रोहित पवारांची संघर्ष यात्रा राज्यात इतिहास घडवणार - शरद पवार
12-Dec-2023
Total Views |
नागपूर : याआधी दोन दिग्गजांनी अशीच पदयात्रा काढली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसरे चंद्रशेखर, जे देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा यात्रेचा कार्यक्रम तरुणांनी आयोजित केला. यातून तरुणांचे प्रश्न मांडले, पदभरती, कंत्राटी नोकर भरती, रिक्त जागा भरण्यासंदर्भातील मुद्दे आणि यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीही संघर्ष यात्रेतून प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी काढलेली ही यात्रा राज्यात इतिहास घडवेल, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी नागपुरात झाला. यावेळी टेकडी रोड परिसरात आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह,ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. टेकडी रोड परिसरातील सभा संपल्यानंतर ही यात्रा विधानभवनावर धडकणार होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले, सुरक्षाव्यवस्थेचा भंग करू पाहणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.