पडघा-बोरिवली इस्लामिक स्टेट? दहशदवाद्यांची ISIS मोडस ऑपरेंडी!

11 Dec 2023 22:13:36
Borivali Padgha NIA Raid


राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत. लोकसंख्या अंदाजे चार हजार. पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबाचे पोट भरायचे, तसेच लहान-मोठे व्यवसाय करीत संसाराचा गाडा हाकायचा, यातच तिथला सामान्य माणूस गुंतलेला. कोणाच्याही अध्यात व मध्यात नसलेले पडघा - बोरिवली हे गाव आता दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागले आहे. पुण्यातील इसिस मॉडयूल कनेक्शनप्रकरणी एनआयएने चार महिन्यांपुर्वी पडघ्यातून सहापैकी चार दहशतवाद्यांना इथूनच अटक केले होते. आणि तेव्हापासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या गावात नवा सीरिया बनवण्याचा डाव दहशतवाद्यांकडून आखला जात होता. त्यासाठी छुप्या मार्गाने तयारीही सुरू केली होती.

मात्र एनआयएने दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्याने हा डाव उधळला गेला आहे. ती म्हणजे , इस्लामिक स्टेटचा दहशतवादी कटाप्रकरणी एनआयए पथकांनी दि.९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ४४ ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रातील पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आणि मीरा भाईंदर येथे छापे टाकण्यात आले आहेत.तसेच पडघा येथील हे इसिसचे महाराष्ट्र मॉडेल असून याचा सुत्रधार मुंबई बाँम्ब हल्ल्यातील आरोपी साकीब नाचन असल्याचे ही ह्या छापेमारीतून उघडकीस आले. त्यामुळेच इसिसचे महाराष्ट्र मॉडेल काय आहे? महाराष्ट्रातील पडघा या गावात नेमंक काय घडलं? एनआयएच्या छापेमारीतून कोणत्या आरोपींना अटक झाली आहे? यांची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत?

या संपुर्ण प्रकरणाची सुरुवात झाली, दि. ३ जुलै २०२३ रोजी. त्यादिवशी जुल्फीकार बडोदावाला ह्या इसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूलचा सूत्रधार असणाऱ्या आरोपीला बोरीवलीतून अटक करण्यात आली. तसेच त्यावेळी जुल्फीकार बडोदावाला याच्यासह शार्जिल शेख, अकिब नाचन, शामिल नाचन यांना ही अटक करण्यात आली होती. त्यामुळे गेली काही वर्ष पडघा- बोरीवली हे शांत समजले जाणारे गाव अचानक चर्चेत आलं. पुर्वी ह्या गावात सिमी या मुस्लिम दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल इथे कार्यरत होते. त्यामुळे पडघा-बोरीवली हे गाव त्यांचे प्रमुख केंद्र मानले जायचे, असा संदर्भ संजय भोईर आपल्या एका लेखात देतात. त्यानंतर वांरवार वेगवेगळ्या कटांमध्ये इथल्या नागरिकांची नावे येऊ लागली. ह्यांच गावात मुंबईत २००२-०३ मध्ये झालेल्या ३ बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार असणारा साकीब नाचन देखील राहत होता.

मात्र काही वर्षांपुर्वी साकीबची जामिनावर सुटका झाली. आणि या ग्रामीण भागात पुन्हा एकदा दहशतवादी कृत्यांनी डोकं वर काढलं. यांच साकिबवर १२ देशविघातक गुन्हे दाखल झाले आहेत. बरं साकिबचा हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे यावेळच्या छापेमारीत ही एनआयएने केलेल्या छापेमारीत १५ जणांना अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपी म्हणून साकिब नाचनला ही अटक करण्यात आले आहे.साकिब नाचनवर भारतात इसिस नेटवर्क तयार करण्याचा आणि इतर कट्टरपंथींसोबत दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे. त्याने महाराष्ट्रातील पडघा या गावाला 'अल-शाम' म्हणजेच इस्लामिक स्टेट म्हणून घोषित केले होते.

आता पडघा-बोरीवलीत नेमके हे दहशतवादी कृत्य कशाप्रकारे घडवून आणले जात होते? हे जाणून घेऊ. ९ डिसेंबरच्या रात्री ३ वाजता पोलीसांच्या २० गाड्या अचानक पडघा-बोरीवली या गावात दाखल झाल्या. या गाड्यांमध्ये ४०० पोलीस होते. त्याचवेळी एनआयएच्या लोकांनी गावात घुसून एक-एक घराचा तपास घ्याला सुरुवात केली. यावेळी घरातील कपाट, बेड, लॉकर सर्व तोडण्यात आलं. जवळजवळ ५० घरांच्या तपासानंतर १५ संशयितांना पकडण्यात आले. यात मोहरक्या साकीब नाचन, हसीब जुबेर मुल्ला उर्फ हसीब जुबेर मुल्ला, काशिफ अब्दुल सत्तार बलेरे, सेफ अतीक नाचन, रेहान अशफाक सुसे, शगफ सफीक दिवकर, फिरोड दस्तगीर कुवारी, आदिल इलियास खोत या आरोपींना अटक करण्यात आले. मुळात पडघा-बोरीवलीत सीरियाच्या भूमीत लागू होणारे सर्व शरियत कायदे गावातदेखील लागू करता येतील असा कट्टरपंथीयांचा विचार होता. या गावाला 'पवित्र ठिकाण' असे दहशतवादी संबोधतात. सीरियाप्रमाणे येथेही शुद्ध इस्लाम धर्माचा अभ्यास केला जाऊ शकतो.

त्याच्या आडून दहशतवादी कृत्य करणे सोपे होईल असे वाटल्याने येथील तरुणांची माथी भडकवण्यात आली. प्रत्येकाला सीरियाला जाणे शक्य नसल्याने सीरियाप्रमाणेच पडघा - बोरिवलीसारख्या भागातदेखील दहशतवादी अड्डा बनवण्याचा डाव होता असे तपासात निष्पन्न झाले आहे. या तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी ६८ लाख रुपयांची रोकड, एक पिस्तूल , २ एअर गन, १० मॅगझिन, ८ तलवारी, ५१ हमास देशाचे ध्वज, ३८ मोबाईल फोन आणि २ लॅपटॉप जप्त केले आहेत. त्यामुळे पडघा बोरिवली हा मुस्लिमबहुल परिसर आहे. गेल्या काही वर्षांतील तेथील घटना लक्षात घेता ही कारवाई गोपनीय पद्धतीने पार पाडणे हे मोठे आव्हान मानले जात होते. यासाठी एनआयएने महाराष्ट्र पोलीस आणि दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) मदत घेतली.

या तपासानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी कट्टरपंथी तरुणांना सीरिया आणि इराकमध्ये जाऊन ISIS मध्ये सामील होण्यासाठी फसवत. मात्र या टोळीने भारतातच तरुणांना जिहाद, खिलाफत आणि दहशतवादी हल्ल्यांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. दहशतवादी हल्ल्यांद्वारे भारतातील जातीय सलोखा बिघडवणे आणि शेवटी देशाविरुद्ध युद्ध घोषित करणे हा या टोळीचा उद्देश होता. मात्र, इसिसच्या या टोळीने तरुणांना खलीफा म्हणून निष्ठेची शपथ घ्यायला लावली आणि किती तरुण पडघा गावात येऊन या टोळीचा भाग बनले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी या एनआयएच्या छापेमारीमुळे महाराष्ट्रावरील किंबहुना देशावरचे संकट टळलेले आहे. पंरतु पडघ्याप्रमाणे अजून किती गावं इस्लिामिक स्टेट म्हणून अशा दहशतवादी कारवायांना सहकार्य करत असतील, हे अजून उघडकीस आलेले नाही. पण सक्षम पोलीस यंत्रणा आणि एनआयएचे पथक हे नक्कीच शोधून काढतील. तरी याप्रकरणी आपल्या गावात, परिसरात किंवा आपण राहत असलेल्या भागात अशी काही संशायास्पद हालचाल आढळून आली. तर त्याबद्दलची माहिती आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला नक्की द्या. जेणेकरून अशा देशद्रोही कारवायांना आळा बसेल.





 
Powered By Sangraha 9.0