शरीफ सत्तेसाठी शरीफ?

10 Dec 2023 21:51:04
Nawaz Sharif Wanted better relations with India

पूर्वी भारताच्या नावाने खडे फोडणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आता चक्क भारताचे गोडवे गाऊ लागले आहे. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे की मग पाकिस्तानमध्ये परतल्यानंतर पुन्हा एकदा सुरू केलेला दुटप्पीपणा? पाकिस्तानने भारताचे गोडवे गावे, भारताच्या बाजूने बोलावे याची अपेक्षाही भारताने कधी केली नाही. मात्र, शरीफ यांच्या बदलत चाललेल्या शरीफ स्वभावाने सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पाक लष्कराच्या कारगिल योजनेला विरोध केल्यामुळेच १९९९ मध्ये मला सत्तेतून सत्तेतून काढून टाकण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नवाज शरीफ यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी भाऊ शहबाज शरीफ यांचे सरकार पाकिस्तानमध्ये सत्तेत होते, मात्र तेव्हा त्यांना आरोप करायला वेळ मिळाला नव्हता. आता सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणेनंतर हंगामी सरकार असताना त्यांना पाक लष्करावर आरोप करण्याची इच्छा झालेली दिसत आहे.
 
मी कारगिल युद्धाच्या योजनेबाबत लष्कराला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, त्यावर पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी मला सत्तेवरून पायउतार केले. पुढे माझाच मुद्दा खरा ठरला. माझ्याच पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये भारताचे दोन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हे पाकिस्तानच्या भेटीवर आले होते. भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मी प्रयत्न केले, तरीही मला सत्तेवरून हटविण्यात आले. त्यामुळे १९९३ आणि १९९९ मध्ये मला सत्तेवरून का हटविण्यात आले हे जाणून घेण्याचा मला अधिकार असल्याचेही शरीफ यांनी म्हटले आहे.

शरीफ यांनी माजी पंतप्रधान इमरान खानकडे अनुभवाची कमतरता असून त्यांना सत्ता देणे चुकीचे असल्याचे सांगत पाकिस्तानने भारत, अफगाणिस्तान आणि इराणसारख्या देशांशी संबंध सुधारण्याची गरज व्यक्त केली. भावावरही स्तुतीसुमने उधळत इमरान यांनी अर्थव्यवस्था खड्ड्यात नेली, मात्र भाऊ शहबाजने पाकला गरिबीपासून वाचविल्याचा आवही शरीफ यांनी आणला. सध्या पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत आहे. फेब्रुवारीत होणार्‍या या निवडणुकीपूर्वी पक्ष कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना त्यांच्या भाषेत कमालीचा बदल पाहायला मिळाला.

भारताचे कौतुक करत त्यांनी थेट पाक लष्करावर आरोपांचा भडिमार केला. यात माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावरही त्यांनी टीका केली. दरम्यान, २०१८ मध्ये, न्यायालयाने नवाज यांना अल-अझिझिया स्टील मिल भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ‘एव्हॉनफिल्ड प्रॉपर्टी’ प्रकरणीदेखील ११ वर्षांची शिक्षा आणि ८० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुढे दि. १६ नोव्हेंबर, २०१९ रोजी लाहोर उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि उपचारासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली. नवाझ शरीफ हे आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आहेत. नुकतेच ते पुन्हा पाकिस्तानात परतले असून सार्वत्रिक निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहे.

मुळात आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान जगातील अनेक देशांकडे अगदी एक-एक अब्ज डॉलरच्या मदतीसाठी भीक मागतो आहे. त्या तुलनेत भारताकडे ६०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकचा खजाना आहे. त्यामुळे पाक आणि भारताची तुलना होऊच शकत नाही. पाकमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याने त्याठिकाणी भारताची बाजू घेऊन तसेच भारताविषयी सकारात्मक वक्तव्ये करून तेथील जनतेमध्ये विकासाचा मुद्दा शरीफ उपस्थित करू पाहत आहे. मात्र, द्वेष, तिरस्कार आणि कट्टरता यात बुडालेला पाकिस्तान विकासाच्या मुद्द्याचा विचार करू शकतो, असे चित्र तूर्तास तरी दिसत नाही.

इमरान खान पंतप्रधान असताना त्यांच्या तोंडातूनही अऩेक वेळा भारताची कौतुक करणारी वक्तव्ये समोर येत होती. भारताची परराष्ट्र रणनीतीचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले होते. तोच कित्ता आता नवाज शरीफ गिरवू पाहत आहे. सत्तेसाठी शरिफ बनत असतीलही मात्र, काश्मीर मागणार्‍या पाकिस्तानचे सध्या काय हाल सुरू आहे, हे सर्वांसमोर आहेच. शरीफ यांनी कितीही कौतुकाचे बांध बांधले. मात्र, देशात आता मोदी सरकार आहे, हे त्यांनी विसरू नये.

७०५८५८९७६७
Powered By Sangraha 9.0