्ती विधानसभेचा अध्यक्ष झाली नाही. मात्र, काँग्रेसने ती किमया साधत प्रथमच यु. टी. खादर यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी बसवले,” असे खान यांनी म्हटले. बरं! इथवर मंत्रिपद मिळालं म्हणून कौतुकाचे पूल बांधणे ठीक होते. मात्र, त्यानंतर खान साहेब थेट भाजपवरच घसरले. “काँग्रेसने मुस्लीम असलेले यु. टी. खादर यांना विधानसभा अध्यक्ष बनवले असून, त्यांच्यासमोर चांगल्यातील चांगले भाजप नेते त्यांना सलाम करतात, उभे राहून साहेब नमस्कार म्हणतात,” असेही खान यांनी म्हटले. त्यामुळे जाणूनबुजून अशी वक्तव्ये करून, खान यांना नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १५ मुस्लीम उमेदवारांना उमेदवारी दिली होती. त्यातील नऊ जणांनी विजय मिळवला होता, तर विजयी उमेदवारांपैकी एकाला काँग्रेसने मंत्री बनवले, ते मंत्री म्हणजे जमीर खान. मंत्रिपद मिळाल्यामुळे त्याची पोचपावती वरिष्ठांना देणे, क्रमप्राप्त आहे. तेच काम खान करत आहे. तिकडे राज्यसभेत उपराष्ट्रपती तथा सभापती जगदीप धनखड यांच्या वाकून नमस्कार करण्यावरही विरोधी पक्षाने टीका करायला सुरुवात केली. ही बाब धनखड यांच्या लक्षात आल्यानंतर, विरोधकांना त्यांनी चांगलेच सुनावले. नमस्कार करणे, ही आपली संस्कृती आणि माझे संस्कार असल्याचे सांगत, विरोधकांची त्यांनी खरडपट्टी काढली. मुळात इकडे जमीर खान यांना समजायला हवे, जगदीप धनखड सभापती असून नमस्कार करण्यात कुठलाही कमीपणा मानत नाही. परंतु, मुस्लीम अध्यक्षाला करण्यात येणार्या नमस्कारावरून त्यांनी वाद निर्माण केला. हाच खरा फरक!