मोहन यादव मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री!

11 Dec 2023 17:06:33
 
mohan yadav
 
 
नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भोपाळमध्ये सोमवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली होती. पक्षाने पाठवलेले निरीक्षक मनोहर लाल खट्टर, डॉ. के लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांच्या उपस्थितीत मोहन यादव यांची राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. मोहन यादव हे उज्जैन दक्षिण विधानसभेचे आमदार आहेत.
 
मध्य प्रदेशमध्ये दोन उपमुख्यमंत्रीही असतील. यासाठी जगदीश देवरा आणि राजेश शुक्ला या दोन नावांची निवड करण्यात आली आहे. जगदीश देवरा हे मल्हारगडचे आमदार आहेत तर राजेश शुक्ला बिजावरचे आमदार आहेत. याशिवाय विधानसभा अध्यक्षपदासाठी नरेंद्र सिंह तोमर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
 

mohan yadav 
 
 
कोण आहेत मोहन यादव?
 
मोहन यादव यांनी माधव सायन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उज्जैनच्या नगर मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. मोहन यांची 1982 मध्ये विद्यार्थी संघटनेचे सहसचिव म्हणूनही निवड झाली. ते भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य आणि सिंहस्थ मध्य प्रदेशच्या केंद्रीय समितीचे सदस्य, मध्य प्रदेश विकास प्राधिकरणाचे प्रमुख, पश्चिम रेल्वे बोर्डातील सल्लागार समितीचे सदस्यही राहिले आहेत. 2013, 2018 नंतर आता 2023 मध्ये उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले आहेत.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0