नवी दिल्ली : इंडी आघाडीची चौथी बैठक 19 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नवी दिल्लीत पार पडेल. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी (10 डिसेंबर) ट्विट करत ही माहिती दिली. मात्र, 17 डिसेंबरपासून बैठक का पुढे ढकलण्यात आली, याचे कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला लालू यादव यांनी 17 डिसेंबर रोजी विरोधी गटाची बैठक होणार असल्याचे सांगितले होते.
जयराम रमेश यांनी “जुडेगा भारत, जीतेगा भारत” अशी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "भारतीय पक्षांच्या नेत्यांची चौथी बैठक मंगळवार, 19 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे दुपारी 3 वाजता होणार आहे." छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ही पहिलीच सभा होत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी 6 डिसेंबरच्या सभेला येण्याचे टाळले होते. राज्यातील चक्रीवादळ मिचौंगॉचे कारण यावेळी देण्याच आले होते. तर, ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर नाराजी व्यक्त कली होती.
काही महिन्यांत लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यामुळे या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे.