पंतप्रधान मोदींच्या रूपाने देशाला प्रभावशाली व दूरदृष्टी नेतृत्त्व लाभले : चंद्रशेखर नेने

आंतरराष्ट्रीय घडामोडी व संरक्षण विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांचे प्रतिपादन

    13-Dec-2023
Total Views |
Chandrasekhar Nene on Narendra Modi


नाशिक
: “जगाचे वर्तमान सद्यःस्थितीत अत्यंत अस्वस्थ आहे. शेजारी राष्ट्रांतर्गत युद्धाची परिस्थिती, शक्तीशाली देशांची वर्चस्ववादी प्रवृत्ती आणि देशादेशांतर्गत असणारी विषमता ही अस्वस्थतेची प्रमुख कारणे आहेत. या स्थितीत भारतास सन् 2014 पासून पंतप्रधान मोदी यांच्या रूपाने जागतिक स्तरावर प्रभावशाली आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्त्व लाभले आहे. या नेतृत्त्वाच्या इच्छाशक्तीच्या परिणामी भारत हा जगाच्या तुलनेत स्थिर देश आज बनला आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत भारताची स्थिती भक्कम आहे,” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय घडामोडी व संरक्षण विषयाचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांनी केले. बुधवार, दि. 13 डिसेंबर रोजी धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास येथे या व्याख्यानमालेतील तिसरे व समारोपाचे व्याख्यान पार पडले. यावेळी व्यासपीठावर हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय पगारे आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे हे उपस्थित होते. चंद्रशेखर नेने पुढे म्हणाले, “एकेकाळी भारतला जगात कुणीही गृहीत धरत नव्हते. आजपर्यंत हाच भारत देश जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. आता पाचव्या स्थानाहून लवकरच दुसर्‍या स्थानी भारत झेप घेऊन जागतिक स्तरावर नवी मोहोर उमटवेल. जगामध्ये युरोप, आशिया, आफ्रिका या खंडांमध्ये अनेक अस्वस्थ करणार्‍या घडामोडी घडताहेत. रशिया-युक्रेनमधील युद्ध असो किंवा इस्रायल-‘हमास’मधील नरसंहार असो, इकडे चीन-पाकिस्तान या राष्ट्रांचा विस्तारवाद असो किंवा आफ्रिकेतील संसाधनांवर जगातील महासत्ता राष्ट्रांसह अनेक राष्ट्रांचा असणारा डोळा असो, या सर्व घडामोडी जगातील असमतोलाकडे लक्ष वेधतात.

धार्मिक उन्माद, संसाधनांवरील नियंत्रण, वांशिक श्रेष्ठता, विस्तारवादी वृत्ती, आर्थिक असमानता व पर्यावरणीय संकटे ही कारणे या असमतोलामागे आहे. या आव्हानांना भारत मात्र पुरून उरला आहे.”सुरुवातीस संजय पगारे यांनी प्रास्तविक केले. त्यांनी व्याख्यानमालेतील तीनही दिवसांच्या व्याख्यानांचा आढावा घेतला. व्याख्यानमालेच्या आयोजनाची भूमिका मांडत धर्मवीर डॉ. मुंजे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “सद्यःस्थितीत भारताची घोडदौड वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काराकिर्दीत देश योग्य दिशेने पुढे सरकतो आहे. देशाला स्वावलंबनाकडे नेण्याचा भारत सरकारचा प्रयत्न भारतास ध्रुवपद मिळवून देईल.”स्नेहा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रावणी गिते या विद्यार्थिनीने पद्य सादर केले. शालेय समितीच्या अध्यक्षा सुवर्णा दाबक यांनी उपस्थितांचे आभार मानले. अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’ने व्याख्यानाची व व्याख्यानमालेची सांगता झाली.