तीन पदव्या असून, दहा वर्षं खासगी नोकरीचा अनुभव असतानाही, उद्योगाकडे वळलेल्या नाशिक जिल्ह्यातील संदीप सदाशिव कचरे यांची ही प्रेरणादायी वाटचाल...
आजच्या स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षण घेऊनही मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. अनेकदा उच्चशिक्षण घेऊन आणि बरीच धडपड करूनही मनासारखी नोकरी, पगार मिळत नाही, हे आजचे वास्तव. त्यामुळे अनेक तरूण अर्थार्जनासाठी हाताला मिळेल ते काम धरून आपला उदरनिर्वाह भागवत असतात. परंतु, अनेक तरुण उच्चशिक्षणावर अथवा केवळ नोकरीवर अवलंबून न राहता, आपली स्वतःची वेगळी वाट धुंडाळत, व्यवसाय करण्याला प्राधान्य देत, स्वतःसह इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देत, जीवन समृद्ध करत असतात.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथील संदीप सदाशिव कचरे या उच्चशिक्षित तरुणाने कधीकाळी शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरुवातीला ’बीए’ केले. त्यानंतर ‘डीएड’ व ‘एमए’ केले. मात्र, राज्यात तब्बल दहा वर्षं शिक्षक भरती न झाल्याने त्यांनी निराश न होता, आयुष्याशी दोन हात करत उद्योजक होण्याचा मार्ग निवडला. दरम्यान, त्यांनी कंत्राट पद्धतीने ’महिंद्रा’ कंपनीत चार वर्षं पंचायत समिती, तहसील कार्यालयात ऑपरेटर या पदावर दोन वर्षं, तर नगर पालिकेत लिपिक या पदावर दोन वर्षं असे तब्बल दहा वर्षं कंत्राट पद्धतीने नोकरी केली. परंतु, या नोकर्यांमध्ये पिळवणूक अधिक असून, त्यातून मिळणारे वेतन अतिशय तुटपुंजे असल्याने संदीप यांना त्यांचे भविष्य अंधारमय दिसत असल्याने, त्यांनी नोकरीला कायमचा रामराम करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
दरम्यानच्या काळात नोकरी करताना, त्यांनी युट्यूबचा वापर व्यवसाय कसा सुरू करता येईल, यासाठी केला. यातून त्यांना कुक्कुटपालनाची माहिती मिळाली. संदीप यांनी ही कल्पना त्यांचे दाजी सचिन पावडे यांना सांगितली. त्यांनी संदीप यांचा आत्मविश्वास वाढवत, त्यांना मोलाची साथ दिली. संदीप यांचे वडील वन विभागात नोकरीला होते व ते २०१६ साली निवृत्त झाले. त्यांच्या वडिलांनी २००६ साली पाच एकर शेती घेतली होती. त्याच शेतीत २०१९ साली सुरुवातीला १०० बॉयलर कोंबड्यांच्या पिल्लांपासून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. १०० पक्ष्यांच्या शेडसाठी जवळपास दहा हजार रुपये खर्च आला. त्यानंतर पक्षी घेण्यासाठी २ हजार, ५०० ते ३०० रूपये खर्च आला. तसेच पक्ष्यांच्या खाद्यासाठी साधारण पाच हजार रुपये खर्च लागला आणि सहा महिन्यानंतर अंड्यांचे उत्पादन चालू झाले. सुरुवातीला १०० कोंबड्यांमागे ४०-५० अंडे रोजचे मिळत असत. त्यानुसार त्यांचा रोजगार सुरू झाला. असे एकंदरीत सर्वसाधारण त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप होते आणि इथूनच त्यांच्या खर्या आयुष्याला सुरुवात झाल्याचे संदीप सांगतात.
पुढे दोन वर्षं त्यांनी ‘बॉयलर फार्मिंग’ केली. परंतु, त्यांना असे लक्षात आले की, बॉयलर फार्मिंगमध्ये खर्च व मेहनत अधिक असून त्या तुलनेत उत्पन्न कमी आहे. दरम्यान, त्यांना गावरान कुक्कुटपालनाविषयी माहिती मिळाली. त्याचा खोलवर अभ्यास करताना, त्यांना असे लक्षात आले की, गावरान पक्ष्याच्या अंड्यांना बाजारात मागणी व किंमत दोनही असल्याने गावरान कुक्कुटपालनातच पुढे करिअर करावे. त्यानुसार त्यांनी गावरान कुक्कुटपालनाकडे मोर्चा वळवला. यात ते स्वतःच पक्षी विकायचे अशा पद्धतीने त्यांची गावरान कुक्कुटपालनाकडे सुरुवात झाली. दरम्यान, त्यांना कुक्कुटपालनालाच जोडधंदा करावा, हा विचार मनात आला. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला दोन गायी घेतल्या आणि मग तीन गायी घेतल्या सध्याला त्यांच्याकडे पाच गायी आहेत. ज्याचे दूध डेअरीला ही जाते व गावाबाहेर ही ते दूध विक्री करतात. यासह आणखी एक जोडधंदा म्हणून ते ट्रक्टरदेखील चालवतात. अशा एकूण तीन व्यवसायांतून संदीप हे महिन्याकाठी लाखभर उत्पन्न कमावतात. तसेच संदीप यांची बायकोदेखील उच्चशिक्षित असून, त्यांचे ’बीकॉम’ पर्यंत शिक्षण झाले आहे. त्याही संदीप यांना व्यवसायात हातभार लावत असतात व स्वतः सौंदर्य प्रसाधनालयदेखील चालवतात. अजून कुठला जोडधंदा करता येईल, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशा प्रकारे व्यवसाय वाढवता येईल, यावर त्यांचा अभ्यास सुरू असल्याचे संदीप सांगतात.
संदीप स्वतःचे उदाहरण देत सांगतात की, “मी स्वतः तीन पदव्या घेतल्या आहेत. आयुष्यात त्यांना शेती काय असते, हेही माहीत नव्हते; परंतु मी लाज बाळगली नाही, खचलो नाही किंवा ते एवढे उच्चशिक्षित आहे. हे मी कसे करू, असा साधा विचारसुद्धा माझ्या मनात आला नाही. चुकत गेलो आणि त्यातून शिकत गेलो. सुशिक्षित बेरोजगारांनी हार न मानता, आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा उपयोग व्यवसायामध्ये दाखवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धाडस करावे. आपल्या मदतीला कोणी येणार नाही. जे काही आहे, ते आपल्यालाच करायचं आहे. एवढा निश्चय मनाशी ठरवून कामाला लागा. जरी नोकरी करत असाल; परंतु त्याला व्यवसायाची जोड नक्की द्या,“ असे ते आवर्जून सांगतात. संदीप सदाशिव कचरे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे हार्दिक शुभेच्छा!
गौरव परदेशी