नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो ट्विट केला आणि त्याला 'वचन पूर्ण केले' असे कॅप्शन दिले. हा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. फोटोमध्ये, पंतप्रधान मोदी कलम 370 च्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालेले दिसत आहे.
व्हायरल झालेल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये पीएम मोदी दिसत आहेत. त्याच्या मागे इतर आंदोलकही बसले आहेत. त्यांच्या मागे एक पोस्टर आहे. ज्यात लिहिलेले आहे, '370 हटवा, दहशतवाद संपवा, राष्ट्र वाचवा.' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याची घोषणा राज्यसभेत केल्यानंतर माधव यांनी ट्विटरवर हे चित्र शेअर केले आहे.
राम माधव यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० वरील सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आणि म्हटले की, "किती गौरवशाली दिवस. शेवटी जम्मू-काश्मीरचे भारतीय संघराज्यात एकत्रीकरण करण्यासाठी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जींपासून सुरू झालेल्या हजारो लोकांच्या हौतात्म्याचा सन्मान केला जात आहे आणि संपूर्ण देशाची सात दशके जुनी मागणी आपल्या डोळ्यांसमोर साकार होत आहे. आपण कधी कल्पना केली आहे का?" असं राम माधव यांनी ट्विट केले आहे.